[८६]                                                            ।। श्री ।।                २३ सप्टेंबर १७५७.

पे॥ छ ११ मोहरम प्रहर दिवस चढता सोमवार.

श्रीमंत् राजश्री रावसाहेब स्वामीचे सेवेसी - आज्ञाधारक गणेश संभाजी सा। नमस्कार विज्ञापना त॥ छ ८ मोहरम पावेतों सेवकाचें व प्र।। म॥रचें वर्तमान यथास्थित असे. स्वामीनें आज्ञापत्र पाठविलें तेथें आज्ञा जे आटोळे वगैरे पथक ताकीद करून पाठवणें. त्यावरून त्याचे घरोघर जासूद ढलायेत प॥ आहेत. परंतु अद्यापि कोणी एक राऊत आला नाहीं. येक हणमंतराउ आटोळे मात्र हाजीर आहेत. वरकड कोणी येक आला नाहीं. सेवकानें मागती श्रीमंतास आर्जदास्त लिहिली कीं गडबड फार आहे. कांहीं जमाव आणिखी देविला पाहिजे. त्यावरून कुल आटोळे व गाढवे यांस पत्रे आलीं की जालनापुरी गडबड आहे. तों तेथें तैनात राहणे. ऐसीं पत्रें आलीं, परंतु कोणी येक आला नाहीं. घरोघर माणसें तों बैसलीं आहेत. आलियावर लिहून पाठवूं. वरकड निजामअल्लीकडील वर्तमान वरच्यावर लिहिणें. ऐसी आज्ञा. त्यास वराड प्रांत परगणेपरगणेयांतील साहुकार व जमीदार याजपासून जबरदस्तीनें पैका कांहीं हाती लागला तो घेत आले. बाळापुरी कोणी तुळसाजीपंत आहे, त्याणें कांही मामलतीवर कर्ज दिल्हें. ऐसे मिळोन पांच सालाख रुपये पावेतो बाळापुरी जमा कांही जाले. कांही येणें तें घेऊन आपण घाट चढावे तों आपली खासी स्वारी गंगातीरी आली. मग घाट चढणें कठीण होईल या दहशतीनें विठोजीपंत दिवाण मागें पैक्यासाठी ठेऊन आपण घाट चढले; ते अंबडापुरावर आठ मुक्काम केले. तेथून अलीकडे पांच कोस उत्तरापीपेठ अंबडापुरची आहे तेथें येऊन चार दिवस जाले. शेत कापून चारितात व घरें कुल अंबडापुर परगणेयाची जाली. पाऊस दीड मास या प्रांतें नाही. त्यामुळें काडी गवताची नाहीं व खरीफ वाळते गेले. ते जागीर त्या परगणेयाचे असोन लुटितात. शहरास ताबडतोब यावें त्यास पुण्याहून पत्रामागें पत्रे श्रीमंताची येतात कीं तुह्मीं शहरास हरगीज न येणें. हा येक सबब. दुसरें निजामअल्ली बराखुद मीच नवाब ऐसें जाणोन वराड प्रातें व वरघाटें जगिरा लोकांच्या दूर करून नव्यास देऊं लागले. ईमरायमखान गाडदियासी जाफराबाद किल्ला कबिले ठेवावयासी द्यावयाची तजवीज जागीर सुद्धां परगणा द्यावा हें नवाब सलाबतजंगानें ऐकिले. त्यावरून निजामअल्लीस लिहिलें कीं तुह्मास वराड प्रांत दिल्हा आहे तेथील कारभार करणें. वावगी वर्तणूक न करणे. त्यावरून चित्तांत संकोचित होतें. मध्यें शहानवाजखानाचा सलूख जाला ऐसें बसालतजंगानें लिहिलें होतें. त्याजवरून थांबले राहिले व तलबगाडदी फिरंगी याची तलब चढली ते दोन लाख रुपये मागतात. हाहि बखेडा आहे. दिवाण विठोजीपंत बाळापुराहून अद्यापि आले नाहीं. त्याची मार्गप्रतीक्षा करितात. फौज स्वार मोगल सात आठ हजार आहेत व छ ५ मोहरमी जानराव आटोळा पहिलेपासून भोसलेयाचा चाकर आहे. तो चारशें रावतांनसी दाखल जाला व त्याच दिवसीं त्याकडील किरकोळ पथकें निजामअल्लीपाशीं सात आठेकशें राऊत आले. याच वाटेनें खंडागळा जमा होत होत हजारेक रावतानशीं जाऊन दाखल जाला. याउपरी मागती शहरास येणार ही बातमी दाट आहे. बातमीवर माणसें पाठविलीं आहेत. जैसें वर्तमान येत जाईल तैसें लिहून पाठवीत जाईन. चरण पहावयाचा बेत सेवकाचा फार आहे. परंतु निजामअल्ली शहरास जाई तोंवर गडबड फार आहे. यासाठीं आजपावतों मार्ग पाहिला. सुबत्ता पाहून येईन. निजामअल्ली या प्र।।याची, सात परगणे मोगलाईचे जागिरीचे जुजबी वस्ती राहिली आहे, तेथें खंडणिया घेतात ऐसें वर्तमान आहे. सेवेसी श्रुत होय. शहरीचें वर्तमान सलाबतजंग काहीं विदेहीसे जाले आहेत. बसालतजंग कारभार करितात. ते बाहेर निघून जाऊं पाहतात. त्याची रखवाली बसालतजंग करितात. ऐसें वर्तमान ऐकिलें लिहिलें आहे. बहुत काय लिहू. हे विज्ञापना.