[२०८] ।। श्री ।। २५ जून १७६०.
राजश्री गोविंद बल्लाळ गोसावी यांसिः
विनंति उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. सुज्याअतदौलाचा मजकूर विस्तारें लिहिला व तुह्मीं त्याशीं इतबार पुरावयाचें लिहिलें तें कळलें. ऐशियास, तुह्मी त्याशीं बोलला व तेहि तिकडे जात नाहीं असें बोलतात, हें यथार्थच. परंतु, तुर्त ते बोलतात एक, करतात एक, असें आमच्या बातमीचे रीतीनें दिसतें कसें ? तरी, अलीकडे फौज उतरली, आपणहि अलीकडे आले आणि नजीबखान यास ठेऊन घेतलें आहे. त्यास, त्यांणीं जेव्हां त्यास ठेऊन घेतलें, तेव्हां एक प्रकारें दिसतें. यास्तव कितेक त्याचे मतलब होऊन आमचा उपयोग पडावा यास्तव विस्तरें मजकूर सांगून राजश्री रामाजी२८९ अनंत व राजश्री नारो शंकर यांस रवाना केलें आहे. व फौज मागून येऊन पोहोंचली. त्यास, तुह्मी पुढें सुज्याअतदौला यांस लेहून पाठवावें कीं यांस कितेक आपले खातरदास्तीस्तव, सरकारचे उपयोगास्तव रवाना केले असेत; हे येतात व फौजहि मागून येते तों तुह्मी तेथें मुकाम करावा; नजीबखानास लावून द्यावें आणि तागायत बोलत गेला त्याप्रें॥ शेवटास न्यावें, हेंच उत्तम आहे. असें प्रकारें लेहून, ते तेथेंच राहत बलकी माघारे फिरत असें करवणें. हे उभयतां पुढें पोहोंचल्यावरी यांणी लिहिल्यास तुह्मीं फौज सुद्धां जाऊन पोहोंचणे. वरचेवर तिकडील मजकूर लिहिणें. जाणिजे. सारांश, सुज्याअतदौला याचे मतलब तुह्मीं लिहिले तेच पक्के त्याशीं बोलावें. त्याची निशा करावी व त्याजपासून आपली निशा करून घ्यावी. याचे लांब बोलणें करणें. रूबरू बोलोन पाठवावे. या गोष्टीस तुह्मी जवळ असतां तर ठीक पडतें. तुह्मी जवळ नाहीं, यास्तव तुमचें जाणें लांबणीवर पडतें. रवानगी लवकर व्हावी यास्तव या उभयतांस पत्रें देऊन सविस्तर सांगून रवाना केले असेत. तुह्मीहि त्यास पुढें लेहून इतकेंच पाठवावें कीं तुमचे मतलब तेच तुह्माशीं लांबलचक बोलावे व तुमची पुरती निशा करून घ्यावी व आपले तर्फेची निशा करून घ्यावी, यास्तव यांस रवाना केले असेत; येतील तोंपर्यंत जावयाची उतावळी न करावी, तेथेंच राहावे. असें प्रकारें लेहून पाठवणें. मुलकाचा मजकूर तर तुर्त मुलकाचा पेंच नाहीं. आह्मी आगरियाजवळ आहों. सुजाअतदौलाचा स्नेह आहे तों पेंच कांहीं पडत नाहीं. पंरतु, आपल्या जागा असतील त्यांत दारू, गोळी, दाणा वगैरे सरंजामाचा गल्ला भरणें. मजबुदी ठीक करणें. यद्यप पेंच पडल्यास झुंजत परंतु काहीं भय मानून कांहीं जागा न सोडीत असें करणें. रूबरू बोलणें जाहाल्यास भावगत जशी कळेल तसें त्याशीं बोलावें यास्तव यांस पाठविलें आहे. जसें देखतील तसें बोलतील. यास्तव तुह्मी त्यास आशाच लाऊन ठेऊन तिकडे न जात तें करणें. त्यासहि पत्र पाठविलें असे. त्याचाहि मसुदा पाठविला असे. र॥ छ ११ जिलकाद. बहुत काय लिहिणें. हे विनंति.