[२७२]                                    ॥ श्री ॥     २३ डिसेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गंगाधर गोविंद स्वामी गोसावी यांसि:

पोष्य सदाशिव चिमणाजी-विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. गोविंद बल्लाळ दिल्लीकडे फौजसुद्धां आले. गाजद्दी नगरानजीक त्यांचा व गिलज्याचे फौजेचा मोकाबला होऊन गोविंदपंताच्या३२३ फौजेनें शिकस्त खाऊन पळाली. मशारजिल्हे झुंजीत राहिलें ह्मणोन वर्तमान येथें आलें. बाळाजी गोविंद फौजेसमागमें गेले. ते व सारीं फौज कोठें एके जागा होईल तें लिहिले आलियानंतर कळेल. ते एके जागा होऊन दिल्लीस येतील. त्यास गोविंदपंत राहिले हें वर्तमान तिकडे कळल्यानंतर मामल्यांत जमीदार वगैरे फिसाद करितील. तर तुह्मीं सावधपणें राहून, शिबंदी अधिक उणी लागली तर ठेवून, कोठें फिसाद न होतां, पूर्ववतप्रमाणें बंदोबस्त राहे तें करणें. मशारनिल्हेचे पदरीं मातबर शिवराम गोविंद वगैरे आहेत, त्यांचें समाधान राखोन सर्व गोष्टींचा बंदोबस्त करणें. मोगलाकडील कोणी दहा पाच हजार फौज घेऊन येऊन तीकडील अमल करितो असें नाही. परंतु इकडील गोविंदपंतांच्या वर्तमानानें तीकडील जमीदार चार आहेत ते तूर्त डोई उचलितील, दंगा करितील, ठाण्यास दगा करितील. यास्तव मजबुदींनें राहून ठाणियांत जे जे आहेत, त्याचा पुस्तपन्हा वरचेवर करून ठाणीं मजबूत रहात तें करणे. कदाचित् वसुलास जमीदारांनी चार दिवस खलेल केलिया पुढें सर्व नीट केलें जाईल. परंतु ठाण्यास दगा जालियानें वाईट. यास्तव ठाणीं सर्व फार हिमतीनें राखणें. तुह्मी तिकडे आहां. गोविंदपंतांनीं मातबर शिवराम गोविंदासारखे पदरी बाळगले आहेत. त्यास हिमत धरून अशा समयांत गेली गोष्ट सुधारून दाखवावी. झाले गोष्टीचा खेद न करावा. ईश्वर इच्छेस उपाय नाहीं. तुह्मीं आपलें सर्व प्रकारें समाधान असों देणें. बंदोबस्त उत्तम प्रकारें करणें. इकडील फौज शिकस्त खाऊन तिकडे गेलियानें फारच वाईट दिसतें. यास्तव त्यास तिकडे जाणें उत्तम नाहीं. त्याणीं जमा होऊन मागती दिल्लीस यावें. याप्रमाणें येथून त्यांस लिहिलें आहे. तुह्मीं त्यास याप्रमाणें लिहून ते दिल्लीसच येत तें करणें. त्यामागें तुह्मीं सर्वांनी हिमत धरावी. मामल्यांत बंदोबस्त उत्तम ठाणींठुणीं मजबूद असावी, यांतच सरकारचेंहि काम व तुमचेंहि स्वरूप आहे. + तुह्मी मामलियांत आहां. सर्वांचा दिलासा करून बंदोबस्त करणें. घाबरे झालिया जमीदारच वाखा करितील. दिलांत चिंता न करणें. आह्मी आहों. सर्व नीट करूं. ठाणीं जतन राखणें. मुलुकाचा बंदोबस्त करणें. जाणिजे. छ १४ जमादिलावल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.