प्रस्तावना
येणेंप्रमाणें एकंदर बेचाळीस मोहिमांचे उल्लेख, काव्येतिहास संग्रहांतील पत्रांतून, ऐतिहासिक संग्रहांतील पत्रांतून व मीं सध्यां छापिलेल्या पत्रांतून सांपडतात. ह्याखेरीज आणखी कांहीं मोहिमा १७५० पासून १७६१ पर्यंत झाल्या नाहींत असें मात्र कोणीं समजू नये. गुजराथेंत दमाजी गायकवाड, दिल्लीस अंताजी माणकेश्वर, बुंदेलखंडांत गोविंदपंत बुंदेले, अंतर्वेदींत गोपाळराव गणेश, गणेश संभाजी व गोपाळराव बापूजी इत्यादि मंडळी ह्या अकरा वर्षांत काय करीत होती ह्याचा बिलकूल पत्ता नाहीं. तसेंच जानोजी भोंसले, रघूजी करांडे, विसाजी कृष्ण बिनिवाले, मुरारराव घोरपडे, कोल्हापूकर इत्यादि दक्षिणातील सरदार नक्की काय करीत होते ह्याचाहि बहुतेक बिलकूल पत्ता नाहीं. मराठ्यांच्या इतिहासाचें सध्यां मुख्य भांडार म्हटलें म्हणजे ग्रांट् डफ् चा इतिहास होय. ह्या इतिहासांत ह्या सरदारांच्या कृत्यांचा वृत्तांत मुळींच दिलेला नाहीं; ह्यावरून ती कृत्यें क्षुल्लक होतीं असा ग्रह होण्याचा संभव आहे. परंतु तसा ग्रह होऊं देणें अगदी चुकीचें आहे. ग्रांट् डफ् च्या ग्रंथांत ह्या दहा वर्षांतील घडामोडींची, विस्तृत तर राहुंद्याच परंतु, साधारण समाधानकारक अशी देखील माहिती दिलेली नाहीं. त्यानें लहान सहान मोहिमा तर सोडून दिल्या आहेतच; परंतु, कांहीं मोठमोठ्या मोहिमा देखील गाळिल्या आहेत. त्या त्यानें मुद्दाम गाळल्या आहेत असा म्हणण्याचा भाग नव्हे; तर मिळालेल्या कागदपत्रांचा योग्य उपयोग त्याच्या हांतून झाला नाहीं. जे लेख त्याला मिळाले होते त्यांचें व्यवस्थित वर्गीकरण आणि त्यांची बारीक फोड व उकल त्याच्या हांतून झाली नाहीं. त्यामुळें व कांहीं जरूरीचे कागदपत्र त्याला न मिळाल्यामुळें ह्या मोहिमा त्यानें गाळल्या असें दिसतें. वर दिलेल्या बेचाळीस मोहिमा अगदीं ठळक ठळक आहेत. त्यांपैकीं ग्रांट् डफ् नें कोणकोणत्या गाळल्या आहेत किंवा त्या झाल्या हें माहीत असून अस्सल लेखांच्या कोताईमुळे कोणकोणत्या मोहिमांचा निवळ नामसंकीर्तनापलीकडे जास्त उल्लेख त्यानें केला नाहीं किंवा व्यवस्थित वर्गीकरण न केल्यामुळें कोणकोणत्या मोहिमांची त्यानें गफलत केली आहे तें खालीं लिहितों.