" तद् यथा राजानं आयान्तं उग्रा: प्रत्येनसः सूतग्रामण्यः
अन्नैः पानैः आवसथैः प्रतिकल्पन्ते अयं आयाति अयं
आगच्छति इति; एवं ह एवंविदं सर्वाणि भूतानि
प्रतिकल्पन्ते इदं ब्रह्म आयाति इदं आगच्छति इति ।। ३७ ।।
तद् यथा राजानं प्रयियासन्तं उग्रा: प्रत्येनस: सूतग्रामण्यः
अभिसमायन्ति; एवं एव इमं आत्मानं अंतकाले सर्वे प्राणाः
अभिसमायन्ति यत्र एतद् ऊर्ध्वोच्छासी भवति ।। ३८॥"
अर्थ
ज्याप्रमाणें येणार येणार म्हणून येणा-या राज करितां अन्न, पाणी व तंबू यांची तयारी उग्र, प्रत्येनस् , सूत व ग्रामणी करतात; त्या प्रमाणें हें ब्रह्म येत आहे, हें आलें, असें म्हणून सर्व भूतें एवंविदा करितां तयारी करून असतात ।। ३७ ॥
ज्या प्रमाणें जाणा-या राजा पुढें उग्र, प्रत्येनस् , सूत व ग्रामणी एकत्र गोळा होतात; त्या प्रमाणें, अंतकालीं प्राणी उर्ध्वश्वासी होतो तेव्हां आत्म्या पुढें सर्व प्राण गोळा होतात ।। ३८ ॥
त्या दोन कंडिकांत उग्र, प्रत्येनस्, सूत व ग्रामणी, ह्या चार कामदारांचा निर्देश केलेला आहे. ग्रामणी म्हणजे गांवाचा गावुंडा, मुख्य पुढारी इत्यादि. सूत म्हणजे रथकार, भाट, उग्र म्हणजे लढाऊ शिपाई. आणि प्रत्येनस् म्हणजे चोराचिलटांचा बंदोबस्त करणारा पोलिस. शंकराचार्य ह्या शब्दांचा असा अर्थ देतातः--उग्रा: जातिविशेषाः क्रूरकर्माणो वा । प्रत्येनस: प्रति प्रति एनसि पापकर्मणि नियुक्ताः प्रत्येनसः तस्करा-दिदंडनादौ नियुक्ताः । सूताः चे ग्रामण्यः च सूतग्रामण्यः । सूता: वर्णसंकरजातिविशेषाः। ग्रामण्य: ग्रामनेतारः । ग्रामणी अन्नपाण्याचा पुरवठा करी; सूत तंबू, रथ वगैरेंच्या दुरुस्तीच्या कामीं उपयोगी पडे; उग्र रखवालदारीचें कार्य संपादी; आणि प्रत्येनस् चोराचिलटां पासूनचें भय निवारी. उग्राः, प्रत्येनसः, सूताः, ग्रामण्यः हे सर्व शब्द अनेकवचनी आहेत. तेव्हां उघड च झालें कीं, शिपाई, गांवचे पुढारी, दागदुजी करणारे रथकार व पोलीस हे राजाची सरबराई करणारे लोक अनेक असत. ब्रहदारण्यकोपनिषद्रचनाकालीं ग्रामणी व प्रत्येनस् ह्या कामदारांच्या जाती बनल्या नव्हत्या. त्या कालीं सूत व उग्र ह्यांच्या देखील जाती बनल्या होत्या किंवा नाहीं, हें निश्चयानें सांगवत नाहीं; बहुशः जाती बनल्या नसाव्या. शंकराचार्य सूत व उग्र हे संकरजातिवाचक शब्द आहेत म्हणून म्हणतात. परंतु स्वकालीन अर्थ उपनिषत्कालीन शब्दांना लाविण्याची ते चुका करीत आहेत, हें उघड दिसतें. ग्रामणी, सूत, उग्र व प्रत्येनस् ह्या चार शब्दां पैकी प्रत्येनस् ह्या शब्दाशीं सध्यां आपणास कर्तव्य आहे. प्रत्येनाः ह्या शब्दा चा मराठींत अपभ्रंश पातेणा असा झाला आहे. असा त्य चा ते प्रांतिक, अशिष्ट व प्राचीन मराठींत होतो. प्रत्येक=प्रतेक, अत्यन्त=अतेन्त, सत्य=सते, इत्यादि अपभ्रंश स्टेफेन्स च्या खिस्तपुराणांत हवे तितके सांपडतील आणि अशिष्ट लेाकांत तर अद्याप हि ऐकूं येतात. तात्पर्य, पातेणा हा शब्द प्रत्येनस्-प्रत्येनाः ह्या जुनाट संस्कृत व वैदिक शब्दाचा अपभ्रंश आहे. प्रत्येनस् म्हणजे पोलिस शिपाई. पातेणे ह्या शब्दाच्या जोडीचा च पाठारा हा शब्द आहे. हा शब्द प्रतीहार: या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. प्रतीहार:=पडीहारा=पाठारा. प्रतीहार म्हणजे दारवठेकार, द्वाररक्षक, पाहारेकरी. पातेणे पोलिसाचें जसें काम करीत तसा च पाहारेक-याचा हि धंदा करीत. सबब, हे लोक आपणाला पातेणे जसे म्हणवीत तसे च पाठारे हि म्हणवीत. पालिसाचा व पहारेक-याचा धंदा करणारे हे लोक आयुधजीविसंघां पैकीं असत.