प्रस्तावना

अमदाबाद १७५३ त घेतली किंवा १७५५ त घेतली ह्याचा टीपेंत निर्णय करतांना १७५५ हें साल त्यानें पसंत केलें आहे. ह्या निर्णयामुळें रघुनाथरावाच्या हालचालींचा खरा नकाशा त्याला काढितां आला नाहीं. तो कसा काढितां आला नाहीं तें पुढील दोन चार वाक्यांत स्पष्ट करून दाखवितो. ग्रांट् डफ् च्या मताप्रमाणें रघुनाथरावानें १७५५ च्या एप्रिलांत अमदाबाद घेतली. नंतर तो अमदाबादेहून निघाला असल्यास हिंदुस्थानांत जाण्यास थालनेरच्याच मार्गानें आला पाहिजे. थालनेरास येण्यास रघुनाथरावाला जून महिना अवश्य झालाच असला पाहिजे व सबंध पावसाळा थालनेरास रहाणें त्याला भाग पडलें असलें पाहिजे. नंतर १७५५ च्या सप्टेंबरांत तो हिंदुस्थानांत गेला असला पाहिजे व नंतर कुंभेरीचा वेढा व रोहिलखंडाची स्वारी त्यानें केली असली पाहिजे. ह्या इतक्या सर्व खटाटोपी करून, ग्रांट् डफ् म्हणतो, तो १७५६ सालच्या अगोदर म्हणजे १७५५ च्या डिसेंबरांत देशीं पुण्यास आला. परंतु, हे सर्व ग्रांट् डफ् चे तर्क झाले. कारण, रघुनाथराव १७५६ च्या आगस्टांत पुण्यास आले; हे सप्रमाण सिद्ध करण्यांत येतें. ह्याला पुरावा काव्येतिहाससंग्रहांतल्या पत्रें व यादी वगैरेंतील ४५१ वें पत्र आहे. तेथें अंताजी माणकेश्वर लिहितो कीं, दासासाहेबांच्या स्वारीनें नरवरच्या घाटानें येऊन आपल्या सैन्याची झडती घेतली. १७५५ च्या मार्च-एप्रिलांत बाळाजी बाजीराव नाशिक ऊर्फ गुलचनाबाद येथें असतांना अंताजी माणकेश्वर त्यांना ससैन्य भेटला. तेथें त्यांना बाळाजी बाजीरावानें हिंदुस्थानांत जाण्यास सांगितलें. हिंदुस्थानांत जातांना वाटेंत दादासाहेबांची स्वारी नरवरच्या घाटानें परत येतांना त्याला भेटली. ह्यावरून रघुनाथराव १७५५ च्या डिसेंबरांत पुण्यास आले म्हणून ग्रांट् डफ् म्हणतो तें खोटें असून रघुनाथराव जुलै-आगष्टांत पुण्यास आले हें निःसंशय खरें आहे हें सिद्ध आहे. १७५५ त बाळाजी बाजीरावानें व महादाजी पंत पुरंध-यानें बेदनूरची स्वारी केली. बाळाजी कृष्णेपर्यंत जाऊन मध्येंच नाशकाला सिंहस्थाकरितां जाण्यास परतले, ते सलाबतजंगाच्या राज्यांतून कायगांवटोक्यावरून (पत्रें व यादी १६) नाशकास गेले. कायगांवटोक्यावरून बाळाजीला जाण्यास एक कारण झालें, तें हें कीं, सलाबतजंगानें जानोजी भोसले व रघोजी करांडे यांच्यावर स्वारी करण्याचा घाट घातला होता तो इकडून शह देऊन जागच्या जागींच बसवून टाकावा. ह्या (१२) डावपेंचाचें वर्णन ह्या पुस्तकांतील लेखांक ६५ त केलें आहे. हें राजकारण ग्रांट् डफ् ला माहीत नव्हतें. नाशकाहून बाळाजी बाजीराव पुण्यास १७५५ च्या एप्रिल-मेंत आले व १७५५ च्या नोव्हेंबरांत सावनूरच्या स्वारीस निघाले; म्हणजे सरासरी सहा महिने ते पुण्यास होते. असें असून सबंध वर्षभर ते पुण्यास स्वस्थ बसून होते म्हणून डफ् आपल्या इतिहासाच्या १९ व्या भागाच्या प्रारंभीं लिहितो तें त्याला हा मधील डावपेंच माहीत नव्हता म्हणून त्यानें लिहिलें हें उघड आहे. १७५६ च्या जानेवारींत बाळाजी सावनुरास जाऊन पोहोंचला व सावनुरच्या वेढ्यास सुरवात झाली. सावनूरची स्वारी १७५६ च्या जानेवारीपासून जूनपर्यंत चालली होती. मध्येंच रघुनाथरावदादा सावनुरास येऊन मिळाले व तेथून त्यांनीं कितूरास (१३) स्वारी केली. ही स्वारी ग्रांट् डफ् ला माहीत नव्हती. सावनूरची स्वारी चालू असतां गोपाळराव पटवर्धनानें सोंध्यास (१४) स्वारी केली (ऐतिहासिक लेखसंग्रह २, ३). हीहि स्वारी ग्रांट् डफ् ला माहीत नव्हती. गोपाळराव सोंध्याहून निघून बंकापुराजवळ हनगळ येथें उतरला व सबंद पावसाळा तेथेंच काढून पुढें उघाड झाल्यावर त्यानें श्रीरंगपट्टणाकडे मोर्चा वळविला, तों १७५७ फेब्रुवारी आला. १७५७ च्या मार्चांत गोपाळराव श्रीरंगपट्टणापासून दहाबारा कोसांवर होता (लेखांक ५७, ६२). १७५७ तील श्रीरंगपट्टणाच्या (१५) स्वारीचें सर्व श्रेय गोपाळरावास देणें रास्त आहे. परंतु, गोपाळरावाचें नांव सुद्धां ग्रांट् डफ् ला माहीत नव्हतें. मग त्यानें ह्या स्वारींत बहुत मेहनत घेतली हें त्याला कोठून ठाऊक असणार? गोपाळरावाच्या श्रीरंगपट्टणावरील १७५९ च्या (१६) स्वारीसंबंधीं देखील ग्रांट् डफ् नें असेंच मौनव्रत धारण केलें आहे. हें इतकें बाळाजी बाजीरावाच्या स्वा-यांसंबंधीं झालें. ह्याखेरीज कोळवणांतील कोळ्यांचीं बंडें वगैरेसंबंधीं त्याच्या ग्रंथांत माहिती नाहीं हें मुद्दाम सांगितलें पाहिजे असें नाहीं.