प्रस्तावना

अबदाली २३ अक्टोबरपासून २५ अक्टोबरपर्यंत बागपताजवळ यमुना उतरत होता, त्यावेळीं त्याच्या पाठीवर जर पंतानें शह दिला असता तर मोठें काम होऊन येतें. परंतु, अबदालीला गोविंदपंताच्या हातून यत्किंचितहि उपसर्ग लागेना (लेखांक २६०). अबदाली यमुना उतरून बागपत गणोरावरून संभाळकियास आला तेव्हां भाऊनें गोविंदपंताला अबदालीची रसद मारण्यास पुन्हां हुकूम केला. “तुम्हीं जलदीनें यमुनेपलीकडून येऊन बागपतेपर्यंत धुमामा चालवून अबदालीस रसद न पोहोंचें, फौजेस शह पडे, ऐसें करावें. गिलच्यांचा पेच तिकडे नाहीं. यास्तव लांब लांब मजलींनीं येणें. या कामास दिरंग न लावणें. हें काम मागेंच करावें ऐसें होतें. या उपरि तपशील न लावणें. गडमुक्तेश्वर, शामळी वगैरे नजीबखानाचे प्रांत जाळावे. अबदालीस मागें रसद बंद होऊन मुलकाचा बोभाट होय असें जरूर करणें. वारंवार लिहिलें जाऊन अजून तुम्ही उमरगडीच आहां हे अपूर्व आहे ! आतांहि लिहिलेप्रमाणें न झालें तरी मर्दुमीचें काम होत नाहींसेंच झालें! ईरे धरून तडकन येऊन काम करणे.” ह्याप्रमाणें सदाशिवरावानें गोविंदपंताला नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेस लिहिलें (लेखांक २६१). ह्यावेळी भाऊच्या व अबदालीच्या सैन्यांमध्ये अंतर दोन चार कोसांचें होतें. मराठ्यांचे भय अबदालीला इतकें पडलें होतें की, तो फार बाताबेतानें हालचाल करीत होता. चाळीस कोंस पन्नास कोंस धांवून जाण्याची हिंमत अबदालीच्या अंगी राहिली नव्हती. यमुनेच्या अलीकडे आल्याकारणानें ह्यावेळीं अबदालीच्या लष्करांत महागाई फार झाली (टीप ३२१). ती गोविंदपंताच्या पराक्रमानें झाली नसून यमुनेच्या पाण्यामुळें झाली होती. सारांश, अबदालीची हलकी ह्यावेळीं फार झाली होती. ह्याच सुमाराला अबदालीचें व मराठ्यांचे एक युद्ध झालें. त्यांत मराठी फौज विजयी झाली (लेखांक २६२). यवनांचें पारपत्य करण्याचा हुरूप ह्यावेळीं सदाशिवरावाच्या व मराठी सैन्याच्या अंगात अतोनाल भरला होता व तो दोन्हीं सैन्यांची एकंदर परिस्थिती पाहता सर्वथैव रास्त होता. अबदालीला आपण खास गिळणार अशी सदाशिवरावभाऊला पूर्ण खात्री वाटत होती (लेखांक २६१) ही खात्री खरी ठरण्यास एक गोष्ट मात्र होणें जरूर होतें. ती गोष्ट ही की, गोविंदपंतानें अंतर्वेदीच्या व रोहिलखंडाच्या बाजूनें अबदालीची रसद बंद केली पाहिजे होती.

ह्यासंबंधानें सदाशिवरावानें गोविंदपंताला नोव्हेंबरच्या ४ थ्या तारखेला येणेंप्रमाणें लिहिलें:- “कार्यावरी आज्ञेप्रमाणें जातों, ऐशा गोष्टी रिकाम्या (मात्र) लिहितां. निदर्शनास यांतील एकहि येत नाहीं. त्यामुळें तुमच्या कर्तृत्वाची तारीफ वाटते ते कोठपर्यंत लिहावी ! लिहितां लिहितां भागलों ! हें तुमच्या कर्तृत्वास उत्तम नाहीं. अबदालीची आमची गांठ पानिपताजवळ पडली आहे. तोफखान्याच्या आराबा रचून लढाई करावयास तयारी केली आहे. त्याच्यानें इकडे तिकडे जाववत नाहीं व कांहीं करवत नाहीं. पावणे दोन कोंस दीड कोंसाची तफावत आहे. पेंढारी व लुगारे राऊत वगैरे नित्य उंटें, घोडीं, तट्टें, बैल आघाडीपिछाडीवरी जाऊन गोटापासून घेऊन येतात. त्यांचे कोणी पाठीवरहि निघत नाहीं. याप्रमाणें आहे. तुम्ही पत्र पावतांच अंतर्वेदींतून पटपटगंजावरी यांच्या पिछाडीस येऊन पोहोंचणें. सावकाश याल तरी ठीक नाही. लांबलांब मजलीनें येणें.