प्रस्तावना

ह्या विवेचनाच्या प्रारंभीं पानिपतच्या युद्धाची व त्याच्या परिणामाची एकंदर १८ कारणें दिलीं होती. त्यापैकीं कांहीच्या तथ्यातथ्याचा निवाडा करण्याचीं साधनें वर दिली आहेत. बाकीं राहिलेल्या कारणां (४,५,६,१०,१४) चा पानिपतच्या मोहिमेशीं विशेष संबंध आहे असें मला वाटत नाहीं. (१) जातिभेदाचा प्रश्न त्यावेळीं मुळीं उदभवलाच नव्हता. (२) ब्राह्मणांच्या पोटभेदांतहि परस्पर वैमनस्य वाढून पानिपत येथें मराठ्यांचा पराभव झाला असें विधान करण्यास अद्यापपर्यंत कांहीच आधार पुढें आला नाहीं. रघुनाथरावदादा, सखारामबापु, महादोबा पुरंधरे, गोपाळराव पटवर्धन, गोपाळराव गणेश, गोविंद बल्लाळ, मल्हारराव होळकर, ह्यांचा १७५० पासून १७६२ पर्यंतचा आणखी बराच खाजगी पत्रव्यवहार सांपडल्यावांचून ह्या प्रश्नाचा उलगडा यथास्थित व्हावयाचा नाहीं व तोंपर्यंत त्यासंबंधीं मूकब्रत आचरणेंच श्रेयस्कर होईल. (३) हिंदुस्थानांत त्यावेळी राष्ट्रियत्वाची आधुनिक कल्पना सर्वत्र पसरली नव्हती हें खरें आहे. ती पसरविण्याचाच तर मराठ्यांचा मुख्य प्रयत्न होता. महाराष्ट्रधर्माची पताका घेऊन मराठे १६४० त जे निघाले ते तिला आस्ते आस्ते हिदुस्थानांत सर्वत्र हिंडवीत असतां त्यांच्यावर १७६२ त हा घोर प्रसंग आला. हा प्रसंग येण्याच्यापूर्वी कित्येक प्रांतांत महाराष्ट्रधर्माचा प्रसार झाला होता व किल्येक प्रांतांत व्हावयाचा होता. उत्तरेकडील प्रांतात तो झाला नव्हता म्हणून तर तत्रस्थ हिंदूलोकांनीं यवनांचें साहाय्य केलें व मराठ्यांचा द्वेष केला. हा द्वेष कां झाला त्याचा विचार पुढील विवेचनांत करतो. परंतु पुढील विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वीमराठ्यांच्या काटपणासंबंधीं दोन शब्द लिहिले पाहिजेत. महाराष्ट्रांतील लोकांच्या अंगीं अनन्यसामान्यत्वेंकरून एखादा जर कोणता गुण असेल तर तो त्यांच्या अंगचा कांटकपणा हा होय. विलास आणि मराठा ह्या दोन अर्थांची व्याप्ति मागेंहि कधीं झालीं नाहीं व पुढेंहि कधी होईल असा रंग दिसत नाहीं. साधी रहाणीं आणि उच्च विचार हे दोन गुण मराठ्यांच्या स्वभावाचे मुख्य घटक होत. पैकीं उच्च विचाराचा विसर मराठ्यांना अधून मधून कधीं पडला असेल; परंतु साधी रहाणी मराठ्यांनीं आजपर्यंत कधींहि सोडलेली इतिहासांत माहीत नाहीं. साध्या रहाणीची, काटकपणाची व विलासपराङ्मुखतेची संवय मराठ्यांच्या अंगी १७५० पासून १७६१ पर्यंत कितपत होती हें पहावयाचें असल्यास त्यावेळच्या पुढा-यांच्या हालचालीचें प्रेक्षण करावें म्हणजे झालें. मागें बाळाजी बाजीराव, सदाशिव चिमणाजी, रघुनाथ बाजीराव, विश्वासराव, जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी, वगैरे पुढा-यांच्या हालचालींचे तख्ते दिले आहेत त्यावरून विलास करण्याला ह्या पुरुषांना किती वेळ सांपडत असेल त्याचा ज्याचा त्यानेंच विचार करावा. बाळाजी बाजीराव विलासी व आळशी होता म्हणून ग्रांट् डफ् वगैरे लोक म्हणतात त्यांत बिलकूल तथ्य नाहीं. बाळाजी बांजीरावाचा सालवार इतिहास ग्रांट् डफ् ला माहीत नव्हता; त्यामुळें ज्या वर्षांचा इतिहास माहीत नसेल त्या वर्षी बाळाजी बाजीराव विलास करीत असे असा डफचा अंदाज आहे.