[२९]                                                                            ।। श्री ।।                                                        ७ मार्च १७५४

 

राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥ गोपाळराव गणेश गोसावी यांसिः-

सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ अर्बा खमसेन मया व अलफ. तुह्मी पत्र पाठविलें, प्रविष्ठ जालें. सफदरजंग श्री क्षेत्रीचें अमलाची८७ पेरवी होऊ देत नाहीं, हा मजकूर विस्तारें करून लिहिला तो कळला. ऐशास, येथील उपराळा ठरावयाचा मजकूर लालानरसिंगदास यास ताकीद कर्तव्य तें करीत आहों. परस्पर ते सफदरजंगास लिहीतच असतील. तुह्मी त्यासी शोरश्य राखोन अंमलाची पेरवी होय तें करणें. जरी अमल ते चालो न देत तरी तुह्मी आह्माकडे उठोन येणें. पांच शिरोमणी व पद्मपुराण संपूर्ण व यजुर्वेदभाष्य व सामभाष्य हे तुह्मी लिहिविले आहेत. ते तयार जाले असले तरी पाठवणें. तयार जाले नसले तरी खामखा तयार जलदीनें करविणें. पुस्तकें तयार जाल्याशिवाय क्षेत्रींहून न निघणें. जाणिजे. छ१२ जमादिलावल आज्ञाप्रमाण. पुस्तकाची जरूर दरकार आहे तरी तुह्मी खामखा श्रीस जाऊन लेहून घेऊन येणें. त्याखेरीज आल्यास बरें नाहीं. आणि श्रीचे अमलाविसी जसें केलेलें तसें बोलून जाहलें तरी करणें. वर्तमान लिहीत जाणें.

 

लेखन सीमा