हे बारा सरदार नामांकित घराण्यां पैकीं होते. ह्या खेरीज इतर पुरो जे देशोदेशीचे आले त्यांचीं नांवें एणे प्रमाणें:---
(नांवे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
हे राजे सवितासूर्यवंशी शके १२१५ त म्हणजे बिंबदेव जाधवाच्या पूर्वी एक वर्ष कोंकणांत आले. ह्या ४२ सरदारांना एक वर्ष अगोदर ठाणेंकोंकणा वर स्वारी करण्यास पाठवून, नंतर शक १२१६ त बिंबराजा स्वतः ठाणेंकोंकण काबीज करण्यास उद्युक्त झाला. या उपर म्हणजे शके १२१६ नंतर कांहीं सोमवंशी सरदार आले त्यांची यादी:--
(यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करावे.)
"या खेरीज दालिबंद म्हणजे सशस्त्र प्रभु सवितासोमवंशी बहुत कोंकणी आले" त्यांचीं नामाभिधानें सांगतां ग्रंथ वाढेल म्हणोन मुख्य जें कांहीं ते सांगितले. वरील यादींत जीं चौपन्न नांवें सरदारांची आलीं आहेत तीं सर्व ज्यांना पातेणे उर्फ पाताणे ऊर्फ पाठारे प्रभु म्हणतात त्यांचीं आहेत. हे सर्व बिंबदेव जाधवाच्या अनुषंगानें शक १२१५ व १२१६ नंतर ठाणेंकोंकणांत आले. शक १०६० त प्रताप बिंबाच्या बरोबर जीं ६६ खुमें व कुळें सूर्यसोमवंशी सरदारांचीं व इतरांचीं आलीं तीं शक १२१५ त आलेल्या पातेण्या प्रभूच्या कुळांहून अगदीं निराळीं हें सांगावयास नको च. तसेंच, प्रताप बिंब, मही बिंब, केशव बिंब, ह्या नांवांत जो बिंब शब्द आला आहे तो व बिंबदेव जाधव ह्या नांवांत जो बिंब शब्द आला आहे तो परस्परा हून अगदीं भिन्न अर्थांचे वाचक आहेत हें हि सांगावयाला नको च. शक १०६० त आलेल्या प्रताप बिंबाच्या नांवांतील बिंब शब्द आडनांव वाचक आहे व शक १२१६ त आलेल्या बिंबदेव जाधवाच्या नांवांतील बिंब शब्द व्यक्तिनामवाचक आहे, हें आतापर्यंतच्या कथानका वरून वाचकांनीं ताडलें च असेल. व्यक्तिवाचक बिंबशब्द व आडनांववाचक बिंबशब्द या मधील अर्थाची भिन्नता लक्ष्यांत न आल्या मुळें, कित्येक ग्रंथकारांच्या व लेखकांच्या लेखांत घोटाळ्याचीं अनेक विधानें आलेलीं दृष्टीस पडतात. त्यांचा परामर्श घेऊन कालक्षेप करण्यांत किंचिन्मात्र हि फायदा नसल्यानें, त्यांच्या कडे दुर्लक्ष्य करणें उचित दिसतें --