प्रस्तावना

ह्या विवेचनाच्या आतांपर्यंतच्या भागावरून एवढें स्पष्ट आहे कीं, पानिपतच्या मोहिमेचें अपयश जर कोणाच्या माथी मारावयाचें असेल तर त्या शिक्षेला गोविंदपंत बुंदेले हाच सर्वथैव पात्र आहे. अबदालीच्या पेंचामुळे गोविंदपंताला भाऊकडे येतां आलें नाहीं असा बिलकूल प्रकार नव्हता. मुद्दाम बंहाणे करून व सबबी सांगून ह्या गृहस्थानें भाऊला मदत करण्याचें टाळिलें व आपल्या ह्या देशावर महत् संकट आणिलें. गोविंदपंतानें सदाशिवरावभाऊला मदत तर केली नाहींच, परंतु सुजाउद्दौला, अबदाली, अलीगोहर, मीरजाफर ह्या लोकांकडील बातमी देखील जी वेळोवेळी पाठविली ती पुष्कळदां खोटी असे. खरी बातमी काढावयाचाहि ह्या नीच गृहस्थानें प्रयत्न केला नाहीं. लेखांक २२६ त गोविंदपंत लिहितो कीं अबदाली शुक्रतालावर जाऊन छावणी करणार आहे. परंतु ही बातमी खरी नव्हती. वास्तविक प्रकार असा होता कीं अबदाली शिकंद-यावरच होता. लेखांक २२७ त गोविंदपंत लिहितो कीं मीरजाफर, मिरन व रामनारायण ह्यांना खातरजमेचें पत्र पाठवावे. परंतु वास्तविक प्रकार असा होता कीं जुलैंत मिरन वीज पडून मेला, मीरजाफर मेला किंवा कलकत्यास गेला ह्याचा पत्ता नव्हता व पाटणा येथील सर्वाध्यक्षत्व रामनारायणाकडे आले होतें. दोन्ही पत्रांत केलेल्या चुका गोविंदपंताला सदाशिवरावानें दाखवून दिल्या आहेत. येणेंप्रमाणें गोविंदपंताच्या ह्या खोटेपणाचा हा असा वृत्तांत आहे. दुसरा अपराधी इसम म्हटला म्हणजे मल्हारराव होळकर होय. ह्याच्या कृत्यांची याद मागें मी १७६० पर्यंत आणून पोहोंचविली आहेच. तींत १७५४ व १७५५ त जयाप्पाला दगा करण्यासंबंधींची त्याने केलेली सूचना व १७६० त दत्ताजीला साहाय्य करण्यास केलेला दिरंग ह्यांचा उल्लेख झालाच आहे. आतां पानिपतच्या मोहिमेंत ह्यान कांहीं स्वदेशाच्या अहिताचीं कृत्यें केलीं आहेत किंवा कसें तें पाहावयाचें आहे. नजीबखान, सुजाउद्दौला, माधोसिंग, बिजेसिंग व सुरजमल जाट ह्यांच्याशीं मल्हाररावाचें रहस्य वाजवीहून फाजील होतें हें सर्वप्रसिद्ध आहे व ह्या ग्रंथांतूनहि त्याचा अधूनमधून उलेख आला आहे. लेखांक २०२ त “ अबदालीस खून तंबी करावी; मल्हाररावाचा या गोष्टीविशी संशय न आणावा; तेहि याच कामावर तयार आहेत ” म्हणून सदाशिवरावभाऊनें सुजाउद्दौल्याला लिहिलें आहे. ह्यावरून एक गोष्ट निष्पन्न होते. ती ही कीं अबदालीस तंबी देण्याचा मल्हाररावाचा निश्चय झाला नव्हता किंवा इच्छा नव्हती असा संशय येण्यास सुजाउद्दौल्याला कारण झालें होतें. मल्हाररावाच्या मनांत नजीबखानाला राखावयाचें फार पूर्वीपासूनच होतें. अबदालीला तंबी द्यावयाची म्हणजे नजीबखानाला तंबी व्हावयाचीच. तेव्हां अबदालीचें पारपत्य करण्याची इच्छा मल्हाररावाची नव्हती असा संशय दृढ होण्यास कांहीं कारणें आहेत हे स्पष्ट आहे.