२९. देवगिरीच्या लढाईचा वृत्तान्त भविष्योत्तर पुराण, सह्याद्रिखंड व कौस्तुभ चिंतामणिग्रंथ ह्या संस्कृत ग्रंथांच्या आधारानें आपण प्राकृतांत देतों, असें विधान भगवान् दत्तानें केलें आहे. भविष्य पुराण म्हणजे आंध्रोत्तर कालचें म्हणजे शक तीन शें नंतरचा जो भविष्य काळ त्याचें पुराण म्हणजे प्राचीन इतिहासादि माहिती. भविष्य काळ सुमारें शक आठ शें पर्यंत गणिला गेला. भविष्या नंतरचें म्हणजे शक आठ शें नंतर. पासून आज पर्यंतच्या काळचें जें पुराण तें भविष्योत्तर पुराण. ह्या भविष्योत्तर पुराणाच्या अंतर्गत अशीं खंडें, उपपुराणें व माहात्म्यें शेकडों झालीं व प्रांतो प्रांतीं तीं निरनिराळीं झालीं. त्यांतून माहिती घेऊन आपण ही रचना केली असें भगवान् दत्त म्हणतो. देवगिरीचे यादव, ठाण्याचे शिलाहार, गोंव्याचे कदंब, घणदिवीचे नागरशा, चेऊलचे भोज व माहीमचे बिंब ह्या सहा घराण्यांचे पद्य इतिहास, चालुक्य, चौलुक्य, राष्ट्रौढ इत्यादि वंशांच्या किंवा त्यांतील प्रख्यात व्यक्तींच्या पद्य इतिहासां प्रमाणें, रचिले गेले असण्याचा संभव आहे. स्थानिक माहात्म्यांतून किंवा भविष्योत्तर पुराणाच्या स्थानिक प्रतींतून हि ह्या कुलांची हकीकत संस्कृत पद्यांनीं वर्णिली गेली असूं शकेल. पद्य काव्येतिहासा प्रमाणें ह्या घराण्यांचे गद्य इतिहास हि प्राकृत भाषांत लिहिले गेले असण्याचा संभव आहे. प्रस्तुत बखर बिंबादि घराण्यांचा प्राकृत इतिहास च आहे. तो जसा आज उपलब्ध झाला, तसा चालुक्य, यादव, होयसळ, कदंब, इत्यादि मध्ययुगीन राजघराण्यांचा हि इतिहास पुढेंमागें कदाचित् सांपडेल, असा प्रस्तुत बखरी वरून नुसता तर्क च बांधतां येतो असें नव्हे, तर निश्चय करतां येतो. कारण भगवान् दत्त भविष्योत्तर पुराणांतून देवगिरीच्या लढाईचें वर्णन आपण देत आहों असें स्पष्ट लिहितो. भगवान् दत्ताचें हें लिहिणें केवळ बाताड समजून भागणार नाहीं. कोणाला फसविण्या करितां कांहीं तो लिहीत नाहीं, तर पूर्वपरंपरा तत्कालीन म्हणजे तीन शें वर्षों पूर्वील लोकांना माहित करून देण्या करितां जाणून सवरून लिहितो, संस्कृत पुराणांच्या आघारानें आपण लिहीत आहों असें आश्वासन भगवान् दत्त देत असल्या मुळें, त्याचें हें विधान सत्य मानणें प्राप्त होतें. त्यानें पुराणें पाहून लिहिलें ह्यांत संशय नाहीं. परंतु पुराणांत व माहात्म्यांत व खंडांत ब-याच वास्तविक बाबी बरोबर ब-याच विसंगत बाबी हि दिलेल्या असतात, तेव्हां त्यांच्या वर विश्वसण्यांत बरेंच तारतम्य योजिलें पाहिजे एवढी एक बाब जितकी लक्ष्यांत बाळागणें अवश्य होतें तितकी त्यानें बाळगली नाहीं, असें त्याच्या कित्येक विधानां वरून दिसतें. उदाहरणार्थ, देवगिरीच्या लढाईचा वृत्तान्त जो त्यानें दिला तो बराच वास्तविक आहे. परंतु रामदेवराव जाधवाची जी वंशावळ त्यानें दिली ती अगदींच बारगळ आहे. भगवान् दत्त यादवांची वंशावळ येणेप्रमाणें देतो (पृष्ठें ८०।८१).(यादवांची वंशावळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
ताम्रपट व शिलालेख यांत यादवांची जी वंशावळ दिलेली आपणास विश्वसनीय म्हणून माहीत आहे ती हून भगवान् दत्तानें दिलेली ही वंशावळ अगदीं भिन्न आहे. भगवान् दत्तानें कोठली तरी वंशावळ कोठें तरी जोडून दिली. पृष्ठ ८९ वर रामदेवरावाची दुसरी एक वंशावळ पांचव्या प्रकरणाच्या कर्त्यांने दिली आहे ती अशी:- (पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
ही हि वंशावळ भगवान् दत्तानें दिलेल्या वंशावळी इतकी च विचित्र आहे. तात्पर्य, भगवान् दत्ताला व पांचव्या प्रकरणाच्या कर्त्याला रामदेवराजाच्या म्हणून ज्या वंशावळी वाटल्या त्या त्या राजाच्या नाहींत. ह्या स्थलीं भगवान् दत्त व पांचव्या प्रकरणाचा कर्ता हे सपशेल घसरले. घसरगुंडी वरून स्पष्ट होतें कीं दत्तादि लेखकांच्या पुढें यादवांचा विश्वसनीय इतिहास किंवा वंशवेल नव्हता. यादव सोमवंशी होते, भगवान् दत्त लिहितो त्या प्रमाणें सूर्यवंशी नव्हते, रामराजाचा बाप जयसवन नव्हता, इत्यादि आणीक किती तरी विसंगतपणा दत्ताच्या वंशावळींत भरला आहे. करतां दत्ताच्या लेखाच्या ह्या भागा वर विश्वास ठेवणें सर्वतो प्रकारें जड जातें.