[६७] श्रीशंकर. १९ जून १७५७.
सेवेसी विज्ञापना. अबदाली१५३ दिल्लीहून माघारा गेला. तेव्हांच आह्मी मल्हारबास ह्मणत गेलों कीं जशी तशी माधवसिंगाची मामलत विल्हेस लावून दिलीसुभा व लाहोर हे दोनहि सुभें जप्त करा.
ह्मणजे चार रुपयेहि येतील व नक्षहि होईल. अबदालीचा पिछा केला असे होईल. परंतु यांणी लटकीच१५४लचांडें माधवसिंगाकडे काढून तीन महिने लांबविले. आह्मांस भक्षावयास नाहीं. कर्जहि न मिळे. ऐसें झाले. सांप्रत मल्हारबाशिवाय मामलत माधवसिंगाशीं जी साधेल ती करून पुढें जाणार. येथील कारभार ओढला. फार लटकीच लचांडे काढावी. ऐसें केल्यानें कारभार शेवटास जात नाहीं. तपशील फारच आहेत. स्वभाव स्वामीस वाकीफ आहेच. परंतु सूचना मात्र लिहिली आहे. स्वामीनीं फिकीर न करावी. आह्मी आपले कृपेकरून कारभार उत्तम प्रकारे शेवटास नेतों. कळावे. छ १ सवाल. बहुत काय लिहिणें.
हे विनंति.
पै॥ छ २० सवाल.