प्रस्तावना
भाऊ या वेळीं अबदालीच्या कचाटींत पक्का सापडला. १५ नोव्हेंबरपासून १४ जानेवारी १७६१ पर्यंत मराठी सैन्याची आस्ते आस्ते उपासमार होत चालली होती. तरी भाऊची उमेद व हिंमत जशी होती तशीच होती. २३ नोव्हेंबरला अबदालीचें व भाऊचें पहिलें म्हणण्यासारखें युद्ध झालें. (टीप ३२३ नाना फडणिसाचें पत्र). त्याच्या अगोदर ८ नोव्हेंबराला कृष्ण जोशी संगमेश्वरकर गोळा लागून ठार झाला होता. २३ नोव्हेंबरच्या लढाईत जनकोजी शिंद्यांच्या हस्तें अबदालीचा पराजय झाला. त्यांजकडील सहाशेंपावेतों माणूस जाया झालें व आपल्याकडील दोन अडीचशेपर्यंत झालें. आपल्या सैन्यानें त्यांच्या लोकांना त्यांच्या गोटांत नेऊन घातलें. पुढें दुसरे युद्ध ७ डिसेंबरीं अस्तमानीं झाले (नानाचें पत्र). त्यांतहि अबदालीचाच पराजय झाला. त्याजकडील दीड हजार माणूस त्यांच्याच आराव्यापुढें पडलें होतें. आपल्या आराव्यापुढें त्याजकडील माणूस किती पडले होते त्याचा नानाफडणिसानें आंकडा दिला नाहीं. आपल्याकडील सुमारें दीडशें माणूस ठार व पांच सहाशें जखमी झालें होतें. ह्यावरून ह्याहि लढाईत मराठ्यांना जय मिळाला होता हें स्पष्ट आहे. परंतु ह्या लढाईत एक मोठी हानी झाली. बळवंतराव मेहेदळे ठार झाला. त्यामुळें तिकडील लोकांना बहुत समाधान झालें. आपली मदत नसतांहि, उलट आपण होईल तितकी कुचराई केली असतांहि भाऊसाहेबांचें सैन्य उत्तरोत्तर विजयीचं होत चाललें आहे हें ऐकून व नारो शंकरादि मंडळीनें तोंडांत शेण घातलें तेव्हां गोविंदपंताच्या मनांत कांहीं निराळी भावना होऊन, पंतमजकुरांनीं चार लाख रुपये घेऊन दिल्लीचा रस्ता धरिला. गोविंदपंताला दिल्लीकडे येण्यास दुसरेंहि एक कारण झालें. श्रीमंत नानासाहेब पेशवे स्वत: पंचवीस तीस हजार फौज घेऊन भाऊच्या साहाय्यास कुच करून निघाले व सुमारें ब-हाणपुन्यापर्यंत आले, ही बातमी गोंविदपंताला कळली. तेव्हां श्रीमंतापाशीं अबू राहावी ह्या हेतूनें गोविंदपंत २२ डिसेंबराच्या सुमाराला दिल्लीस आला. आणिलेली रक्कम नारो शंकराच्या स्वाधीन करून पंतांनी पानिपतच्या रोखानें गाजुद्दिनगराकडे कुच केलें.परंतु त्या शहराजवळ अबदालीचा सरदार अताईखान ह्यानें गोविंदपंताला २२ डिसेंबरीं गाठून ठार केलें (लेखांक २७२). कोणत्याहि हेतूनें कां होईना गोविंदपंताच्या हातून ह्यावेळीं अबदालीची रसद बंद केली गेली असती तरी देखील भाऊचें हित झालें असतें. परंतु, राजीखुशीनें ज्याच्या हातून पूर्वी हित झालें नाहीं त्याच्या हातून धन्याच्या भीतीनें, लोकांच्या लज्जेनें किंवा फलाच्या आशेनें आतांहि हित होऊंच नये असाच ईश्वरी संकल्प होता असें दिसतें.