१८ बिंबदेव जाधवानें ठाणेंकोंकणपैकीं जो प्रांत ताब्यांत आला त्याचे १५ महाल केले व तेथें देशसंरक्षणार्थ खालील प्रमाणें सैन्य ठेविलें.
(पुढील तक्ता वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
" एवं ग्रामसंख्या ४४४ ' म्हणून बखरींत म्हटलें आहे. परंतु वर दिलेल्या गांवांची संख्या ४३४ भरते तेव्हां गावांच्या ह्या आंकड्यात दशं चा एकाचा आंकडा नकलकारानें कोठें तरी खाल्ला हें उघड आहे. पृष्ट ४२ वर नागरशाच्या सैन्याची संख्या दिली आहे, तिच्याशीं बिंबदेव जाधवाच्या सैन्याच्या संख्येशीं तुलना केली असतां, असें दिसतें कीं नागरशाच्या सैन्याच्या तिप्पट चौपट सैन्य बिंबदेव जाधवा पाशीं होतें, ह्या चौपट सैन्याच्या जोरा वर बिंबदेव जाधवानें नागरशा व त्रिपुरकुमर ह्यांच्या सैन्याला नामोहरम केलें, त्रिपुरकुमराला चेऊल प्रांताच्या दक्षिणेस हाकून दिलें व मुंबई, माहीम, साष्ठी, सुपारे, इत्यादि उत्तरे कडील सर्व प्रांत काबीज करून तेथें आपले हस्तक व सरदार जे पातेणे प्रभू त्यांची स्थापना केली. सरदार व सैन्य याची व्यवस्था लावल्या वर बिंबदेव जाधवानें आक्रमण केलेल्या प्रांताची उपज म्हणजे उत्पन्न ऊर्फ महसूल ठरवून टाकिला. उपजाच्या दृष्टीनें प्रांतांतील गांवांचे दोन वर्ग होत. सरदारांना सैन्याच्या खर्चा करितां दिलेले मोकासे गांवाचा पहिला वर्ग आणि सरकारांत ठेविलेल्या गांवांचा दुसरा वर्ग. मोकासे गांवाचें उत्पन्न मोकासदारानें आपल्या हाता खालील सैन्याच्या खर्चा पुरतें घेऊन, राहिलेली बाकी राजाला म्हणजे सरकाराला मसाला द्यावी लागे. मोकासगांवांना खोतीगांव असें दुसरें नांव आहे. दोन्हीं नांवें मुसुलमानी आहेत. मुसुलमानी अमला पूर्वी मोकासगांवांना किंवा खोतीगांवांना अधिकारीभोगग्राम ही संज्ञा असे. भोगग्राम दोन प्रकारचे. वृक्ष, काष्ट, तृण, उदक, निधिनिक्षेप, गिरी, नदनदी, ह्यांच्या सुद्धां व चाट, भट, कर, शुल्क, इत्यादि सर्व उपद्रवां पासून मुक्त असें जें दान त्याला धारादत्त भोगग्राम म्हणत. ह्या धारादत्त ग्रामदानाला मुसुलमानी अमलांत इनामगांव ही संज्ञा मिळाली. सैन्याच्या किंवा इतर पेशाच्या पोषणार्थ जमिनीचें व करांचें उत्पन्न भोजकानें घेऊन, बाकीचें शिल्लक उत्पन्न सरकारांत ज्या गांवांचें भरावें लागे त्यांना अधिकारीभोगग्राम म्हणत. धारादत्त भोगग्रामांवर राजाचा कोणता हि हक्क नसे व ते आचंद्रार्क चालावयाचे असत. अधिकारी भोगग्रामां वर राजाची पूर्ण सत्ता असून, ते राजाच्या खुषी वर नियमितकालपर्यंत त्या त्या अधिका-या कडे चालत. दत्त ग्रामां व्यतिरिक्त जे ग्राम ते खुद्द सरकाराच्या अंमला खालीं असत. सरकारी गावांचें उत्पन्न दोन त-हेचें असे, (१) लागवडी खालील क्षेत्रांचें उत्पन्न व (२) जलतरुतृणपाषाणांदिकांचें उत्पन्न. हीं दोन्हीं उत्पन्नें मिळून गावांची वार्षिक संपत्ति होई. ह्या संपत्तीच्या दोन वाटण्या होत, (१) एक ग्रामस्थांची वाटणी व (२) दुसरी सरकारची वाटणी. ग्रामस्थांच्या वाटणीला वृत्ति म्हणत व सरकारच्या ऊर्फ राजाच्या वांटणीला राजभाग म्हणत. ग्रामस्थ म्हणजे गावांतील संपत्युत्पादक कृषीवल व कारू. कृषीवल जमीनीची लागवड करून धान्यसंपत्ति निर्माण करीत आणि कारू सुतारकी, लोहारकी इत्यादि धंदे करून शिल्पसंपत्ति कमावीत, कृषीवलांना कारूंची जरूर पडे व कारूंना कृषीवलांची जरूर पढे. सबब कारूंना कृषीवल धान्याचें बलुतें देत व कारू कृषीवलांना आपल्या शिल्पांची मदत करीत. कारुकृषीवलांच्या ह्या देवघेवींत राजाचा बिलकुल हात नसे. ही देवघेव अनादिसिद्ध समजत, कोण्या राजानें निर्माण केलेली समजत नसत. ही देवघेव ग्रामसंस्था स्थापने बरोबर स्वयंसिद्ध असल्या मुळें शेतकरी, सुतार, लोहार, न्हावी, परीट, भट, इत्यादि वृत्तिवंताच्या वृत्त्या, अनादिसिद्ध स्वयंभू समजल्या जात. अर्थात् राजाचीं राजपत्रें किंवा पातशाहांच्या सनदा वृत्तिवंतांच्या वृत्तिसंबंधानें निघण्याची शक्यता च नसे. सर्व वृत्तिवंत मिळून गांवची पंचाईत बघे. ती गांवचा उत्पन्न, विनिमय, न्याय, युद्ध, इत्यादि-सर्व कारभार स्वयंभू अनादिसिद्ध पहात असे. पंचाइतीच्या निकाला वर तपासणी, मंजुरी, किंवा फिरवाफिरव एतत्संबंधीं अधिकार दुस-या कोणत्या हि सत्तेचा नसे. कां कीं, ग्रामपंचाइति हून वरिष्ट सत्ता मूळारंभीं म्हणजे ग्रामसंस्थास्थापनारंभी मुदलांत च दुसरी कोणती हि नव्हती.