प्रस्तावना
गोविंदपंत जिवंत होता तोपर्यंत अबदालीला कदाचित शह बसेल व मराठ्यांना कदाचित् रसद मिळेल अशी आशा करण्यास जागा होती. गोविंदपंत वारल्यावर ह्या कादाचित्कत्वाचाहि लोप होऊन बाहेरून साहाय्य मिळण्याचा मराठ्यांना फारच थोडा संभव राहिला. २ जानेवारी १७६१ रोजी पाराशरदादाजी हजार पांचशें स्वार व दीड लाख खजिना घेऊन दिलीहून पानिपताकडे जावयास निघाला (लेखांक २८१ व टीप ३२४). तो चार जानेवारीला अबदालीच्या लष्करांत चुकून गेला. तेथें कांहीं स्वार मारले गेले, कांहीं मराठ्यांच्या लष्कराकडे निसटले व कांहीं दिल्लीकडे परत आले. हा मराठ्यांना साहाय्य करण्याचा दुसरा व शेवटला प्रयत्न झाला.
येथें पानिपतच्या मोहिमेसंबंधीं ह्या पुस्तकांतील अस्सल पुरावा संपला. ह्यापुढें पानिपतास मराठ्यांचे काय झालें तें बखरींवरून व तवारिखांवरून ढोबळ रीतीनें कळण्यासारखें आहे. १७६१ च्या १४ जानेवारीला झालेल्या पानिपतच्या शेवटल्या युद्धासंबंधीं (टीप ३२४) आजपर्यंत अस्सल असें एकहि चिटोरें उपलब्ध झालें नाहीं. आरळ्याचा कुळकर्णी नारो भगवंत ह्याची ग्रांटडफ्नें घेतलेली जबानी मात्र अस्सल समजण्यास हरकत नाही. परंतु ती पानिपतच्या युद्धाच्या एका शेंवटल्या क्षुल्लक प्रसंगासंबंधी असल्यामुळें युद्धाच्या हकीकतीवर प्रकाश पाडण्यास तिचा विशेष उपयोग नाहीं. अस्सल पुराव्याची कांहीं तरी कसोटी जवळ असल्याशिवाय बखरींतील किंवा तवारिखेंतील अमुक मजकूर विश्वसनीय आहे व अमुक नाहीं हें सागणें निव्वळ पक्षपाताचें व आग्रहाचें होईल. पानिपतच्या शेंवटच्या युद्धांत विश्वासराव मरेपर्यंत मराठ्यांना जय मिळाला किंवा नाही; विश्वासराव वारल्यावर भाऊच्या मनांत परत जावयाचें असतां, जेव्हां अबदाली चाल करून आला तेव्हां भाऊला निरुपायानें त्याला तोंड देणें भाग पडलें किंवा नाही; मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड ह्यांनीं लढण्याच्या कामीं कांहीं कसूर केली किंवा कसें; वगैरे बरेच प्रश्न सोडवावयाचे आहेत; परंतु अस्सल कागदपत्र एखादें सुद्धां जवळ नसल्यामुळें व्यर्थ, किंवा फार झालें तर किंचित् संभाव्य असा निर्णय काढण्याच्या कोरड्या खटपटींत पडण्याची माझी इच्छा नाहीं व काहीं फायदाहि नाही. शिवाय खुद्द लढाईसंबंधी अस्सल कागदपत्रें पुढें मागें बाहेर येण्याचा संभव नांहींच असें नसल्यामुळें मी त्या वादांत सध्यां शिरत नाहीं. बाकी तो वाद बराच महत्त्चाचा व मनोरंजक होण्याचा संभव आहे.