[८९] ।। श्री ।। २७ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १२ मोहरम मंगळवार मध्यानरात्र.
उपरि निजामअल्ली आज दोन गांवावर आले. शहरीहून आठी कोसांवर छ १४ मोहरमीं शहरांत दाखल होणार. बसालतजंग आज सलाबतजंगास घेऊन बाहीर काळेचुल्यावर येऊन डेरे दाखल जाहले. फौजहि बाहेर निघते. यांचा व निजामअल्लीचा संकेत आहे कीं तुह्मीं आलेत ह्मणजे येथून कुच करावे. त्याजपाशीं अद्याप फौज मिळाली नाहीं. सावध नाहींत तो आपण जाऊन गाठ घालावी. उभयतां मिळोन फौज पंधरा हजार शिवाय गाडदी तोफखाना आहे. ऐशीयास तुह्मी बहुत सावध असणें. यांचा पक्का विचार जाला आहे. सूचनार्थ लिहिलें असे. परिच्छिन्न दंग्याचा विचार आहे. कळलें पाहिजे. तुह्मांस भरोसा देत असतील त्यावर न राहाणें सावध असणें. आह्मांस आढळांत गोष्ट आली ते लिहिली असे आह्मी लिहिलें असे कोण्हास कळो न देणें.