३६. दमण, नळें, मोरें, मोरकुरण, केरौली, आंधेरी, इत्यादि ग्रामनामां वरून दिसतें कीं आर्यांच्या किंवा आर्यसमांच्या पहिल्या वसाहती उत्तर कोंकणांत दामनीय, नल, मौर्य, कोरव्य, अंधक, इत्यादि लोकांनीं केल्या. त्यांच्या अगोदर वारली, कोळी, ठाकर हे लोक कोंकणांत येऊन स्थिर झाले होते. नंतर बहुश: आंध्रमृत्यांच्या कारकीर्दीच्या आगें मागें मांगेले आले. कातडी पांघरणारे कातवडी सर्वांच्या आधीं येथें वसती करून आहेत. नागलोक कातवड्यांच्या नंतर व वारलीकोळी ह्यांच्या थोडे अगोदर कोंकणांत आले. ह्या सर्व लोकांची कालानुक्रमानें शेजवार परंपरा येणें प्रमाणें लागेल. कालनिर्देशा वांचून कोणता हि ऐतिहासिक प्रसंग हप्तट्टिके वर नीट बिंबत नाहीं. करतां अत्यन्त स्थूल मानानें ह्या लोकांच्या आगमनाचा अंदाजी काल देतों. तो शातवाहनांच्या पर्यंत फक्त अंदाजी आहे, नक्की नाहीं, हें लक्ष्यांत ठेवावें.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
कातवडी हें शकपूर्व पांच सहा हजार वर्षां पासून आज पर्यंत येथें स्वयंभू आहेत. नाग, वारली, कोळी व ठाकर शकपूर्व दोन हजार पासून पाणिनिकाला पर्यंत हे रान धरून आहेत. शकपूर्व नऊ शें पासून शकोत्तर चार शें पर्यंत म्हणजे पाणिनीय व बौद्ध कालाच्या -हासा पर्यंत दामनीय, माहाराष्ट्रिक, आंध्र, मांगेले, नल व मौर्य कोकणांत शिरले. शक चार शें पासून त्रैकूटक, शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बिंब, नागरशादि राजे, वगैरे जुन्या मराठ्यांनीं शक बारा शें सत्तर पर्यंत आठ शें सत्तर वर्षे राज्य केलें. मुसुलमानांचा अंमल शक बारा शें सत्तर पासून शक चौदा शें साठ पर्यंतचीं दोन शें वर्षे होता. नंतर दोन शें वर्षे पोर्तुगीजांनीं हा प्रांत आक्रमण केला. तदनंतर नव्या मराठ्यांनीं साठ वर्षे स्वराज्य भोगिलें. आणि अलीकडे सवा शें वर्षे इंग्रजाच्या पंजा खालीं उत्तर कोंकण आहे. मुसुलमानांचीं दोन शें वर्षे, पोर्तुगिजांचीं दोन शें वर्षे व इंग्रजाचीं सवा शें वर्षे मिळून पांच सवापांच शें वर्षे कोंकण परकीय अंमला खालीं खितपत पडलें आहे. जुन्या व नव्या मराठ्यांच्या ताब्यांत उत्तर कोंकण साडे नऊ शें वर्षे होतें आणि शातवाहननलमौर्यादींच्या अंमला खालीं तेरा शें वर्षे होतें. मिळून साडे बावीस शें वर्षे उत्तर कोंकण हिंदूंच्या अंमला खालीं होतें व सवा पांचशें वर्षे अहिंदूंच्या अंमला खालीं आहे. कातवड्यांना नागांनीं व वारल्यांनीं रेटलें, नागांना आंध्र मौर्य व महाराष्ट्रिक यांनीं जिंकिलें, ह्यांची जागा शिलाहार, चालुक्य, राष्ट्रकूट व यादव ह्यांनीं घेतली, ह्यांच्या उरा वर मुसुलमान बसले, मुसुलमानांना पोर्तुगीजांनीं उखाडलें, पोर्तुगीजांना मराठ्यांनीं टांग मारिली व मराठ्यांना इंग्रजांनीं खो दिला. हा खेळ गेल्या तीन हजार वर्षे चालला. येथें असा प्रश्न उद्भवतो कीं नवे नवे सत्ताधीश पूर्व पूर्व सत्ताधीशांची उचलबांगडी करीत असतां, कातवडी, नाग, महाराष्ट्रिक, जुने मराठे, मुसुलमान, पोर्तुगीज अस्सल व बाटे, नवे मराठे, हे कोंकणांत कायमची वसती करून राहिलेले लोक निमूटपणें नव्या सत्तेला कितपत राजी होत गेले व नव्या सत्तेला कितपत प्रतिरोध करते झाले ? ह्या भानगडीच्या प्रश्नाचें स्थूल उत्तर थोडेंबहुत देण्याचा प्रयत्न प्रस्तुत प्रकरणाला व इतिहासाभ्यासाला उपकारक म्हणून केला असतां वावग होणार नाहीं.