[२८९] ॥ श्री ॥ ४ जुलै १७६१.
वडिलांचे सेवेसी साटांग नगस्कार विनंति. येथील क्षेम त॥ छ २९ जिलकादपावेतो आशीर्वांदेकरून पुणेत सुखरूप असो. आपण पत्र पाठविलें तें पावलें. तीर्थरूप नाना ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस पुणेस आले. तीर्थरूप बाबांस बरें वाटत नव्हतें. याजकरितां मी तुळापुरीं गेलों होतों. तिकडून तीर्थरूपहि आले. मग बाबांस घेऊन पुणेस अवघे समागमेंच आलों. आपण उभयतां तीर्थरूपास पत्रें पाठविलीं तीं प्रविष्ट करावीं ह्यणवून आज्ञा. आज्ञेप्रें॥ दिली. मुलेंमाणसें तिकडे आहेत त्यांचा मजकूर आपण लिहिला. त्यास, तीर्थरूप नानांच्या विचारें आठचार दिवस गलबल करूं नये. तुह्मी येथें याल त्याउपरि आणावयाची तजवीज करावी लागेल. सारांश, तिकडून इकडे आणावीं लागतील यांत तो गुंता नाहीं. परंतु नेहमीं तिकडे होतीं याजंकरिता तुर्त गलबल आधींच करतां नये. याप्रें॥ बोलले. त्यांचे हातचें उत्तर सकाळ रवाना करतों. भावगर्भ बोलल्याचा लिहिला. सांप्रत उभयतां श्रीमंत सातारेस जातात. मंगळवारी पुणेहून निघोन जातात. आणि दहा बारा दिवसांचीं दानें वगैरे. नेहमी तेथें जाऊन समीप असावें लागेल. त्याजकरितां तपशील ल्याहावयास ठीक पडलें नाहीं. सकाळ सर्व तपशील लिहून पाठवितों. स्वारीसमागमेंहि मजला जावें लागतें. तुर्त दहा दिवसापासून तेरावा चवदावा दिवस होईतोंपर्यंत नेहमीं तेथून लिहितां नये. स्वारीहि लवकर निघणार. तीहि गडबड सांगातेंच जाहली. सारांश, आपण तेथें फार दिवस राहूं नये. लवकर यावें. दिवस राहावयाचे नाहींत. तुह्मी येथें आल्याउपरि प्रकार सर्व नजरेस पडेल. त्या डौलावर कराल. यास्तव जरुर यावें. श्रीमंतांचा आजचा बारावा दिवस आहे. दानधर्म उत्तम प्रकारें दानें वगैरे होतच आहेत. राजश्री माधवराव क्रिया करितात. तेरावा दिवसहि उत्तम होईल. श्रीमंत राजश्री माधवराव सातारियास जाणार. एक विचार, एकटेच जाणार. एक विचार, दादाहि बराबरीच जातील. मुत्सदी अवघे बरोबर सातारा जातील. श्रीमंत राजश्री नानासाहेबीं राजा करावयाचा नेमिला होता तो राहिलासा जाला आहे. श्रीमंत राजश्री दादांचे च गोपिकाबाईंचे मतें ताराबाईचे विचारें जो राजा बसवावयाचा अगर न बसवावयाचा विचार जो करितील त्याप्रें॥ ताराबाईचे विचारें करावें. त्यास रामराजाच बाहेर काढावा असें असे. श्रीमंत राजश्री माधवराव उद्यांच्या सोमवारीं सातारियास जाणार. सप्तमीस पेशवाईचीं वस्त्रें घ्यावयाचा मुहूर्त आहे. राजश्री त्रिंबकरावमामा व शामरावबाबा व विसाजी दादाजी तिघे सातारा आहेत. राजा बाहेर काढावा, क-हाड, वाई प्रांत त्याजकडे द्यावा, असेंहि करतां न ऐकत तरी जसा कळेल तसा बंदोबस्त करावा. परंतु, आधीं वस्त्रें द्यावीं. मग मजकूर जो करणें तो करावा. सांप्रत मुख्यत्वें सखारामपंत व बाबूराव फडणीस हे दोघे एक विचारें आहेत. असें आहे. राजश्री दादासाहेबांपाशीं पेश रामचंद्र गणेश व कृष्णराव काळे या दोघांची चाल बहुत आहे. आबा पुरंधरे व नाना पुरंधरे हेहि आहेत. पुढें कसकसा मजकूर होईल तो लेहून पाठवीन. तमाम शिलेदारांस पत्रें पाठविलीं आहेत. समजाविशी करून, नालबंदी देऊन, फौज जमा करावी असें आहे. अशीहि बोली आहे कीं श्रावण शुद्ध प्रतिपदेस डेरादाखल व्हावें. श्रीमंत राजश्री माधवरायांनी वस्त्रें घेऊन सातारियाचा बंदोबस्त करून पुणियास यावें. मग बाहेर स्वारीस निघावें. राजश्री माधवरायांनीं घरीं देशीं दहा हजार फौजेनसी असावें, दादानीं स्वारीस जावें, असें आहे. जागाजागा विचार होतच आहेत. पुढें कसकसें होईल तें लेहून पाठवितों. हे विनंति.