[७४]                                                                    ॥ श्री ॥                                                ९ सप्टेंबर १७५७.

श्रीमंत राजश्री रावसाहेबाचे सेवेसीः-

विनंती सेवक जनकोजी शिंदे कृतानेक विज्ञप्ती. सेवकाचे वर्तमान ता।। २४ छ जिल्हेज पर्यंत यथास्थित असे. विशेष. श्रीमंत राजश्री नानासाहेबाचें आज्ञापत्र गर्भ्या पिंपळगावच्या मुकामी आलें होते. त्यांत आज्ञा कीं मोगलाचा व आपला सलूख झाल्यादाखलच आहे; शहानवाजखान यास जाहागीर द्यावयाची रदबदल मात्र राहिली आहे. तेहि थोडक्या गोष्टीसाठीं तोडितात असा अर्थ नाहीं. गंगातीरास जाऊन जीवनरायास बोलावूं पाठवणें, म्हणोन आज्ञा होती. त्यावरून नेवासें नजीक मुक्काम करून स्वामीची मार्गप्रतीक्षा करीत असो. चार पांच रोज मुक्काम मजकुरीं झाले. स्वामीचें येणें कितीका रोजांनीं होईल तें आज्ञा करावी. शहरीहून१६८ बातमीचें वर्तमान आलें आहे कीं निजामअल्ली एका दो रोजांनीं शहरास दाखल होणार. जानबा निंबाळकर कुच करून गेले. हणमंतराव निंबाळकर याकडील शाहाजी सुपेकर व फिरंगोजी पवार याजबरोबरी फौज देऊन शहरास रवाना केलें. दिवसेंदिवस भारी होत आहेत. गंगा उतरून जावें तरी वकील शब्द ठेवितील कीं सलूख बिघडला. न जावें तरी ते बळावत चालले$ याच्याविशीं आज्ञा काय ते लिहून पाठवावी त्याप्रमाणें वर्तणूक केली जाईल. आह्मांपाशी फौज सासात हजार जमा झाली. आणखीहि वरचेवर येत आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञप्ति. पै॥ छ २६ जिल्हेज, रविवार प्रहर दिवस, सायंकाळ.