२७. येथें प्रस्तुत बखरींत दिलेला राजकीय इतिहास संपला. शक १०६० तील प्रताप बिंबाच्या आगमना पासून शक १४६० च्या सुमारास पट्टेकरास फिरंग्यांनीं स्थानभ्रष्ट करी तों पर्यंतची हकीकत बखरकारानें जी वर्णिली आहे ती वरून दिसतें कीं ह्या ४०० चार शें वर्षांत (१) बिंबराजे, (२) नागरशाहि राजे, (३) बिंब देवादि यादव राजे, (४) नायते राजे, (५) दिल्लीचे मालक, (६) अमदाबादचे मलिक, व (७) फिरंगी अश्या सात परंपरा राज्य करणा-यांच्या माहीम प्रांतांत झाल्या. पैकीं मुसुलमान वे फिरंगी राज्यकर्त्यांची माहिती आजपर्यंतच्या देशी व विदेशी इतिहासकारांनीं दिलेली सर्वांच्या परिचयाची आहे; परंतु, बिंबकुलीन राजे, नागरशादि राजे, यादव राजे, नायते राजे, भोंगळे वगैरे राज्यकर्त्यां संबंधानें नाममात्रे करून देखील माहिती आजपर्यंतच्या देशीविदेशी इतिहासकारांना फारच अल्प होती, किंबहुना मुळीं च नव्हती म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. बिंब, बिंबस्थान हे दोन शब्द ठाणेंकोंकणांतील पळशे ब्राह्मणांच्या हकीकतींतून आलेले ओझरते व पुसट असे कर्णपथा वर पडत. ह्या शब्दांच्या पाठी मागें व आसपास केवढा थोरला इतिहासप्रांत लिकून राहिलेला आहे, त्याचा पत्ता हि इतिहासकाराना आजपर्यंत नव्हता. नापत्ता असलेल्या ह्या इतिहासप्रांताच्या आड येणारा पडदा प्रस्तुत बखरीच्या प्रकाशनानें दूर सारला जाऊन, इतिहासरंगभूमी वरील एक अज्ञात चित्रपट खुला होत आहे. तो पाहून सहृदय वाचक बखरीचा पत्ता लावणा-या व ती हस्तगत करणा-या दिवेकरांना दुवा देतील यांत संशय नाहीं. बखरीची ही एक च प्रत सध्यां उपलब्ध आहे. आणीक कांहीं प्रती सांपडत्या तर बखरींतील ब-या च को-या जागा भरून निघत्या व बरे च अपपाठ टाळतां आले असते. उदाहरणार्थ, पृष्ट ९१ पासून ९६ पर्यंतच्या प्रामोत्पन्नांतील किती तरी चुकलेले आंकडे बरोबर देतां आले असते व किती तरी बेरजा शुद्ध मांडतां आल्या असत्या. प्रत्यन्तराच्या अभावीं सदर चुक्या व अपपाठ जसे चे तसे छापणें अपरिहार्य झाले. ओवीबद्ध बिंबाख्यानांतील पाठांशीं तुलना करून दोहोंतील अपपाठ दुरुस्त होण्या जोगे जेवढे आढळले त्यांची याद येणें प्रमाणें:- (खालील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
बेरजा कितपत बरोबर असतील त्या असोत. प्रस्तुत बखरींत व बिंबाख्यानांत दिलेले आंकडे कित्येक स्थलीं परस्परंभिन्न ज्या अर्थी आहेत, त्या अर्थी मूळ बखरींत मूळचे आंकडे दोहों ठिकाणच्या आकड्यांहून क्वचित् निराळे असण्याचा संभव आहे आणि क्वचित् दोहों पैकीं एकांतील आंकडे बरोबर असण्याचा संभव आहे. बिंबाख्यानाच्या व बखरीच्या आणीक पांच चार जुन्या प्रती जेव्हां मिळतील तेव्हां ह्या बाबीचा लागला आहे त्या हून जास्त निश्चित तपशील लावतां येईल. तत्रापि स्थूल मानानें दिले आहेत ते आंकडे खरे मानून गांवोगांवच्या प्रस्तुतकालीन जमाबंदीशीं तुलना करतां येण्यास येक साधन उपलब्ध झालें आहे, एवढें तरी समाधान मानण्यास जागा झाली, हा कांहीं लहान सहान फायदा नव्हे. अगदींच अंधार होता, तेथें आतां किंचित् उजेड झाला !