[२१३] ।। श्री ।। ८ जुलै १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कृशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्माकडील हिशेब तिगस्तां चौसाला विल्हे लाविला त्याची नकल व गुदस्तां अजमास करून तुह्माकडे पाठविला आहे त्याची अशी दोन नकला असल अजमासाप्रमाणें व हिशेबाप्रमाणें करून सत्वर पाठवणें. अलीकडे दोन साला तुमचे महालची जमाबंदी कळत नाहीं त्यास जमा व वसूल यांचा अजमास स्थूलमानेंकरून पाठविणें. तुह्मी भेटीस याल तेव्हां समागमें कागदपत्र घेऊन यालच. परंतु अगोदर प्रयोजन कागद पत्रांचें आहे. यास्तव कासीद जोडी याच कामासाठीं पाठविली आहे. याजब।। सदर्हूप्रमाणें पाठवून देणें. रवाना छ २४ जिलकाद. बहुत काय लिहिणें. हे विनंति.