प्रस्तावना

(४) जातिभेदामुळें मराठ्यांची एकी होण्याचा कधींच संभव नव्हता व कांहीं अघटित कारणांनीं कांहीं वेळ एकी झालीच तर ती लयास जाऊन व जातीजातींत मत्सर उत्पन्न होऊन सर्वत्र बेबंदशाही माजण्याचा संभव होता. तोच प्रकार १७६१ च्या अगोदर थोडाबहुत होऊन पानिपत येथें मराठ्यांचा मोड झाला.

(५) भरतखंडांत सर्व हिंदूलोकांत राष्ट्रीयत्वाची कल्पना परसली नव्हती.

(६) ब्राह्मणांच्या पोटजातींत भेद झाला होता.

(७) सदाशिवरावभाऊंचें वर्तन उद्दाम व सान्निपातिक होतें.

(८) त्यानें इब्राईमखानाच्या तोफखान्यावर भिस्त ठेवून मोगलाई रीतीचा अंगीकार केला.

(९) मराठ्यांची जुनी गनीमी रीत त्यानें सोडून दिली.

(१०) मराठ्यांच्या अंगीं पूर्वीचा कांटकपणा राहिला नव्हता. त्यांच्यामध्यें चैनबाजीचा प्रवेश झाला होता.

(११) सडे जाऊन युद्ध करण्याचें सोडून सदाशिवरावभाऊनें कबिलेबुणगे बरोबर घेतले.

(१२) त्यानें दिल्लीचें तख्त फोडून तद्देशीयांचे वैर संपादिलें.

(१३) सुजाउद्दौल्यानें अबदालीशीं तह करून देतों म्हणून थाप देऊन मराठ्यांचा विश्वासघात केला.

(१४) गिलच्यांच्या धिप्पाड व अर्बुज शरीरांपुढें मराठ्यांच्या ठेंगण्या व हलक्या मूर्तींचा टिकाव लागला नाहीं.

(१५) सदाशिवरावभाऊनें रघुनाथरावदादासारख्या अनुभवलेल्या शिपायाला ह्या मोहिमेचें सेनापतित्व दिलें नाहीं. सदाशिवरावभाऊला लढाईचा सराव नव्हता.