[८७] ।। श्री ।। २७ सप्टेंबर १७५७.
पै॥ छ १२ मोहरम मंगळवार दोन घटका रात्र आवशीची.
अर्ज विज्ञापना ऐसीजे येथील क्षेम त॥ छ १२ मोहरम मंगळवार मुकाम शहर सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. प्रार्थना ऐसीजे. आज्ञापत्र सादर जालें. त्यांत आज्ञा तुह्मीं लिहिता कांहींच आणि सांप्रत शामजी गोविंद व गणेश संभाजी यांणीं लिहिलें कांहीं वेगळें. निजामअल्ली येतो. काय मसलत आहे ? साफ लिहिणें. ऐसियास निजामअल्ली क्रियेप्रमाण भेटीसाठीं मात्र येतो. मधून फिरोन गेल्यानें वराडांतील अमल उठेल. यास्तव भेट घेऊन मागती जाईन ऐसें कुराण पाठविलें. परंतु चित्तांत निजामअल्लीच्या खांटाई आहे तर हेहि सिद्ध आहेत. लढाई मातबर होईल. निजामअल्लीस मारून घेतील. निजामअल्ली येथें येऊन उभयतां बंधू येक होऊन स्वामीपाशीं फिरोन गोष्टी सांगतील. ऐसें जालें तरी ज्या हातें पत्रें सेवकानें लिहिलीं तो हात आपल्या हातें तोडून टाकीन व मी आपली जिव्हाहि छेदून टाकीन. उभयतां भावांचा पेच पाडलाच आहे. सर्व जो मजकूर पूर्वी लिहिला त्यात येक तिळभर अंतर पडलें तर हात तोडून टाकीन. असो. फार काय विनंति ? हुजूर यावयास आज निघालों. हकीमजीहि बारा घटकानंतर बाहेर साता-यापासीं डेरे दाखल जाले. येथें प्रकाराप्रकारचे पेच पाडले. निजामअल्ली सुद्धां गरीबीने यास भेटोन गेला तर उत्तम. न गेला तरी लढाई होईल. नवाब सलाबतजंग व बसालतजंग आज बाहेर निघाले. सिद्ध जाले. स्वामींहि जवळच आहे. जे वेळेस नवाब सलाबतजंग ईशारा करतील तेव्हां कुमक करावी लागेल. सर्व अर्थ उदईक रूबरू अर्ज करीन. हकीमम॥अल्लीखा यांणी पत्र लिहिलें तें अक्षरशा वाचून पाहावें व वाजदअल्लीखा दिवाण निजामअल्लीचा फार मुसाहेब, तेथे सर्व अधिकारी, मातबर विश्वासूक. वाजदअल्लीखा यांणीं सेवकास पत्र लिहिले ते बजिनस हुजूर पाठविले. पाहावे. सर्व पत्र हुजूर पुण्यास रवाना करावयास स्वामी समर्थ. सेवेसी श्रुत होय. हे विनंति.