यैसा भयाचकित जाला ।। युध्दाचा प्रसंग सांडिला ।। पाहातां संग्रामि आटला ॥ नवलक्ष दळभार ॥ ११ ॥ देवगिरीदगडातळवटीं ।। संव्हार जाला जीवयाती ।। नवलक्ष्याचि गणणा समस्ती ।। जाली देखा ।। १२ ।। भुरदास निवटला रणांगणी ।। तयाचा पुत्र दुखवलासे कर्णी ।। तुर्का माहांमदासी निर्वाणी ।। महायुध्द जालें ॥ १३ ॥ बहुत लोटले नावाणिक ।। मग चित्र लोटला सेनानायक ।। त्याणे पळविले पारके पाईक ।। भुरदासपुत्रें ॥ १४ ॥ महाक्षेत्रि पडिले समरंगणी ॥ माहांमदाचि पुरलि आयणी ।। मग गेला रण सांडोनी ।। आपुले सैन्या माजी ।। १५ ॥ मग समस्त क्षेत्रि बळवंत ।। डोरले जैसे वसंत ।। बळें चालिले मारित ॥ सैन्य म्लेंछाचें ।।१६॥ विंधिती बाण निर्वाण ।। दुश्चित म्लेंछाचें मन ॥ मग धरिला तुर्क दारुण ।। महाविर ।। १७ ।। मग जाला हाहाकार ॥ जीवें धरिला महाविर ॥ धरिलिया वरि रणक्षेत्र ।। जालें येथे ।। १८ ॥ ऐसें युध्द जालें निर्वाणी ।। सैन्य पडिले येक क्षोणी ॥ तो विस्तार लीहितां वाग्वाणी । विस्तारेल अति पैं ॥ १९ ॥ व्यास वक्ता संस्कृती ।। कथा बोलिला यथास्थिती ।। ते मी वदलों प्राकृती ।। अज्ञानयागें ।। २० ।। पुनरपि तो माहामद ।। क्षेत्रिया पासोन जाला हस्तगत ।। मिळाला आपुलिया दळा आंत ।। स्वसंगति म्लेंछासी ।। २१ ॥ ऐका श्रोते यथापुर्वक ॥ कथा सांगितली सकळित ।। मोरे होणार गत अगणित ।। महिमा देवाची ॥२२॥ असो मिळोनियां आपुले दळी ।। बुध्दी केलि बरवी ॥ मेळविले पुनरपी ।। महाम्लेंछ ।। २३ ।। मग केला आपुला निश्चये ।। युध्दी घेणे आह्मासिं जये ।। ह्मणोन उठावले महाबळिये ।। क्षेत्रियां वरी ॥ २४ ॥ मारणे किवा मरणे ।। मागें कोण्हि न पाहाणे ।। युध्दासिं मीसळणे ।। महाविर हो ॥ २५ ॥ वाजिल्या भेरि तुतारे ।। रणसींगे अपारे ।। हांका मारिती गजरें ।। घोर शब्द होतसे ॥ २६ ॥ तैसे च क्षेत्रि मिळाले ।। दोन्हि भार आदळले ।। महांमारि पेटले ।। येकमेकां वींधिती ॥ २७ ॥ येश म्लेंछासिं आलें ।। क्षेत्रियांचे दळ आटो लागलें ।। रामरायासीं वधिलें ।। माहामदें ॥ २८ ॥ तेथे जाला हाहाकार ।। रणी पडिला महाविर ।। ईतर ते हि थोर थोर ।। मृत्यु पावले ।। २९ ।। पळापळ सुटलि सैन्यासी ।। म्लेंछ प्रवर्तले महामारेसी ।। प्रेतें नाचति रणभुमिसी ।। सीरे उसळती ।। ३० ।। अशुध्दे चालिला पूर ।। दिवसा पडिला अंधःकार ।। धरणी महाशब्द भुभुःकार ।। शेष दचकला ।। ३१ ।। दिशा चक्र भयानक ।। क्षेत्रि पडले असंख्यात ।। ईश्वरि ईछा यथार्थ ।। रुषिभाषित ॥ ३२ ॥ म्लेंछासि आला जयो ॥ क्षेत्रि पाबले पराभवो ।। युगप्रमाण अन्वयो ॥ सहजें चि आला ।। ३३ ।। ऐसि जालि शांती ।। तृप्त पावली भुतयाती ।। म्लेंछ आपुले बळें राज्यें घेती ।। क्षेत्रियांचीं ।। ३४ ॥ मोहोरे होणार यकाकार ।। म्हणोनि म्लेंछासि आधिकार ।। वशिष्ट सांगोनि गेला महाथोर।। सूर्यवंशासी ।। ३५ ।। ऋषिभाषित यथार्थ ।। भविष्योत्तरि कथिलें सत्यार्थ ॥ रुषि वक्ता पुंण्यमूर्त ।। यथानुक्रमे ।। ३६ ॥ तें उचिष्ट मज लाधलें ।। ह्मणोन अन्वयि आणिलें ॥ भविष्यार्थ बोलिले ।। सत्यमेव ।। ३७ ।। प्राकृत वदलों यथानिती ।। पुराणे मीळति संमती ॥ शैयाद्रिखंडी पुणती ॥ भाषित केलें ।। ३८ ।। ब्रह्मोत्तरखंडिची कथा ।। अन्वयें आणिली यथार्था ।। श्रोते ऐकावि स्वात्महिता ।। पुर्वउत्पन्नता यावत् प्रळये ।। २९ ॥ मी अज्ञान मुढ मंद ।। अन्वयि बोलिलों प्रसिध्द ।। क्षमा मागतों शब्दोपशब्द ।। निवडोनि घ्यावा ॥ ४० ॥ आतां विनती सर्वांसी ।। क्षमा मागतों तुह्मा पासी ।। वेळोवेळा चरणासी ।। लागेन सहजें ॥४१॥ भगवान् दत्त म्हणे ।। श्रोत्यासि विनवी कृपापणे ।। संपुर्ण ग्रंथ येथोन ।। म्या केलासे पूर्ण पैं ॥ ४२ ॥ इति श्रीचिंतामणिकौस्तुभपुराणे ईश्वरपार्वतिसंवादे वंशविवंचनकथानाम चतुर्थोध्यायः ।। ४ ।।
श्रीगणेशायनमः ।। स्वस्त श्रीनृपविक्रमाकसमयांति संवत ५७४ माहे फाल्गुन शुद्ध ९ रविवार ते वर्तमानि माहाराज राजाधिराज सिंहासनमंडित सिंहिंसंग्रामतिलअरीरायविभांड श्रीसवीतावंशभुपति पाठाराज्ञांतिसमांधि मुळपुरुष रामराजा ।। गोत्र भारद्वाज ।। कुळदेवी प्रभावती ।। उपनाम राणे ।। त्या पासोन त्रिपाळराजा ॥ त्याचा पुत्र भानराजा ।। तयाचा पुत्र त्रिंबक-राजा ।। तयाचा पुत्र गोविंदराजा ॥ तयाचा कृष्णराजा ।। त्याचा वंशिक राजा रामदेवराज ।। त्या रामदेवाचें राज्य घटिका चहु मध्ये ४ सुलतान आलावदिनाने घेतलें ।। सेवाटि रामदेवरायासिं पराभविलें ।। तो रामदेवराजा व आणिक राजे देशोदेशिचे ॥ सूर्यवंशि तथा सोमवंशि ॥ राया समागमि पैठणि आले ।। तेथे राजधामि राहिले ॥ त्या रामदेवरायाची जेष्टपुत्र केशव देवगिरी किल्यावर सिंहासनारूढ केला ॥ द्वीतिये पुत्र राजा बिंब उदयपुरासि स्थापिला ॥ तृतिय पुत्र प्रतापशा अलंदापुर पाटणि राज्याधिकार दिधला ।। यैसिया प्रकारें आपले समुदायें ज्याचा तो पुरषार्थें राहिला तदनंतरे शालिवाहन शके १२१० मध्यें पैठणास सुलतान अलावदिन याणे चाल करोन युद्ध केलें ॥ तेथे हि रामदेवराजा तथा आणिक सोमवंशि राजे थोर प्रभु पराभवातें पावले ।। तो वर्तमान देवगिरीस श्रृत जाला ॥ त्याणे तो किल्ला बळकावोन आपले पुरुषार्थे राहिला ॥ तदनंतरें उदयपुरास राया बिंबास वर्तमान श्रृत जाला ।। तेथोन त्याणे चाल करोन गुजराथ काबिज केली ॥ प्रांत सालेरमोलेर नंदनबारे दाहिठें केशवपुर वडानगर पावेतों पावले ॥ आपलें ठाणे बैसविलें ॥ आणि प्रतापशा हा कनिष्ट बंधु ।। सन्निध राजगुरु हेमाडपंत समवेत अलंदापुरास आला ।।