[२२]      पै ।। छ १० र।।वल                                 ।। श्री ।।                                                               ५ जानेवारी १७५४

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. अबदलहादीखानाजवळोन जबरदस्तीनें मुसाबुसी यांहीं मुकाम करविला. तेव्हां अबदुलरहमानखानास नवाबानें बोलावून नेलें. मजकूर मनास आणितां नवाब बोलिले कीं आह्मी त्यास रुखसत केलें नाहीं. जागा गळीच झाली ह्मणोन दुसरे जागा राहावयास जात होते ह्मणोन संपादणी केली. अबदुलहादीखानानें अडीच लाख रुपयांच्या कबजा छ २ र॥वलीं प्रहररात्रीं शहानवाजखानाजवळ रुजू केल्या. त्या कबजांध्येहि दिक्कत निघाली व दीडलाख रुपयास जागा नाहीं. सबब शहानवाजखान रागास आले. हादीखानानें अजीजी बहुत केली कीं या मामलेयाकरितां कर्जबाजारी जालों. अत:पर मामला न सांगा, तेव्हां जीव द्यावा लागेल. याउपर शहानवाजखान यांहीं मुसाबुसीचें मनोगतानुरूप सदर्हू अदबानीचा मामला ख्वाजे  न्यामदुलाखानास करार केला. हादीखानास नांदेड माहोराकडे मामला सांगणार. ख्वाजे न्यामदुलाखानास आजउद्यां खलअत होईल. सेवेसी श्रृत जालें पाहिजे. सफसीलानखानास हैदराबादचा मामला सांगितला. कालिकादास पेशकार जाला. खानम॥निलें छ२ र॥वलीं मुहूर्तानें प्रस्थान करून आपले बागांत जाऊन राहिले. तीन लाख रुपये रोख व तीन लाख रुपयाचा कबजा येकूण सालाख रुपये द्यावयाचा करार जाला. त्याचा सरंजाम होत आहे. येकदो रोजा ऐवजाची निशा करून देऊन मग हैदराबादेस जातील. ब्रीजदास हैदराबादचा पेशकार व त्याचा भाऊ गुलाबदास या दोघांस शाहानवाजखानांनीं कैद करून मुसाबुसीचे स्वाधीन केलें. ब्रीजदासावर तकरीर निघाली आहे. जाबसाल अद्यापवर कांहीं नाहीं. पुढें काय निकाल पडेल त्याप्रमाणें सेवेसी विनंति लेहून पाठवितों. नवाब सलाबतजंगाचे शरिरीं सावकाश नाहीं. गोंवर निघतो ह्मणून आवई बोलतात. समाचार घेतां गोवर नाहीं, ज्वरच आहे. छ ३ रोजीं काहीं उपशम जाला ह्मणून लोक बोलतात. कोण्ही बोलतात कीं नवाबानें धास्ती घेतली सेवेसी श्रृत जालें पाहिजे. छ२७ सफरीं मुसाबुसी सैदलष्करखानाचे परामर्शास गेले होते. प्रस्तुत खानम॥निले आजाराची सबब करून घरांत आहेत. शहानवाजखानाचा व खानाचा येक विचार आहे. परस्पर येकयेकाकडे जात येत असतात. सेवेसी विदित जालें पाहिजे हे विज्ञापना.