तदनंतरें फिरंगि या प्रांति शाळिवाहन शके १४२२ तथा फिरंगि शके १५०० येक हजार पाचशे मध्ये पुर्तुगाला होवोन तारवें दोन घेवोन आले ॥ त्या तारवाचि नावें ॥ येक सीनोर देसकोर व दुसरियाचें नाम बोजिजुझ ॥ हीं दोन तारवें घेवोन कपितान लोरेस लुइस देताव्र कपितान या प्रांति आला ॥ त्याण्हे प्रथम येतां च कोचि बंदर कबज केलें ।। तेथोन गोवें घेतलें ।। तेथोन तारवें अरमाद घेवोन आला ।। शाळिवाहन शके १४३४ तथा फिरंगि १५१२ मध्यें दवण प्रांतासि आले ॥ तेथोन अमदारत्फि करों लागले ।। वेवसाया मुळें बाहादुरखाना समागमे मैत्रिकीचा अर्थ विशेषात्कारें दाखवोन फेतोरि वसईचे बंदरि करावि यैसा प्रसंग उद्भव केला ॥ आणि अर्थ जखातिचा अधिकोत्तर दाखविला ।। ह्मणोन जागा उत्तम फेतारी घालावया कारणे ॥ त्यास उदिमा मुळें पातस्याह्यास हासल होईल आश्या जाणोन बाहादुरखानास तहकिकता मनास आलें जे यास फेतोरि द्यावी ॥ मग बाहादुरखान मिळोन त्या फिरंग्यासि जागा दांडाळया तळया वर नेमिली ॥ सर्व मिळोन तेथे त्या तळया वर नागेश महातीर्थ तेथे घेरा देवोन आईति भिंताडे होति त्यास काम लावोन मजबुद केलि ।। वस्ति फिरंग्याचि जाली ।। अमदानि करित चालिले ।। प्रीतिचि लक्षणें बहुत प्रकारें दाखविलीं ॥ यैसि वर्षे तिन पावे तवं समाधान धरोन मजबुदी अधिकोत्तर करित चालिले ।। भांडि सोळा त्या फेतोरि वर आणोन ठेविलीं ॥ आणि ते प्रसंगि बाहादुरखां दवणेस होता ॥ तेथे तो कपितान त्याण्हे हेर ताहाकिंक जाणोन गोमताचळा होवोन आरमाद आणिलें ॥ मग आपण त्या आरमादाम ईस्यारत नीट देवोन आपण भेट घेवोन बाहादुरखानास भेटविली ।। आपण जावोन त्यास अतिमान्य चाहुडि होवोन जाहाजा वर नेता मार्गि दगा दीधला ॥ तैसे च अवघे दवणे उतरले ।। मारामारि करोन दवण घेतली ॥ तेथोन कांहिक समुद्रमार्गि काहिक पायेमार्गि वसईस आले ।। तेथे होते ते हि पराभविले ।। राज्य अवघें घेतलें ।। यावत माहिम बिंबस्थान पावे तों काबिज केले ।। कर्तव्य जांवदे आलमेद वसईस फेतोरिस होता कपितान त्याण्हे केलें ॥ त्या दिवसा पासोन फिरंगि लेकांचि काब्बजाद जालि ।। तुर्क पातस्या पराजयो पावला ॥ त्या उपर कितेक लोकां सवे समाधान दाखवोन ज्यास जे वस्तु पाहिजे त्यास ते वस्तु दिधली ।। येणें प्रकारें सर्व लोकां सवे समाधान रक्षुन प्रीतीची लक्षणे दाखविलीं ॥ यैसिया प्रकारें मुलुक कबजदस्त केला ।। ज्यांची वतने त्यांस दीधलीं ॥ यैसिया प्रकारें चालवित गेले ।। धर्म ज्याचा त्यास चालता केला ।। यैसें चालविलें वर्षे २५ ।। वरुषा पंचविशि भय निर्माण केलें ।। कीं जो धर्म आपला करिल त्यास राजआज्ञा कीं गोमताचळिं बंध पाठउं ।। त्या भया स्तवं कितेक दुर वोसरले ।। कितेक धरोन गोमांतकि पाठविले ॥ व आपला स्वधर्म स्थापिला ।। ते समई अवघ्यांस अर्थ कळला कीं हे फिरंगी ।। हा शब्दार्थ अर्थि निवडावा ।। ज्ञानि पाहावा ।। या उपरी रामनगराचिया राज्याचे गावं दवणे पासोन यावत् केळवि मणोरे आसेरि माहिम पावे तवं सिवसेजार लागला असे ।। तेथे फिरंग्याहि नित्य घसघस लावोन केळवें माहिम मणोर कित्येक गावं कबज केले ।। त्या नंतर रामनग-याणे आपले ठाइं विचार केला ।। कीं फिरंग्यासि भांडतां पुरे पडत नाही ।। यैसा निश्चये करोन मग देस्तिकिचा अर्थ केला ।। हेजिब वसई फिरंग्या जवळ पाठविला ॥ रदबदल करितां जे गावं फिरंग्याहि घेतले होते ते पुन्हा त्यास दीधले ।। त्या गावांचि चौथाये रामनगरचे रायास द्यावी ।। पुढे राहिले गावांचे वाटे न जावें ।। यैसा तहनामा करोन पत्रें आणि तहनामा ।। पुर्तुगाला पातस्यास रवाना केला ।। कितीयेक रीतिनें रायाचि सीपारस फिरंगि याही लिहिली होति ॥ त्या वरोन पातस्यास समाधान पावोन रामनगरचे रायास पातस्याने पतेंत पाठविलें ।। कीं हरयेक समईं बलकुबल पडीलिया वर तुह्मी मदत करोन दोस्तिकीची सरीयेत करावी ।। व गोवेच विजरेलास आज्ञा पाठविलि कीं त्या रामनगरचे राज्यास मज समाना बहुमान्य करोन समाधान चालवावें ।। तदनंतरे जवारकर कोळि हा रामनगरचे रायाचा उंबराव होता ।। त्याण्हे फितवा करोन कितियेक गावं कबज केले ।। युद्ध करितां त्या कोळियाचे बळ बहुत जाणोन राम, नग-या उगा चि राहिला ।। जे गावं कोळ्याने घेतले त्या गावांचे राज्य कोळि करों लागला ।। आणि वैरसमंव दोघां मध्यें चालत असे ।। या प्रकारें ही हकिकत असे ॥ छ ॥
त्यानंतर तिसरा सेजारि पटेकर राजा पूर्वि निजामस्या कडिल लसकरचा सरदार होता ॥ ते समई गलिमास युद्ध जालें ।। तेधवां याणे दों हाति दोन पटे घेवोन घोडिया वरि श्वार होवोन लढाये तुंबळ करोन गनिमास पराभविलें ।। तेघवां पातस्या निजामस्थाने मेरवान होवोन हा मुलुक या पैकि गावें १६० ईनाम देवोन तेथिल राजा करोन फरमाना दिधला ।। ह्यास ते गावं फिरंग्याहि सिवं सेजारि ह्मणोन त्यासी ही निरंतर घसघस लावोन त्या मधोन फिरंग्याहि जोरावरिने प्रथम गावं ७६ कबज केले ॥ परंतु पटेकर सल्लासि आला नाहीं ॥ आपले जमावा सहित युद्ध करों लागला ।। त्या उपर आणिक गावं फिरंग्याहि कबज केले ।। या करितां फिरंगि जोरावर ह्मणोन पटेकर सल्यासि आला ॥ त्याण्हे हेजीब पाठविला ।। विजुरे जवंळ रदबदल करितां तह केला कीं तुह्मा कडे गावें ४४ राहिले ।। त्यांतिल गावें २२ तुह्मी घेणे ॥ त्याचा उपभोग तुह्मी सुखि करणे ॥ हरयेक पदार्थे आमचे तर्फेन उपद्रव होणार नाहि ॥ बलकुबलेस वसईस हरयेक समई तुह्मी आपले लोकां सहित रक्षावें ॥ यैसा तह मान्य जाला ।। तीं पत्रें पुर्तुगालास पातस्या जवंळ पाठविलीं ।। येथोन वीजुरेन जो तह केला त्या बरहुकुम पतेंत पातस्या हस्तिचे पटेकरांस आले ।। यैसें सख्यत्व चालतां गावांचे सिंवेवरोन कचाट जालें ॥ ते कळ पेटली ।। मग फिरंग्याहि अति माव पदार्थ धरोन मुळि च राज्या वरोन काढिला आणि त्याचे गावं २२ ते हि जोरावरिने फिरंग्याहि घेतले ॥ या प्रकारें पटेकराचि हकिकत असे ।।