प्रस्तावना

१७४९ च्या डिसेंबरांत शाहूराजे वारले. १७५० च्या जानेवारींत रामराजे राज्यावर आले. मार्च-एप्रिलांत प्रतिनिधि व त्यांचे मुतालिक यमाजी शिवदेव ह्यांनीं बंड केलें. तें मोडण्यास भाऊसाहेबांनीं सांगोल्यावर (१) स्वारी केली. ही स्वारी १७५० च्या सप्टेंबरांत संपली. (धा. रा. च. ५). शाहूराजाच्या मरणसमयीं शिंदे, होळकर देशीं आले होते; ते १७५० च्या एप्रिलपर्यंत साता-यास होते. पुढें हिंदुस्थानांत बागलाण, खानदेश इत्यादि प्रदेशांतून जातांना त्यांनीं, नासरजंग आर्काटाकडे गुंतला आहे असें पाहून, त्याचे घोडप वगैरे किल्ले (२) काबीज केले. १७५० च्या जानेवारींत रघुनाथरावांनीं गुजराथेवर आपली पहिली (३) स्वारी केली व जुलैंत ते खानदेशांत प्रकाशाजवळ आले (लेखांक २).

नासरजंग १७५० च्या डिसेंबरांत मारला गेला. मुसफरजंगाचीहि तीच व्यवस्था १७५१ च्या जानेवारींत झाली. नंतर बूसी व रामदासपंत ह्यांच्या साहाय्यानें सलाबतजंग मसनदीवर आला. तो कडप्पाहून अवरंगाबादेस परत येत असतांना बाळाजीनें अवरंगाबादेवर १७५१ च्या जानेवारींत (४) स्वारी करून (पत्रें व यादी १६१) व तेथून १५ लाख खंडणी घेऊन सलाबताला रायचूरपाशीं कृष्णेवर मार्चांत गाठिलें व गाजूद्दिन येण्याची भीति दाखवून त्याच्यापासून सडकून मुलूख हबकणार तों साता-यास दमाजी येऊन पोहोंचल्याची वार्ता आल्यामुळें दोन लाखांची चिकीमिरी (Malleson's The French in India P. 275) घेऊन त्याला साता-यास यावें लागलें (पत्रें व यादी १६८). इकडे नाना पुरंधरे, नागोराम मेघश्याम व बापूजी खंडेराव ह्या त्रिवर्गांनीं दमाजीला गेंड्याच्या माळावर (५) वठणीस आणिलें व ताराबाईच्या पक्षाचे हातपाय मोडून टाकिले. हिंदुस्थानांत जयाप्पा, मल्हारराव व साबाजी ह्यांनी (पत्रें व यादी १६८) वजिराच्या विनंतीवरून रोहिलखंडांत (६) स्वारी करून कादरगंजाजवळ दहा हजार रोहिला बुडविला व वजीर फत्तेच्या मसनदीवर बसविला (पत्रें व यादी १६२). मार्चांत कृष्णेवर दिलेल्या त्रासाचा सूड उगविण्याकरितां सलाबत बुसीला घेऊन कोरेगांवापर्यंत आला; तेव्हां त्याला तोंड देण्यास पेशव्यांस (७) स्वारी काढणें भाग पडलें.