इतर जातींच्या नंतर किंवा पूर्वी हे लोक कोंकणांत आले असावे. सेउली, सेपरु, बिलु, हे वैदिक अपभ्रंश ज्या अर्थी ह्यांच्या नांवांत सांपडतात त्या अर्थी असे म्हणावें लागतें कीं, माहाराष्ट्रिकांच्या अगोदर हे लोक कोंकणांत वसाहत करण्यास आले असावे. माहाराष्ट्रिकांच्या अगोदर शेंकडों वर्षे नागलोक कोंकणांत वसाहती करून स्थिर झाले होते. माहाराष्ट्रिक कोंकणांत उतरल्या वर नागांशीं त्यांचा शरीरसंबंध झाला व ह्या शरीरसंबंधा पासून आधुनिककाळीं ज्यांना मराठे म्हणतात त्यांचा उदय झाला. माहाराष्ट्रिकांचा ज्या प्रमाणें नागांशीं शरीरसंबंध झाला, त्या प्रमाणें मांगेल्यांचा नागांशीं शरीरसंबंध झाला नाहीं. ते अगदीं अलग राहिले. ह्या वरून स्पष्ट होतें कीं, मांगेले नागवंशी नव्हते. मांगेले नागवंशी जसे नव्हते तसे ते माहाराष्ट्रिकवंशी हि नव्हते. ते नागवंशी किंवा माहाराष्ट्रवंशी लोकांशीं थोडेफार सजातीय असते, तर नागांत किंवा माहाराष्ट्रिकांत शरीरसंबंधानें मिसळून जाते. तात्पर्य, मांगेले लोक नाग व माहाराष्ट्रिक ह्यांहून निराळ्या वंशाचे, बहुशः आंध्र-तेलगू-द्रविड शाखेचे लोक मूळत: असावे. आंध्रादि देशांत असतांना तेथें वसाहत करून राहिलेल्या वैदिक भाषा बोलणा-या आर्यांचा पगडा त्यांज वर बसून, वैदिक व्यक्तिनामें उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली. नंतर आंध्रदेशांतून ते कोंकणच्या पश्चिम किना-या वर आले. सप्तगोदावरीप्रदेशांत ते मूळांत मच्छीमारीचा धंदा करीत असावे आणि पश्चिमसमुद्रा वर आल्या नंतर त्यांनीं तो धंदा कोंकण किना-या वर चालूं केला असावा. आर्यांची वैदिक भाषा ते अपभ्रंशरूपानें जी आंध्रदेशांत बोलत ती च कोंकणांत आल्या वर हि सहज बोलत. शेजारचे पूर्वीचे नाग आर्यभाष होते च व पश्चात् आलेले माहाराष्ट्रिक हि आर्यभाष होते. त्या मुळें दळणवळणाला प्रयास पडले नाहींत. एणें प्रमाणें एवढें सिद्ध झालें कीं बिंब, भोज, भौम, नायते, नागरशा, मांगेलेतांडेले हे व्यक्ति. नामवाचक किंवा आडनांववाचक किंवा जातिनामवाचक शब्द भारतवर्षांत फार प्राचीन काळा पासून प्रचलित आहेत व ते शक १०६० पासून शक १३७० पर्यंतच्या काळांत उतरकोंकणांत विद्यमान असल्यास असंभाव्य नवल वाटण्याचें कारण नाहीं.
३२. मांगेलेतांडेले लोक आंध्रदेशांत असतांना किंवा आंध्रदेशांतून पश्चिमे कडे. प्रवास करीत असतांना वैदिकभाषा अपभ्रष्ट रूपानें बोलत असा तर्क वरील रकान्यांत केला. ह्या तर्काचा अर्थं असा होतो कीं आंध्रदेशांत व त्याच्या पश्चिमेस आर्यांच्या वसाहती व आर्यभाषेचा प्रसार मांगेले लोक कोंकणांत येण्याच्या पूर्वी होऊन गेलेला होता. आणि हा तर्क खरा आहे. ऐतरेय ब्राह्मणांत आंध्र लोकांचा जसा उल्लेख आलेला आहे तसा कोंकणप्रांतांचा किंवा अपरान्ताचा उल्लेख वैदिक वाङयांत कोठें हिं आलेला नाहीं. आंध्रदेशीय मांगेले लोक अपभ्रष्ट आर्यभाषा घेऊन उत्तरकोंकणाच्या समुद्रकिना-या वर आले म्हणून सांगितलें. ह्या समुद्रकिना-याचा विस्तार स्थूलमानानें उंबरगांवा पासून मुंबई पर्यंत होता. धंद्यानें मच्छीमार पडल्या मुळें, समुद्रकिना-या पासून मैल अर्धमैलाच्या आंत त्यांनीं जी एकदा वसती केली ती अद्यापपर्यंत तेवढा च टापू व्यापून आहे. समुद्रा पासून मैलअर्धमैलाच्या नंतर पूर्वे कडे तीन चार मैला पर्यंत दुबळे लोकांची वसती आहे. दुबळे गुजराथी भाषा बोलतात व शेती वर निर्वाह करितात. भाषे वरून स्पष्टं च होतें कीं दुबळे लोक गुजराथेंतून म्हणजे सुरते कडून दक्षिणेस उत्तरकोकणांत डाहाणूउबंरगांवप्रांतांत शिरले. दुबळ्यांच्या टापूंत धेडे नांवाचे लोक रहातात. हे गुजराथी भाषा बोलतात व अस्पृश्यवर्गांत मोडतात. दुबळा शूद्र आहे व धेडा अतिशूद्र आहे. दुबळ्यांच्या टापूच्या पूर्वेस सह्याद्रिशिखरा पर्यंत वारली लोकांचीं वसती आहे. वारली लोक मराठी भाषा बोलतात. व्यासवरुडनिषाद इत्यादि वार्तिकांत वरुड-वारुडकि ह्या नांवानें वारल्यांचा उल्लेख कात्यायन करतो. वारुडकि= वारुलइ-वारुली=वारली. उंबरगांवा पासून सह्याद्रि पर्यंत जर पश्चिमे कडून पूर्वे कडे एक रेघ मारिली तर त्या वीस मैल रुंद रेघेंत निरनिराळ्या जातींचे टापू येणें प्रमाणें समावतात:--
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)