समुद्रा वर मांगेले, समुद्रा पासून चार मैल पर्यंत दुबळे व चौथ्या मैला पासून पूर्वेस सह्याद्रि पर्यंतच्या दहा पंधरा मैल टापूंत वारली पसरलेले आहेत. मराठी भाषा बोलणा-या वारली व मांगेले ह्यांच्या मध्यें गुजराथी भाषा बोलणारे दुबळे व धेडे पाचरे सारखे अडकले आहेत. मांगेले समुद्र सेाडून जात नाहींत व वारली रान सोडून समुद्रा कडे झुकत नाहींत. मांगेले कोठून व केव्हां कोंकणकिना-या वर आले तें आपणांस अंदाजानें माहीत आहे. दुबळे वे धेडे गुजराथेंतून कोंकणांत उतरले एवढें निश्चयानें सांगतां येतें. आतां वारली कोठून आले तें पहावयाचें. वारली जुनाट मराठी भाषा शुद्ध व उत्तम बोलतात. सूर्यनारायण वगैरे देवांची भक्ति वारल्यांत प्रचलित आहे. लावण्या वगैरे गाण्यांचें तोंडी वाङमय त्यांच्यांत आहे. भुतां खेतां वर त्यांचा दाट विश्वास असतो. तो स्पृश्य वर्गांत बराच मोडतो. असा हा कांहींसा सुधारलेला वारली उतरकोंकणांत स्वयंभू आहे कीं आगंतुक आहे ? बाहेरून कोठून आला तें ज्या संबंधाने सांगतां व अनुमानतां येत नाहीं त्याला येथें स्वयंभू म्हटलें आहे. दक्षिणेस डोंगरी कोळी, पूर्वेस घाटमाथ्या वर कोळी व कातवडी, उत्तरेस गुजराथेच्या बाजूनें कोळी व भिल्ल आणि पूर्वेस दुबळे व मांगेले ह्या चार पांच समाजांच्या मध्यें वारली आहे तो ह्यांच्या मध्यें बाहेरून शिरला किंवा पूर्वापार स्वयंभू आहे ? सध्यांचे डोंगरी कोळी हे पुरातन कोल लोकांचे वंशज आहेत. भिल्ल हे पुरातन रानटी लोक आहेत. कातवडी तर अद्याप हि रानटी आहेत. ह्या तिघांच्या हून वारली जास्त सुधारलेला आहे. तेव्हां ह्या प्राचीन भिल्ल, कोळी व कातवडी लोकांच्या देशांत वारली बाहेरून कोठून तरी शिरला असावा असा तर्क करावा लागतो. कोठून व कसा शिरला तें मात्र सांगण्यास असावें तसें गमक उपलब्ध नाहीं. महाराष्ट्रीसम किंवा मराठीसम प्राकृत भाषा घेऊन वारली कोंकणांत शिरला असें हि म्हणतां येण्यास पुरावा आहे. वरुड नामें करून कोणी एक अनार्य जात होती. तिच्या पासून वारुडकि ऊर्फ वारली ही जात झाली. वरुडांचें नांव कात्यायनाला माहीत होतें. कात्यायन विंध्योत्तर प्रदेशांतील रहाणारा. त्याला त्याच्या प्रदेशाच्या सीमाप्रांता वर रहाणारे वरुड लोक माहीत होते. तेव्हा वारुडकि ऊर्फ वारली हे लेाक उत्तरे कडून कोंकणांत शिरले असावे व शिरण्याच्या वेळीं कोणती तरी महाराष्ट्रीसम प्राकृत भाषा बोलत असावे असा तर्क करतां येतो. कोंकणांत आल्या वर नाग, महाराष्ट्रिक इत्यादि लोकांच्या प्राकृत भाषां प्रमाणें याच्या हि प्राकृत भाषेंत बदल होत जाऊन, तो सध्यां बोलतो ती प्रांतिक किंवा जातिक मराठी भाषा बोलूं लागला व त्या मराठी भाषेंत जुनाट शब्दांचा उपयोग अद्याप पर्यंत करीत राहिला.
३३. वारल्यांच्या टापूच्या दक्षिणेस कोळी, कातवडी व ठाकर लोक रहातात. पैकीं ठाकर लेाक तस्कर ह्या नांवानें कात्यायनाला माहीत आहेत. तद्बहतो: करपत्यो श्वोरदेवतयोः सुट् तलोपश्च (६-१-१५७) ह्या वार्तिकांत तस्कर शब्दाचा निर्देश कात्यायन करतो. त्या वरून म्हणतां येतें कीं तस्कर- ठक्कर-ठाकर हे लोक उत्तरे कडून कोंकणांत आले. कातवडी, काथोडी, कोठोडी, हे लोक सह्याद्रीच्या आसपासच्या प्रदेशांतील अत्यन्त जुनाट लोक आहेत. ह्यांना कातकरी हें आणीक एक नांव आहे. तें त्यांच्या कात करण्याच्या धंद्या वरून मूळत: पडलें. जुनाट नांव कातवडी होय. कारस्कर देशांत राहणारे ते कारस्करी, कातकरी अशी हि व्युत्पत्ति ओढूनताणून केली तर प्रयासानें होईल. परंतु, कातकरी ह्या शब्दाचा अपभ्रंश कातवडी असा कोणत्या हि ओढाताणीनें होणार नाहीं. कातवडी हा मराठी अपभ्रंश कृत्तिपट्टिन् ह्या संस्कृत शब्दाचा होणें शक्य आहे. कृत्ति म्हणजे कातडे व पट्ट म्हणजे वस्त्र, कातड्यांचें वस्त्र पांघरणारा जो तो कृत्तिपट्टिन्. कृत्तिपट्टिन् कातवडी. मूळ हे रानटी लोक वाघ, हरिण, इत्यादींचीं कातडीं पांघरणारे महाराष्ट्रिकांना आढळले. त्या वरून त्यांनी त्यांना कृत्तिपट्टिन् असें सार्थक नांव दिलें. महाराष्ट्रिकांच्या संसर्गानें कातवडी मराठी भाषा बोलूं लागले. डहाणूउंबरगांव पासून मुंबई पर्यंतच्या टापूंत रहाणा-या मांगेले, दुबळे, धेडे, वारली, कोळी, ठाकर व कातवडी ह्या लोकांचा भाषिक इतिहास उपरिनिर्दिष्ट त-हेचा आहे. पैकीं कातवडी तेवढे ह्या प्रांतांत सर्वांच्या पूर्वीचे रहाणारे आहेत. मांगेले, वारली, कोळी व ठाकर अपभ्रष्ट प्राकृत भाषा घेऊन उत्तरे कडून ह्या प्रांतांत शिरले. मांगेल्यांनीं उंबरगांवा पासूनचा समुद्रकिनारा धरिला आणि वारली व ठाकर ह्यांनीं आंतील सह्याद्रीचीं रानें आटोपिलीं.