[२१७ अ]                                    ।। श्री ।।अजमासें             ५ जुलै १७६०.

राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः

विनंति उपरि. तुह्मीं दोन पत्रें एकासारिखींएक मजकुराचीं पाठविलीं, त्यांत कलमवार सुज्याअतदौला याजकडील मजकूर व पत्रें पाठवून द्यावयाचा अर्थ लिहिला तो कळला. ऐशियास, कलमवार मतलबाचें उत्तर, सरदारांची आमची भेट रविवारी२९७ होणार. ती होऊन, पाठवूं. तूर्त पत्र खातरनिशेचें सुज्याअतदौलास व त्याचे मातोश्रीस पाठविलें आहे. त्यांणीं, आह्मी जवळ आलों, आतां चित्त धीर करून, अबदालीचें भय चित्तांतून टाकून, निःशंकपणें आह्मांस येऊन मिळावें. त्यांत फार नफे आहेत. अबदाली अनेक प्रकारें त्यास वाईट तेंच करील. नजीबखान मायावी, हरप्रकारें यास फसवील. परंतु यांत नफा नाहीं. फारच गैरमाफियाची गोष्ट. ते स्नेही आणि आह्मांस त्याचें कल्याण व आपलाहि उपयोग तेंच सांगणें. यास्तव साफ उत्तर देऊन नजीबखान यास लावावें. नजीबखानाचेंहि पारपत्य त्याचे चित्तानुरूप होईल. तरी हा प्रकार बोलोन, त्याचे गोसावी व कांहीं फौज अलीकडे उतरली ती त्याजकडे जाणार हें आहे, तरी ती गोष्ट सहसा न व्हावी हेंहि करणें. वर्तमान लिहिणें. जाट आपलीं ठाणीं कायम करितात. आह्मी आगरियाजवळ जातों. तुह्मीं तिकडील ठाणीं कायम करणें. नजीबखानास धुडावून द्यावयाचा विचार सुज्याअतदौला याजकडून करणें. वर्तमान लिहीत जाणें. जाणिजे. दिल्लीहून वर्तमान आलें कीं अबदालीनें मारेकरी सुज्याअतदौलास घातले होते. त्यास ते व कागदपत्र सांपडलें. सुज्याअतदौला यांणीं त्यास मारलें. त्यास याचाहि मजकूर कसा तें लिहिणें. तुमची बातमी बारीक मोठी रीतीनें फारच आहे. तुह्मांकडे खबर येऊन मग इकडे यावयास उशीर लागतो. त्यास अबदालीचे लष्करांतून व सुज्याअतदौला याचे लष्करांतून बातमी परमारें इकडे यावी. असें करणें. पैकियाची तरतूर्व केली. परंतु, येत नाहीं. येथे वोढ. उज्जनीहून पैका आला. परंतु पंधरा रोजांत उडून जाईल. भरंवसा मातबर पैकियाचा तुमचाच. त्या सत्वर पैका येईसा पाठवणें. भदावराकडून वाट चांगलीच आहे. जरूर रवानगी करणे. जाणिजे. पंधरा रोजांत पांच लाख रु॥ जरूर पाठवणें. हे विनंति.