मांगेले, वारली व ठाकर महाराष्ट्रीसम अपभ्रष्ट प्राकृत भाषा आगमनसमयीं बोलत असल्या मुळें, उंबरगांवा पर्यंतचा उत्तर कोंकणचा टापू मराठी भाषेचा झाला. फक्त दुबळे व धेडे तेवढे ह्या टापूंत गुजराथी भाषा बोलणारे टिकले. ते बलिष्ट म्हणून येथें टिकले नाहींत; तर शेती वगैरे कामाला उपयुक्त म्हणून टिकले. उंबरगांवा पर्यंत च तेवढी मराठी भाषा कां व त्याच्या उत्तरेस गुजराथी भाषा कां, ह्या प्रश्नाचें उत्तर महाराष्ट्रीसम प्राकृत भाषा बोलणा-या मांगेले, वारली व ठाकर ह्या जातींचे ह्या टापूंत जें आगमन झालें त्यांत सांपडतें. हे लोक उंबरगांव पासून दक्षिणे कडील कोंकणांत व सह्याद्रीच्या लगतच्या रानांत येण्या पूर्वी कातवडी लोकांची येथें तुरळक वसती होतो व कातवडी लोकांची मूळ भाषा येथें बोलली जात होती. कातवडी लोकांच्या मूळ अनार्य भाषेचें रूप काय होतें त्याचा पत्ता लागण्याचा संभव सुद्धां आतां राहिला नाहीं. डोंगरकोळी व समुद्रकोळी ह्या लोकांचे जे कोल पूर्वज त्यांच्या हि मूळ भाषेचा अत्यन्त लोप होऊन गेला आहे. मांगेले, वारली व ठाकरे ह्यांचे पुरातन पूर्वज जे आंध्रादि प्राचीन लोक त्या लोकांच्या भाषेचें रूप कळण्यास हि कांहीं एक साधन उरलें नाहीं. कदाचित् आधुनिक तेलगू वरून आंध्रांच्या प्राचीन भाषेचा अंदाज अल्पस्वल्प करतां येण्याचा संभव आहे. परंतु वारली व ठाकर ह्यांच्या पूर्वजांच्या प्राचीन अनार्य भाषांचा मागमूस हि आतां लागणें दुरापास्त समजावें.
३४. मांगेली, वारली, ठाकरी, कातकरी, कोळी, कुणबी, पातेणी, चित्पावनी, क-हाडी, सारस्वती, गोमांतकी, गोकर्णी, सोंधेकरी, मिरजी, पंढरपुरी, मंगळवेढी, बेदरी, नांदेडी, रायपुरी, मूळतापी, लाडी, इत्यादि प्रांतिक व जातिक महाराष्ट्री भाषेचे लहान लहान पुंज महाराष्ट्रदेश म्हणून ज्याला सध्यां म्हणतात त्या देशाच्या सीमाप्रदेशा वर दोन अडीच हजार वर्षां पूर्वी व पाणिनिकालाच्या नंतर ठिकठिकाणीं वसती करून राहिले. ह्या सीमा प्रदेशाच्या आंतील विस्तीर्ण टापूंत नागपुरी, अलजपुरी, व-हाडी, खानदेशी, पैठणी, नाशिकी, जुनरी, पुणेरी, भिमथडी, बालेघाटी, नगरी, कोल्हापुरी, मावळी, इत्यादि प्रांतिक महाराष्ट्री भाषेचे शेकडों पुंज वसाहतकालीं स्थिर झाले. रूपसाम्या वरून हे अन्योन्य भिन्न प्रांतिक भाषा बोलणारे पुंज, शालिवाहनाच्या पांचव्या शतकाच्या सुमारास मराठी भाषा हे थोर नांव महाराष्ट्रिक व नाग ह्यांच्या मिश्रणा पासून बनलेल्या मराठ्यांच्या ज्या भाषेस पडलें, त्या भाषेशीं आस्तेआस्ते राजकीय, वैयापारिक, धार्मिक व वाङ्ययिक कारणांनीं समरस होत होत सध्यां बहुतेक शिष्ट मराठी बनले आहेत. शकाच्या पांचव्या सहाव्या शतका पर्यंत हे पुंज थोडेफार तुटक तुटक असत. ते राजकीयादि कारणांनी समरस बनून त्यांच्या सबंद प्रांताला प्रथम त्रिमहाराष्ट्रक व नंतर महाराष्ट्र हें नांव कायमचें मिळालें. महाराष्ट्र जितका महाराष्ट्रिकांनीं बनविला तितकाच बहुतेक मांगेले, वारली, कोळी, कातवडी, लाडी, रांगडी, इत्यादि पुंजांनीं बनविला आहे. हे पुंज जर सीमाप्रदेशा वर नसते तर मराठी भाषेचा विस्तार सध्यां जो दिसत आहे, त्या हून बराच संकुचित व मर्यादित दिसता. सीमाप्रदेशा वरील पुंजांच्या भाषेंतील प्रांतिक लकबा साधुसंतनिर्मित वाङमयप्रसारानें पूर्वी निघून जात व शालोपयोगी छापील पुस्तकपठनानें सध्यां निघून जात आहेत. मांगेले, वारली वगैरे लोकांनीं महाराष्ट्रीय भाषेचीं सीमाप्रदेशा वर ठाणीं व टापू पुरातनकालीं तयार केले. शंभर वर्षां पूर्वी तें च काम ग्वालेर, बुंदेलखंड, माळवा, विलासपुर, बडोदें, म्हैसूर, तंजावर, मिरज, अथणी, बेळगांव, विजापूर, गुत्ती, वगैरे महाराष्ट्रबाह्य प्रदेशा वर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, भोसले व भट राजकर्त्यांनीं मध्यकालीं व अर्वाचीन कालीं पुढें चालविलें. पानिपत येथें महाराष्ट्रधर्म सर्व भारतवर्षांत पसरविण्याचा मराठ्यांचा हव्यास किंचित् विराम पावून शक १७४० त तर अगदींच थंडा पडला. तो च उद्योग माळवा, पंजाब, काफरिस्थान व चित्रळ ह्या प्रदेशांत मानभावांच्या भक्तिमार्गानें गेलीं आठ शें वर्षे चालविला आहे. महाराष्ट्राचा राष्ट्रीय देह जर पुनः सजीव झाला तर पूर्वीचा महाराष्ट्रधर्म, अर्थात् महाराष्ट्रभाषा, भरतखंड भर पसरविण्याचा पूर्वजन्मींचा धागा त्याला सोडून चालतां येणार नाहीं असें भविष्य वर्तविण्याचें कारण नाहीं. जीवमात्राचा हा निसर्गधर्म च आहे.