४५. उत्तरकोंकणांतील लोक राष्ट्रपराङमुख व एकसमाजपराङमुख किती होते ह्या विधानाला पोषक असे तीन प्रसंग प्रस्तुत बखरींतून व बिंबाख्यानांतून निर्दिष्ट करतों. (१) केशवाचार्य व नायकोराव यांनीं शक १३७० त माल्हजापुरीं जो लोकसमूह जमविला तो जमविण्याचा हेतू तुर्काना हांकून देण्याचा राजकीय नव्हता, तर विसरत चाललेला महाराष्ट्रधर्म लोकांना कळविण्याचा आचारविषयक होता. (२) तुर्कांनीं उत्तरकोंकणांत बळजबरीनें राज्य स्थापिलें, तेव्हां त्यांच्या विरुद्ध खटपट करण्यांत लोकांची शक्ति खर्च झाली पाहिजे होती, अशी साधी समजूंत करून घेण्याचा मोह वाचकांना पडण्याचा संभव आहे. परंतु खरा प्रकार असा होता कीं तुर्कांचा द्वेष करण्या ऐवजीं आपसांतील क्षुद्र मानापमानाचे खटले अजाण अश्या तुर्क अधिका-यांच्या मार्फत लडिवाळपणें निवडून घेण्यांत निरनिराळ्या जाती व लोक भूषण मानीत. ह्याचा अर्थ असा कीं राज्ययंत्र कोणाचे हि असलें तत्रापि त्याचा द्वेष लोक करीत नसत, का कीं द्वेष करण्याचें तितकें प्रयोजन भासत नसे. फार झालें तर एका भुकेबंगाल उपटसुंभाचें लिगाड जाऊन दुस-या भुकेबंगाल अधाशाचें पिशाच्च आलें, एवढी भाषा लोक वापरीत, शिपाई कारकून मोजणीदार सुभेदार इत्यादि लहानमोठ्या सरकारी हस्तकांना भामटे चोर व भिक्षेकरी मनांतल्या मनांत म्हणत आणि त्यांच्या आंगा वर लांकूड, फाटें, गवत व वैरण महारा करवी तुच्छतेनें फेंकून देत. ह्या हून प्रखर प्रतिकार करण्याचें गांवक-यांच्या किंवा देशांतील लोकांच्या स्वप्नीं सुद्धां नसे. (३) राज्यकर्ते व सर्वसामान्य लोक ह्यांच्या दर्म्यान प्रेमभाव व सहानुभूति किती अल्प होती तिचा निदर्शक असा एक उतारा मज जवळील लेखी बिंबाख्यानातला देतों. संकटसमयीं सर्वसामान्य लोकांचा आपल्याला विशेष उपयोग होणार नाहीं व निर्वाणीच्या प्रसंगीं गाठीं बांधून ठेविलेलें द्रव्य तेवढें उपयोगीं पडेल, अश्या बालंबाल खात्रीनें बिंबदेव जाधवानें अगणित द्रव्य जागो - जागीं पुरून ठेविलें. त्याची हकीकत बिंबाख्यानांत द्रव्यचिकिछासांखळि नांवाच्या समाप्तीच्या अध्यायांत दिली आहे ती अशी:-
॥ श्रीगणेशाय नमः ॥
॥ अथ द्रव्यचिकिछाः ।।
आतां थोडकसा प्रश्न ।। प्रतापपुरिं महाल जाण ॥
रायें केलें अनुसंधान ।। सर्व खजीन्यां साटीं ।। १ ॥
तेथें XXX भुयार केलें ॥ तेथें येक पूर्व दिसेस स्थान केलें ।।
तये स्थानि अगणित द्रव्य सांठविलें ।। कोणास अंत न लागे ॥ २ ॥
त्याचि येक खुण ।। तेथें चिरे रुंद जाण ॥
त्याचे उत्तरेस आंगण ॥ ठेविलें असें ॥ ३ ॥
XXX XXX जाण ॥ सर्व धातुमय पूर्ण ॥
खणो खणि जाण ।। XXXXX असे ॥ ४ ॥
असें पुरिलें असंख्य धन ।। राणिं कारणे सांगितलि खुण ।।
हे तुम्हा लागि जाण ।। द्रव्य असे ।। ५ ।।
आगाशिचे डोंगरि वरि ।। सीळा असे फार बरि ।।
X XXX म उखळ धरि ॥ तये खालिं ॥ ६ ॥