प्रस्तावना
१७५२ च्या जुलैंत शिंदे होळकर गाजुद्दिनाला (अ) घेऊन नर्मदेवर आले. इकडून बाळाजीहि औरंगाबादेवर सप्टेंबरात (८) चाल करून गेले. डिसेंबरपर्यंत सलाबताच्या राज्यांत राहून त्यांनीं भालकी येथें सलाबताला यथास्थित चोपलें. शिंदे होळकरांनी (ब) खानदेशाच्या बाजूनें, बाळाजीनें नगरच्या बाजूनें व जानोजी भोसल्यानें अलजपूर-बाळापुरच्या (क) बाजूनें सलाबताला कोंडून टाकिलें. तेव्हां तो तहाच्या गोष्टी बोलूं लागला. रघुनाथरावदादांचाहि हात (ड) ह्या मोहिमेंत होता. मानाजी आंग्र्यानेंहि तुळाजीवर (९) स्वारी केली.
१७५३ च्या जानेवारींत रघुनाथरावदादा भालकीहून निघाले ते थेट गुजराथेंत (१०) अमदाबादेवर गेले; होळकर माळव्यांत गेले; शिंदे देशी मेपर्यंत राहिले; जानोजी गाविलगडावर (११) गेला; व बाळाजी बाजीराव (१२) श्रीरंगपट्टणावर तसेंच चालून गेले (पत्रें व यादी १४). १७५३ च्या जून-जुलैंत दादा थालनेरास आले, नाना श्रीरंगपट्टणाहून पुण्यास आले; होळकर इंदुरास जाऊन बसले; व शिंदे श्रीगोंद्याहून निघून रघुनाथराव दादास मिळण्यास थालनेरास सप्टेंबरांत गेले. दादांनीं १७५३ च्या सप्टेंबरापासून डिसेंबरपर्यंत (१३) माळव्यांतील मवाशीलोक व संस्थानिक ताळ्यावर आणिले.
१७५४ च्या जानेवारींत बाळाजी बाजीराव (१४) होळीहोन्नूरच्या स्वारीस गेले; रघुनाथराव दादांनीं (१५) कुंभेरीस वेढा दिला; व जानोजी (१६) निजामअल्लीवर चालून गेला. १७५४ च्या ३ जुलैस बाळाजी पुण्यास आले; व कुंभेरीहून दादा दिल्लीस गेले; जयाप्पानें (१७) मेडत्याकडे स्वारी केली व विठ्ठल शिवदेवानें सप्टेंबरात (१८) ग्वालेरीस वेढा घातला.
१७५५ च्या जानेवारींत बाळाजी बाजीराव (१९) बिदनूरच्या स्वारीस निघाले, कृष्णेपर्यंत गेले व तेथें महादाजी अंबाजी पुरंध-यावर स्वारी सोपवून सिंहस्थाकरितां टोक्यावरून नाशकास परतले (पत्रें व यादी १६). १७५५ त दादा दिल्ली, रोहिलखंड, कुमाऊ, काशी, प्रयाग, जयनगर, रजपुताना इत्यादि ठिकाणीं (२०) स्वारी करून आगस्टांत पुण्यात आले. जयाप्पानें नागोरास (२१) वेढा दिला. जानोजीनें निजामावर (२२) स्वारी केली. दत्ताजीनें नागोरचा वेढा संपवून (२३) बुंदीकोट्याच्या राणीस १७५६ त मदत केली.