[२५६] ।। श्री ।। ११ आक्टोबर १७६०.
पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी यासिः -
विनंति उपरि. राजश्री गणेश संभाजीनीं बुंधेदेल्यांसीं घसघस लावून छत्रपूरचे गांव मारिले, शहरास उपद्रव लावणार, सावकारा उठतो, ह्मणोन लिहिलें होतें. त्यास त्याणीं त्यांसीं कटकटीचा प्रसंग पाडूं नये, बुंधेले फौजसुद्धां घेऊन हुजूर यावें, येविशीं म।।रनिले यांस परस्पर लिहून पाठविलें आहे, त्याप्रमाणें ते करितील. कदाचित्. हे याप्रमाणें बुंधेल्यांस सांगत असतां ते न ऐकत, तरी तुह्मीहि त्यांस चांगले त-हेनें लिहून सांगोन ऐकवावें. फौजसुद्धां हुजूर येत तें करावें. नाहीं तरी पेशजी चिरंजीव राजश्री समशेरबहादर गेले होते, ते वेळेस तिकडे बखेडा जाहला, फिसाद जाहली. तसा प्रकार होऊं न देणें. जाहलिया सरकार काम ठीक होणार नाहीं. हें सर्व ध्यानांत आणून गणेश संभाजी बुंधेल्यास सांगतील त्याप्रमाणें ते ऐकोन येत. ऐसे करणें. विरुद्ध पडेल तें न करणें. समशेरबहादरास तुमचेच तर्फेचा विरुद्ध ते वेळेस पडला. तसें न व्हावें. तुमची त्यांची पुर्ती ओळख आहे. याकरितां त्यांस स्पष्ट चांगले त-हेनें सांगोन ऐकवणें. जाणिजे. छ १ रबिलोवल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.