[२८२] ॥ श्री ॥ २३ फेब्रुवारी१७६१.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत दाजी स्वामींचे सेवेसि:
पोष्य नारो शंकर साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल छ १७ रजब पावेतों मु।। ग्वालेर यथास्थित जाणोन स्वकीय लेखन करून तोषवीत असावें. यानंतर राजश्री पांडुरंग शंकर यांचे लिहिल्यावरून आपण आमचे ऐवजाचे द्यावयाविषयीं ज्या ज्या प्रकारें राजश्री बाळाजीपंत बाबा यांसि बोलिलेत त्या कृपेचा साद्यंत अर्थ कळोन बहुत समाधान झालें. ऐसाच आपला स्नेह अकृत्रिमभाव आह्मांसी आहे. चित्तास चित्त साक्ष साक्ष असे. ऐसियासि राजश्री बाबा यानीं निश्चयास अंतर करावें, उचित नव्हे. भगवत् कृपेंकरून श्रीमंतांचे राज्य कायम आहे. आजच कोण्ही हितोपदेशी सांगत असतील त्याजवर दृष्ट देऊन, तरते बुडते पाहून, आत्मस्वार्थ ध्यानांत आणून, बाबांनी आमचा ऐवज कैलासवासी पंतानीं करार केला त्या वचनावर दृष्टि न देतां न द्यावा, व हिलेहवाले करावे व ते खासा भिंडेंत वचन बोलिले तें अनृत करावें, विहित नाहीं. शेवट आमचा ऐवज त्यांस सुटणार नाहीं. ऐक्य परमार्थ राखून देतील, तर घेऊं; नाहीं तर श्रीमंतांसमक्षहि ते देतील व आह्मी घेऊं. परंतु या समयीं आह्मी ऐवज दिल्यानें उपकारी होतों व पूर्वापर स्नेह वृद्धिंगत होतो. इतकें लक्षून कार्य करून घ्यावें हेंच उचित आहे. सांप्रत सरदारांनीं ताकीदपत्रें दिलीं तीं पाठविलीं आहेत. त्याप्रमाणें ऐवज निश्चयानरूप ऐवजाचा निकाल करून पांडुरंग शंकर यांच्या ऐवजासुद्धां रवानगी करावी. तुह्मीं चार लक्ष विसाचा ऐवज झाडा दिल्लींत लिहून दिला. पर३२५ त्याबरोबर ऐवज पांचशें रुपये तुह्माकडे नक्षा आला तो जमेस न धरिला. याजमुळें पांचशें हिशेबीं बाकी व ऐवज झाड्यापैकीं आठ आणे येतां पांचशें अर्धा रुपया हिशेबाची नकल पाठविली आहे. त्याप्रमाणें मनास आणून ऐवज राजश्री पांडुरंग शंकर यांचे स्वाधीन करावा. आह्मींहि बाबांस बहुत प्रकारें लिहिलें आहे, आपणहि समजून सांगावें. त्यांचे तुमचे सर्वांचे विचारास आलिया कराराप्रमाणें लक्षा रुपयांचा निकाल करून द्यावा. कदाचित् ऐवज नच द्यावा असें सर्वांचे चित्तास आलें, तर आह्माकडील दस्तऐवजीं कागदपत्र सर्व देऊन श्रीमंतास पत्र देऊन राजश्री पांडुरंग शंकर यांची रवानगी सत्वर आह्माकडे करावी. विलंब न करावा. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
