मागणी नागरशानें नाकारली, मेव्हणे नाखुष झाले व देवगिरीच्या रामदेवराव जाधवाच्या आश्रयास गेले. रामदेवराव जाधव नुकता च शक ११९३ त सम्राट्पदा वर आरूढ झाला होता, नागरशाला ठाण्याचें राज्य करूं लागून तीस वर्षे झालीं होतीं. व त्रिपुरकुमराचें वय ह्या वेळीं ऐन तिशीच्या भरांत आलें होतें. नागरशाच्या मेव्हण्यांनीं रामदेवराव जाधवाला सांगितलें कीं नागरशानें आमच्या बळा वर ठाणेकोंकणचें राज्य मिळविलें आणि आम्हांस स्वास्थ्य करितां बोट भर देखील जमीन देत नाहीं, सबब त्याचा सूड उगविण्याच्या हेतूनें आम्हीं तुज कडे आलों आहों, नागरशाचें राज्य तूं खालसा कर. हा बूट रामदेवरावास मान्य झाला व तो आपल्या दळा समवेत खुद्द ठाण्या वर येऊन ठेपला. चेंदणीकर पाटलानें रामदेवरावाला ठाण्या हून खाडी पलीकडे कळव्यास पिटाळून लाविलें. तों इतक्यांत नागरशाचा पुत्र त्रिपुरकुमर येऊन युद्धांत सामील झाला. कळव्यास मोठें घनघोर युद्ध झालें. तेथून रामदेवरावाचें सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेलें. तेथें हि त्रिपुरकुमर पावला. माहुलीस युद्ध होऊन रामदेवरावाचा प्रधान हेमाडपंडित ह्याचा पराभव झाला. नागरशाचे मेव्हणे-नानोजी, विकोजी व बाळकोजी–हे हि हरले. अश्या प्रकारें या युद्धांत रामदेवरावाचा पूर्ण पराजय झाला. ही हकीकत शक ११९३ नंतर थोड्या च काळांत घडली. या युद्धांत माहीमकर म्हातरा दादपुरो थोर झुंझला, म्हणोन रानवटकर पद राणे पावला. रानवट म्हणजे रणवाट ऊर्फ युद्धभूमि व राणे म्हणजे राजन्यक ऊर्फ राणक, पाटेकरांना नवअर्बुदे ही पदवी मिळाली. दुसरे बहू झुंझले त्यांस अनेक पदांचीं नांवें बहाल केलीं. साष्टीचा देसला आपले दळें बहुत झुंजला, त्यास सरचौक अधिकारी पद जालें, गोहारीकर पाइकाला विराण दिलें. नाऊरकराला नेजाकाहाळा बक्षीस दिली. कांधवळकराला घोडा दिला. साहारकराला पाटवृंदें दिलीं. अश्या नाना देणग्या व पदव्या नागरश्यानें दिल्या.
१७. ठाणेंकोंकणच्या नागरशाचें प्रस्थ ह्या विजयानें अतोनात माजलें. रामदेवराव जाधव म्हणजे सर्व दक्षिणापथाचा सम्राट् . त्याचा पराभव करणें कांहीं लहानसहान गोष्ट नव्हती. नागरशाला जास्त पुंडाई करतां येऊं नये ह्या करितां रामदेवरावानें ह्या पुढें दुसरी एक योजना तयार केली. ती अमलांत आणण्यास त्याला इतर महत्वाच्या भानगडी मुळें पंधरा वीस वर्षे लागलीं. तो पर्यंत नागरशा व त्रिपुरकुमर ठाणेंकोंकणचें राज्य निर्वेधपणें करीत होते. शिलाहारांचें आतां कोणीं उत्तरकोंकणांत राहिलें नव्हतें. यादव सम्राटांचे सामान्य अधिकारी उत्तरकोंकणचा कारभार करीत. परंतु त्रिपुरकुमर वगैरे तत्रस्थ संस्थानिक आपापल्या संस्थानांतून बहुतेक स्वतंत्रपणें राज्य चालवीत. सम्राट्सत्ता रामचंद्र यादवाच्या कारकीर्दीत बहुत हल्लक होऊन गेली होती. त्यांच्या अधिका-यांची सत्ता केवळ नाममात्र असे. संस्थानिक त्यांना विशेष जुमानीत नसत. करतां, खास राजपुत्राची स्थापना ठाणेंकोंकणांत करण्याची योजना रामदेवराव जाधवानें नक्की केली. रामदेवरावाचे शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव, प्रतापशा वगैरे अनेक पुत्र होते. पैकीं शंकरदेवाला त्यानें आपल्या जवळ खास ठेवून घेतलें. केशवदेवाची स्थापना देवगिरीस केली. बिंबराजास उदयगिरि ऊर्फ उदगीर हा प्रांत दिला. प्रतापशास अलंदापुरपाटणीं स्थापिलें. आणि आपण स्वतः कधीं देवगिरीस व कधी पैठणास राहूं लागला. रामदेव हा लढवय्या पुरुष नव्हता. सातारच्या शाहूराजा सारखा सुखोपभोगी, सैल व मृदु माणूस होता. हरिदासांच्या कथा, शास्त्र्यांच्या संभावना, मानभावांचे संवाद, हेमाद्रीचीं व्रतेंउद्यापनें, इत्यादि पारमार्थिक बाबींत त्याचा सर्व वेळ खर्चिला जाऊन, सैन्य व राज्य ह्यांच्या तयारी कडे त्याचें बिलकुल लक्ष्य नव्हतें. राजपुरुषाला सर्वथा अयोग्य अश्या ह्या वर्तनाचे दुष्परिणाम बरेच होऊन चुकले होते; परंतु ते उत्कटत्वानें दृश्यमान होण्यास शक १२१६ तील अल्लाउद्दीनाची स्वारी विशेष कारण झाली.