३५. दमण पासून मुंबई पर्यंतच्या व समुद्रा पासून सह्याद्रिपर्यंतच्या टापूंतील मांगेले, वारली, कोळी, ठाकर, कातवडी, वगैरेंच्या प्रांतांतील नद्या, डोंगर व गांवें ह्यांचीं नांवें पहातां तीं सर्व संस्कृतोत्पन्न आहेत. हीं नांवें वारली वगैरे लोकांनीं वसाहत करतांना दिलीं असावीं हें एक, किंवा ब्राह्मणादि लोकांनीं दिलीं असावीं हें दुसरें. पैकीं वारल्यांच्या व डोंगरी कोळ्यांच्या प्रांतांत ब्राह्मण व मराठे यांची वसती सध्यां तर मुळींच नाहीं व पूर्वी हि थोडी देखील असेल असें म्हणवत नाहीं. औषधाला एखाददुसरा ब्राह्मण किंवा मराठा ह्या प्रदेशांत प्राचीन काळीं असल्यास असेल. तेव्हां नद्या, डोंगर व गांवें ह्यांना संस्कृत नांवें मूळ दिलीं कोणी हा प्रश्न उद्भवतो. उदाहरणार्थ, कांहीं नांवें येथें देतों:-
(नद्यांची नावें वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
इत्यादि आणीक पांच शें गांवांची यादी देतां येईल. कान्हेरी हें डोंगराचें नांव कृष्णगिरि ह्या संस्कृत शब्दा पासून निघालेलें सर्वांच्या परिचयाचें आहे. तात्पर्य नदीनामें, ग्रामनामें व पर्वतनामें येथूनतेथून सर्व संस्कृत किंवा संस्कृतोत्पन्न प्राकृत आहेत. कांहीं ग्रामनामें जातिनामां वरून पडलीं आहेत तीं अशीं:-
१ माछीवाडा (मत्स्यकवाट:) ८ कर्कुट पाडा (कर्कुटपाटकः)
२ महारवाडा (महारवाटः) ९ भोयपाडा (भौमपाटक:)
३ मगरवाडा (मकरवाट:) १० बर्बराचापाडा (बर्बरीयपाटकः)
४ भिलाड (भिल्लवाटः) ११ मांगेलवाडा (मांगेलवाटः)
५ किराट (किरातवाटः) १२ कोळवाडा (कोलवाट: )
६ वारलीवाडा (वारुडकिवाट:) १३ नागपाडा (नागपाटक:)
७ ठाकरियापाडा (तस्करकपाटकः) १४ बामणवाडी (ब्राह्मणवाटिका)
१५ आगरवाडी (आगरिकवाटिका)
हीं सर्वं नांवें किंवा ह्यां पैकीं बहुतेक सर्व नांवें मांगेले, वारली, कोळी, वगैरे संस्कृतोत्पन्न प्राकृत भाषा बोलणा-या लोकांनीं मूलतः ठेविलीं असें म्हटल्या खेरीज दुसरी वाट नाहीं. सोपारें, वालुकेश्वर, ठाणें, कल्याण, दमण, वगैरे किंचित् अपभ्रष्ट किंवा पूर्णपणें संस्कृत नांवें वारली वगैरेंच्या नंतर आलेल्या नल, मौर्य, शिलाहार, दामनीय, इत्यादि पश्चात्क लोकांनीं यद्यपि दिलीं असण्याचा संभव आहे, तत्रापि बाकींचीं बहुतेक सर्व नांवें वारली वगैरे लोकांनीं दिलीं असावीं. सोपारें हें नांव शिलालेखांतून व ताम्रपटांतून शूर्पारक असें नमूद केलेलें आढळतें. परंतु सोपारें ह्या प्राकृत उच्चाराचा हा संस्कृत उद्धार आहे इतकेंच. मूळ नांव सौपर्यम् . सुपरि हा शब्द पाणिनीय संकाशादिगणांत नमूद आहे. तसेंच, शेवलसुपरि ० (५-३-८४) ह्या पाणिनीय सूत्रांत हि पठित आहे. सुपरिणा निवृत्तं नगरं सौपर्यम् . सुपरि नामें कोणी एक व्याक्त. त्यानें वसविलेलें जें नगर तें सौपर्यम् . सौपर्यम् चा अपभ्रंश सोंपरें, सोपारें, सुपारें, कश्याचा अपभ्रंश काय आहे हें न शोधिल्या मुळें सोपारें ह्या शब्दाचें संस्कृत शूर्पारक असें शिलालेख लिहिणा-या व रचणा-या अडाणी लोकांनीं व अर्धवट संस्कृतज्ञांनीं केलें. शूर्पार असा शब्द संस्कृत भाषेंत बिलकुल नाहीं. शूर्प असा शब्द आहे. परंतु अर किंवा आर् प्रत्यय शूर्प शब्दाला कोठून लागला आणि कशा करतां लागला हें कोणीं पाहिलें. नाहीं व अर्धवट संस्कृतज्ञ पहात हि नाहींत. प्राकृत ग्रामनामांचें असलें धेडगुजरी संस्करण अन्यत्र हि अनेक ठिकाणीं आढळतें. उदाहरणार्थ, जूर्णनगर (जुन्नर), शीर्णनगर (सिन्नर), विराटनगर (वाई), महिकावती (माहीम), इत्यादि.