लढवय्ये लोक पाहारे - क-याचा धंदा, लढण्याचा धंदा न मिळाल्यास, करतांना कालोकालीं दृष्टीस पडतात.उदाहरणार्थ, मालोजी व बाबाजी भोसले. हे प्रथम दारवठेकाराचा धंदा करीत, हें सुप्रसिद्ध आहे. तात्पर्य, पातेणे ऊर्फ पाठारे प्रभू हे मूळचे लढवय्ये लोक होते व हे पोलिसाचा व पाहारेक-याचा धंदा करीत असत. बिंबदेव जाधवानें ह्या लोकांना देवगिरी प्रांतांत असतांना आपल्या तैनातींत खास रक्षणा करितां ठेविले व कोंकणा वर स्वारी करण्याच्या प्रसंगीं कोंकणांत आणिले. कोंकणांत आल्या वर गांवोंगांवचे हे प्रभू झाले. हें प्रभूपण त्यांनीं फक्त ३८ वर्षे भोगिलें आणि उच्च मुत्सद्देगिरी किंवा उच्च शिपायगिरी करण्याचें कौशल्य आंगी असावें तसें नसल्या मुळें किंवा उत्कट प्रतिबंध आडवे आल्या मुळें, हे उत्तरोत्तर अगदीं खालावत गेले. कायस्थ प्रभूंची हि अशी च दुर्दशा झाली. सोमेश्वर शिलाहाराच्या दहा पंधरा वर्षांच्या अमदानींत उदयास येऊन हे पेणपनवेलमहाड प्रातांत गांवगन्ना प्रभू झाले व दहा पंधरा वर्षे प्रभूपण भोगिल्या वर जे खालावले व इतिहासांतून अदृश्य झाले ते पुनः मराठेशाहींत किंचित् उदयास आले. ह्या दोघां हि प्रभूंचा उत्कर्षकाल अनुक्रमें पंधरा व अडतीस वर्षांचा अल्पावधिक असल्या कारणानें ह्यांना धुरंधर, जैवन्त, रणदिवे, चौबळ, धराधर, समर्थ, इत्यादि भपकेबाज उपपदें कशीं व कधीं मिळालीं ह्या बाबीची आठवण हि बुजून गेली आणि प्रस्तुत बखरीचा टेंकू जर न मिळता तर हे कोण व कोठील ह्या बाबीचा पत्ता हि न लागता. भरतखंडांतर्गत सह्याद्रिखंडातील समुद्रतीराच्या पन्नास शंभर मैलाच्या टापूंत धूमकेतुवत् किंचित्काल चमकून कालाच्या व अनितिहासाच्या काळोखांत ह्यांची आदि जी शेकडों वर्षे लपाली ती प्रस्तुत बखरीच्या व केशवाचार्यादींच्या कृपाप्रसादानें पुनः आधुनिक इतिहासादर्शांत प्रतिबिंबायमान होत आहे.
२१. शक १२५४ त प्रतापशा जाधवाचा पेणपनवेलादि प्रांत नागरश्यानें आपल्या राज्यास जेव्हां जोडला, तेव्हां भोंवतालील परिस्थिति एणे प्रमाणें होती. देवगगिरीचें यादवांचें साम्राज्य शक १२४० त मुसुलमानांच्या हातीं जाऊन १४ वर्षे लोटलीं हेातीं. अणहिलपाटणचें वाघेल्यांचें राज्य शक १२२० त मुसुलमानांच्या कबज्यांत जाऊन ३४ वर्षे झालीं होतीं. सोमेश्वर शिलाहाराचा वध महादेव यादवाच्या हस्तें होऊन व शिलाहारसत्ता शक ११९० च्या सुमारास कायमची नष्ट होऊन साठा वर कांहीं वर्षे गेलीं होतीं. गोव्याच्या कदंबांची रियासत शक ११९० च्या सुमारास च नष्ट झाली. उत्तरकोंकणांत माहीम, ठाणे व चेऊल येथें राज्य करणारा नागरशा तेवढा देशी संस्थानिकां पैकीं किंवा आतां स्वतंत्र राजां पैकीं शिल्लक राहिला. खालतीं दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरीं विजयानगरास संगम राज्य स्थापण्यास लागून दहा पांच ष झालीं असतील नसतील, असें सर्वत्र तुर्काण प्रवर्तमान झालें असतां, शक १२५४ त नागरशा ठाणेंकोंकणांत राज्य करूं लागला. प्रतापशा जाधवाशीं लढतांना ज्या सरदारांनीं कष्टमेहनत बहुत सोशिली व पराक्रम विशेषात्कारें केला त्यांना नागरशानें बहुता प्रकारें गौरविलें. आंधेरीकराला छत्री दिधली. वारणें व वांदरे नांवाजिले. साहारकर व पालवणकर हे हातसांखळ्या (सोन्याचीं कडीं) पावले. जैतचुरी नांवाचा राजाचा पाळकपुत्र होता, त्यानें गेल्या युद्धांत पराकाष्ठेची बहादूरकी गाजविली, सबब यास दळाची नाइकी दिली व येसाव्या भोंवतील चौफेर बंदरकीचा मामला सुपूर्द केला. कालान्तंरानें हा जैतचुरी इतका फुशारून गेला कीं, येसावें तो आपल्या च मतें प्रवर्तवूं लागला व नागरशाला विचारीत ना सा झाला. जैतचुरीचा पुत्र भागडचुरी नामें होता. तो तर बापाहून हि कांकणभर जास्त चढेल निपजला. " दालिबंद नाय कवडा यशवंत होता. बहुता युद्धां मध्यें जयो पावला. म्हणोन रायानें सेनाधिपति केला. तेणें कितीएक कार्ये रायाचीं बहुते प्रकारें उत्तमान्वयें यथापुरुषार्थी सिद्धि पावविलीं. ऐसें जाणोन राया नागरशानें त्यास साष्टीचा कारभार दिधला. त्यानें जमीनीची मोजणी केली.