[२५८]                                      ।। श्री ।।            १४ आक्टोबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः

पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मांस तिकडे मोठ्या कामास जावयाविषयीं वारंवार लिहिले. परंतु अद्याप राजश्री गोपाळराव गणेश व तुह्मीं गेला नाहीं. कोठें किरकोळ जमीदारांची गढी गांव घेतं बसला आहां हे ठीक नाही. याउपरि लौकर तिकडे जाऊन पेशजी लिहिल्याप्रमाणें गडबड करून धुंद उडवणें. या गोष्टीस हयगय एकंदर न करणें. आह्मीं यमुनेचे पाणी फार याकरितां दिल्लीवरी बसोन उपयोग नाहीं. यास्तव कुंजपु-यास जाऊन अबदुलसमदखान याचें पारपत्य करावें, या अर्थे दरकुच जात आहों. चिरंजीव राजश्री नाना, आपाजी जाधवराव यास दिल्लीस पाठविलें. त्यांनी छ ३० सफरीं अलीगोहर याचे नांवचे गजशिक्के केले. शहरांत द्वाही फिरविली. त्याचे पुत्रास बाहेर काढून ३१३वलीहद केलें. सर्व अलमास खुशाली जाहली. लोकांनीं नजरा केल्या. शिक्के चालते जाहले. मोठा समारंभ केला. तुह्मांस कळावें ह्मणोन लिहिलें असे. आह्मी कुंजपु-याकडे गेलों. इकडे अबदालीचें कुच होऊन आलियावरी उत्तमच जाहलें. दिल्लीकडील मुलुख मागें मोकळा राहिला. इकडेच लढाई पडेल. कदाचित् ते इकडे न येतां तिकडे तुमचे रोखें जाहले तरी बरेंच आहे. आह्मीं पाठीवरी यमुना उतरून अंतवेदींतोन येऊन पारपत्य करूं. कुंजपुरेवाला ठेहरत नाहीं. डावा डोल होऊन दमवायाच्या मुद्यावरी आहे. ठहरला तरी मोर्चे लावून यथास्थितच पारपत्य करूं. तुह्मीं तिकडे सत्वर जाऊन पोहोंचणें. केवळ छोट्या मोठ्या कामास गुंतोन न राहणें. ऐवज लौकर येऊन पावे ऐसा रवाना करणें. दिरंग न लावणें. + तुह्मीं पेशजी लिहिलेप्रमाणें गनीमी मेहनत करून रोहिले सुज्यादौला यांचे प्रांतांत धामधूम होई असें करणें. किरकोळ गढियांचे कामास न गुंतणें. अबदाली आह्मांकडेच येईल. तिकडे आला तरी पाणी आहे तो आहे. चार रोजांत कुंजपुरियाचें पारपत्य करून सारंगपुराकडे उतरून नजीबखानाचे विल्हे लावून पुढें अबदालीचे पाठीवर येऊं. रवाना छ ४ र॥लावल. बहुत काय लिहिणें. अलीगोहरचा शिक्का दिल्लीत पडला, त्याची चिटी पाठविली आहे. त्याप्रमाणें लिहून पातशहाची जरब मोडून याचे नांवें करणें. हे विनंति.