[२६८] ॥ श्री ॥ १५ नोव्हेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गो।। यासि:
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. सरकारांत दारूचें प्रयोजन आहे, तरी तुह्मांकडून दारू चार खंडी पांच खंडी असेल ते ताबडतोब रवाना करून दिल्लीस येऊन पोहोंचे ते गोष्ट करणें. या कामास दिरंग एकंदर न लावणे. जलदीनें रवाना करणें. + जाणिजे. छ ६ रबिलाखर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. येथें काम मोठें आहे. वीस खंडी दारू, पांच खंडी शिसें तयार करणें. त्यांत तयार जें असेल तें पत्रदर्शनीं रवाना करणें कीं दिल्लीस लौकर येऊन पोहोंचेशी करणें. फौज सुद्धां लौकर येणें. ऐवज रवाना करणें. हें लिहिलेप्रमाणें एकहि काम होऊन न आलें. फार दिवस खावंदानें लहानाचे थोर केलें, वाढविलें, त्याचें सार्थकT३२२ केलें ! अजून तरी सावध होऊन लिहिलेप्रमाणें येऊन पोहोंचणें. दारू, शिसें व ऐवज दिल्लीस सत्वर पावेसा करणें. दारू फारच लौकर आली पाहिजे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.