प्रस्तावना
विवेचन बारावें.
कोल्हापूर येथील प्रो. मोडक ह्यांच्या जंत्रीचा उपयोग मला अतिशय झाला. ह्या जंत्रींत चूक म्हणून फारशी कोठें नाहीं. कधीं कधीं तिथींचे वार व मुसुलमानी तारखांचे वार जंत्रींत व ऐतिहासिक पत्रांत निराळे सांपडतात. प्रो. मोडक ह्यांच्या जत्रींतील तिथी, तारखा व वार जर ठाम बरोबर असतील तर पत्रांतील तिथि, वार व तारीख मोडकांच्या जत्रींत जेथें जेथें जमत नाहींत तेथें तेथें एकच अनुमान करणें प्राप्त होतें तें हे कीं, प्रो. मोडकांनीं ज्या जंत्रींवरून व पंचागांवरून आपली जंत्री रचिली ती जंत्री व तीं पंचांगें पत्रें लिहिणा-यांच्याजवळ जीं पचागें होतीं त्यांच्याहून निराळीं असावीं. क्षय व वृद्धि ह्या तिथि निरनिराळ्या प्रांतांतील पंचांगांत निरनिराळ्या दिवशीं कदाचित् असूं शकतील; परंतु, इतर तिथि निरनिराळ्या प्रांतांतींल पंचांगांत निरनिराळ्या वारीं कां असाव्या ह्याचें कारण समजत नाहीं. तसेंच तारखांचे वारहि निरनिराळ्या पंचांगांत कां बदलावे तेंहि नीट समजत नाहीं. उदाहरणार्थ कांहीं पत्रांच्या तारखा खालीं देतों.
(१) ऐतिहासिकलेखसंग्रहांतील १७७ व्या पत्रांत फाल्गुन शुद्ध चतुर्थी बुधवारीं आहे म्हणून लिहिलें आहे. प्रो. मोडकांच्या जंत्रींत चतुर्थी गुरुवारीं आहे. त्यावरून मथळ्यावरील इंग्रजी तारीख १७ फेब्रुवारी म्हणून मांडली आहे. पत्र ज्याअर्थी बुधवारीं चतुर्थ प्रहरीं म्हणजे सध्यांच्या दुपारच्या तीनपासून सहा वाजेपर्यंतच्या कालांत केव्हां तरी लिहिलें आहे त्याअर्थी बुधवार हा वार खरा व बुधवारचीच इंग्रजी तारीख घेतली पाहिजे. तसेंच बुधवारीं चतुर्थी होती हेंहि कबूल केलें पाहिजे.
(२) ऐतिहासिक लेखसंग्रहांतील १७९ व्या पत्रांत फाल्गुन वद्य ७ ला मंदवार आहे; परंतु, जंत्रींत रविवार आहे.