[२३]      पै ।। छ २७ र।।खर                                 ।। श्री ।।                                                               २० जानेवारी १७५४

 

श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीनें सेवकाचें वर्तान त॥ छ १७ माहे रबिलाखर पावेंतो फरासिसाचे सैन्यांत समीप शहर औरंगाबाद येथें यथास्थित असे. येथील वर्तमान आढल्याप्रमाणें त॥ ७ रबिलाखर सेवेसी विनंतीपत्रीं लेहून पाठविलें आहे त्याजवरून विदित होईल. छ९ रबिलाखर शनवारीं काळेचौतेरयाहून मोगलाचा कुच जाला. ते दिवशीं अभ्रागमानें दुर्दिन जाला; वायु झडाडी सुटला व वातचक्राकरितां धुळोरा उठला. अंधीं झाली. त्याच संधीस मुसाबुसी यांचा दप्तरनवीस जगन्नाथराव याजवर गाडदी यांहीं दगा केला. चारमाही तलब देणें राहिली आहे याजकरितां हंगामा झाला. जगन्नाथरायास मारकूट जाली. त्याचा डेरा फाडीत होते. चार घटिका मोठा कजिया झाला. गाडदी बोलत होते कीं रामदासपंत मेला ते दिवशीं अशीच वांभळ पडली होती. आजहि तोच प्रकार आहे. यांस मारून टाकावा. ऐशींहि दुर्वाक्यें बोलिले व लोक बोलत होते कीं आज मोगलाचा कुच जाला आहे. हा मोगल माघारा येत नाहीं. मृत्यु पावेल. ऐशीं नानाप्रकारचीं दुश्चिन्हें जालीं. येका कोशाचे कूच करून मुकामास आले. रामदासपंतहि याच मार्गें वाळजेचें रुखें कूच करून निघाले होते. ख्वाजे न्यामदुल्लाखान येहीं कूच केलेंच नाहीं. काळेचौतरेयावरच आहेत. प्रस्तुत फरासीस हरावलीस आहेत. नवाबाचे डेरे मात्र आहेत. सभोंवती फरंगी, गाडदी यांची चौकी आण कोण्ही नाहीं. शहानवाजखान छ७ रोजीं संध्याकाळीं काळेचौतरेयावर डेरेदाखल झाले. बाकी लोक अद्याप शहरांतच आहेत. शागीर्दपेशा कितेक शहरांतच आहेत. सैदलष्करखान याजबराबर निघत नाहीं, शहरांत राहतात. त्यास शहरांत सुबदारी सांगोन ठेवितात ह्मणून बोली आहे. दोन हजार स्वार तैनात करून ठेवणार याप्रमाणें करार होता. मागती मनसबा फिरला. सैदलष्करखानास वराडचा सुभा सांगितला. औरंगाबादेस अद्याप कोण्ही सुभेदार करार जाला नाहीं. सेवेसी विदित होय. सुभानजी थोरातानें छ१० रबिलाखरीं नवाबाची मुलाजमत केली. बराबर पंचवीसेक घोडीं होतीं. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे हे विज्ञापना.