२३. नागरशाचें ठाणेंकोंकणचें राज्य मुसुलमानांनीं काबीज केल्या वर, गुजराथ व महाराष्ट्र ह्या देशांत शक १२७० नंतर नांव घेण्यासारिखें प्रतिष्ठित असें स्वतंत्र हिंदू राज्य एक हि राहिलें नाहीं. हिंदू राज्यें नष्ट होण्याचें कारण बखरकार देतो तें मासलेवाईक आहे. बखरकार म्हणतो, कलियुगांत असा प्रकार होणार अशी भाक लक्ष्मीनारायणानें कलीस दिली होती. ती भाक १२७० शकांत पूर्णपणें खरी ठरली. हरिहर गुप्त झाले. ऋषि बद्रिकाश्रमास गेले. वसिष्ट राजगुरु कांहीं काळ मागें राहिले होते त्यांनी हि पाठ फिरविली. त्या मुळें सूर्यवंशी व सोमवंशी यांची शस्त्रविद्या लुप्त होऊन म्लेच्छांचा व कलीचा जय झाला !
२४. म्लेच्छांचें राज्य झालें तेव्हां निरुपाय होऊन ठाणेंकोंकणांतील सूर्यवंशी व सोमवंशी कौल घेऊन सामान्य रयत बनून राहिले. नागरशा राज्यभ्रष्ट झालेला देखून, त्याचा शत्रू जो भागडचुरी त्याचा आनंद गगनांत मावे ना. तो निका मलिकास येऊन भेटला. त्यास देशाची जमी सांगितली. महाल, परगणे, खापण, गावें, वोळी, हवाले, मसाले, हाट, बकाल, आदाय, खर्च, इत्यादींचा सर्व तपशील भागडचुरीनें निका मलिकास समजाऊन दिला. मलिक मेहेरबान होऊन त्यानें भागडचुरीला हुजूरमजलीसीपदस्थ केलें. सर्व कारभार भागडचुरीच्या सल्ल्यानें चाले. मग भागडचुरीनें पूर्वीचीं वैरं उकरून काढलीं. त्याने भाइंदरकर पाटलां वर कुभांड रचिलें कीं सरकारपैक्या पैकीं ह्यांनीं ३२००० बत्तीस हजार सजगणीची अफरातफर केली. मलिकानें पाटलास बंदीखानीं घातलें. तेव्हां ज्याच्या भावाच्या स्त्री वर जुलूम करण्याच्या आरोपा वरून भागडचुरीला पलायन करावें लागलें होतें त्या सोमदेसल्यानें पाटलांच्या वतीनें दिवाणांत पैसा भरला व पाटलांस बंधमुक्त केलें. हा पहिला डाव फसलासा पाहून, भागडचुरीनें निका मलिकाचे कान भरिले कीं, हा सोमदेसला फार लुच्चा व चढेल माणूस आहे, त्यास दस्त करावा. निका मलिकानें सोम ठाकुराला नाहक सोळा हजार दाम दंड ठोठाविला. तो सोम देसला कांहीं केल्या देई ना. सबब, निका मलिकानें त्याची देसलकी अमानत करून ती भागडचुरीस देऊं केली. परंतु सोम ठाकूर व त्याचा भाऊ पायरुत हे पुरातन देसले जीवंत असतां, देसलकीला हात लाविण्याची भागडचुरीची प्राज्ञा नव्हती. तेव्हां भागडचुरीनें मलिकास कळविलें कीं सोम ठाकूर व पायरुत यांस जीवें मारिल्या बिगर, देसलकीचा कारभार सुरळित चालणार नाहीं. निका मलिकानें दिल्लीस पातशाहास कागद लिहिला कीं सोम ठाकूर देसला मोठा लांचखाऊ कुफ्राणदार असामी आहे, त्याला दस्त केल्या वांचून देशाची मशागत होत नाहीं. त्या वरून पातशाहानें सोम देसला व पायरुत यांना दिल्लीस बोलावून घेतले व तेथें त्यांचे प्राण हरण केले. पापरुताची खाल काढिली. सोमदेसल्याचें पोट चिरून, आंतड्याची वात वळून व चर्बीचें तेल जाळून, त्याचा दिवा लाविला. असल्या क्रूर व पाशव शिक्षा मुसलमानी राज्यांत दिलेल्या अद्याप हि आढळतात. त्या कालीं तर त्यांचा हरहमेश प्रचार होता. Margoliouth आपल्या Mohommnedanism ह्या पुस्तकाच्या १०३ व्या पृष्टा वर येणें प्रमाणें लिहितो:-