ह्या होय्सळ ऊर्फ पोय्सळ आडनांवाचा अपभ्रंश भोसल होण्या सारखा आहे. पो-वो-बो-भो अशा परंपरेनें पोसळ शब्द भोसल होऊं शकतो. पोय्सळ यांचें मूळ गांव शशकपुर, पुर, पद्र हे शब्द ग्रामनामांच्या अंतीं समानार्थानें लावण्याची चाल पुरातन आहे. शशकपद्र शब्दाचा अपभ्रंश ससोदें, शिसोदें असा होऊं शकतो. तात्पर्य पोय्सळ राजे मूळचे शिसोदें ह्या गांवचे राहणारे. भोसले हे शिसोदे गांवचे राहणारे मराठी बखरींतून महशूर आहेत. तेव्हां भोसला हा शब्द पोय्सळ ह्या शब्दा पासून निर्वचिण्यास आधार आहे व भोसले हे पोय्सळ असण्याचा संभव आहे. सिंद, पल्लव, इत्यादि मराठा क्षत्रियां प्रमाणें होय्सळ ऊर्फ पोय्सळ हे फार पुरातनकालीं वसाहत करण्यास म्हैसूर प्रांतांत उतरले व तेथून वसाहती करीत करीत दंडकारण्यांत पसरत असतां भोसले ह्या अपभ्रंशानें प्रथित झाले. (५) बिंब, भौम, भोज, ह्या आडनावां प्रमाणें च नाइते, नायते हें हि. राजांचें आडनांव बखरींत येतें (पृष्ट ६६।६७।७१). कवळी, दरणे इत्यादि बारा खुमांत नायत्यांची गणना बखरकारानें केली आहे. ह्या बारा खुमांस आधार सोमवशाचा; व्यभिचारोत्पन्न म्हणून मान्यां वेगळे; असे शब्द बखरकार योजितो. टिळा, विडा, इत्यादि जे मान ते नायते इत्यादि. खुमांना म्हणजे कुळांना नाहींत, कारण ते व्यभिचारजन्य आहेत म्हणजे संकरजातीय आहेत. कवळी, दरणे, माळी, इत्यादि सर्व शब्द संस्कृतोत्पत्र आहेत. नायते ह्या शब्दाचें संस्कृत मूळ काय असावें तें माझ्या लक्ष्यांत अद्याप आलें नाहीं. (६) तांडेला ह्या कुळाचा म्हणजे जातीचा निर्देश बखरकार करतो. हें कूळ सोमवंशी किंवा सूर्यवंशी अस्सल किंवा संकर वगैरे माहिती बखरकार देत नाहीं; फक्त एका तांडेल्या व्यक्तीस पंक्तीस घेतल्याचा व तत्संबंधानें उद्भवलेल्या ग्रामण्याचा प्रपंच तेवढा सविस्तर दोनदा करतो. ह्या वरून तांडेले ही जात कोंकणांत सोमसूर्यवंशीयांच्या पूर्वी आली व सोमसूर्यवंशीयांशीं तिचा कोणता हि संबंध नाहीं, हें उघड होतें. तांडेला जातीला मांगेला हें दुसरें नांव आहे. नाशीक येथील एक, तीर्थोपाध्ये- अन्नाजी नानाजी चंद्रात्रे- यांच्या वही वरून पहातां असे दिसतें कीं ही जात आपला संबंद निर्देश, मांगेले-तांडेले असा दुहेरी करते, नुसता मांगेले किंवा नुसता तांडेले असा एकेरी करीत नाहीं. पैकीं मांगेला हा सामान्यजातिवाचक शब्द असून तांडेले हा उपजातिवाचक पोटभेददर्शक शब्द आहे. तांडा म्हणजे नावांचा किंवा नांवेंतील खलशांचा समूह. तांड्याचा जो पुढारी तो तांडेल. तांडेल-तांडेला हा धंदावाचक शब्द आहे. तंडक ( समूह, ओळ) + इरः (प्रेरक, चालविणारा) = तंडकेर (तांड्याचा चालक). तंडकेर = तांडेल (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी). मांगेल हा शब्द मांग + इल अशा दोन शब्दांचा समास आहे. पैंकी मांग हा शब्द मातंग ह्या शब्दाचा अपभ्रंश समजणें येथें युक्त नाहीं. कारण मांगेल लोक अस्पृश्य नाहींत, पूर्ण स्पृश्य आहेत. तेव्हां मांगेल ह्या संयुक्त शब्दांतील मांग ह्या शब्दाचे मूळ अन्यत्र शोधिलें पाहिजे. मूळ शोधण्यास ज्या अर्थी प्रयास पडतात त्या अर्थी मांगेल हे लोक कोंकणांत फार प्राचीन कालीं आलेले आहेत असें समजावें लागतें. नाशिक येथील चंद्रात्रे यांच्या जवळील तिस-या नंबरच्या वहीच्या ५२।५३ पानां वर मांगेल्यांचे जे लेख आहेत त्यांतील चार लेख येणें प्रमाणें आहेत:-
नोंद ५ वी
कृष्णा. पी. माधव आ. बिलु पं. जानु भा. रामचंद्र चे
बाबु सा. चु. झांबु चे शनिवार सा. लशुमा व
जानु चे भीमी माता- बुधीबाई. शीनवार ची मा.
तीरमखी- शीनवारची स्त्री गंगाबाई. सा. शीनवार ची
बहीन दोवारकाबाई सा. जात मागेले ताडेले आ. पाकघरी
गा. घीवली ता. माहीम.