[२५५]                                      ।। श्री ।।            ७ आक्टोबर १७६०.

चिरंजीव राजश्री गंगाधर यासि: गोविंद बल्लाळ आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीन जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान साद्यंत कळलें. त्यास चिरंजीव सौ।। लक्ष्मी प्रसूत झाली. कन्या झाली. फार उत्तम झालें. आह्मी बिठुराहून कूच करून रीप नदीवर आलों. गुलोलीचे मामलियाकरितां एक दोन मुकाम करून फडशा करून दरमजलीनीं उमरगडीं येऊन. आतां गुंता नाहीं. वरकड भेटीनंतर सविस्तर बोलोन. अबदालीकडील दोन हजार फौज लुटविली, कुंजपुरेयाजवळ. कुंजपुरा घेरिला आहे. बहुधा घेतला असेल. आह्मी सत्वरच येऊन. गुलोलीवाले यानें सन १८१६ पैसा न दिल्हा. गडी बांधोन राहिला. जर याजला सोडून आलों तर तसेंच राहील. तूर्त ऐवज कांही हातीं येणार ह्मणून मुकाम केला. सत्वरच फडशा होईल. मोहनसिंग गुलोलीवाला दमला. रमईपुरीं गेला. त्याचे मातबर भले माणूस येऊन भेटून गेले. उदईक सर्व येतील. फडशा करून मी येतों. मित्ती भादो व॥ १४. हे आशीर्वाद.