इत्यादि यजुर्वेदी देशस्थ माध्यंदिन मंडळी पैकी गंगाधर नाईक सांवखेडकरांस पसपवली गांव व विश्वनाथपंत कांबळ्यांस पाहाड गांव प्रताप बिंबानें वंशपरंपरा इनाम दिला. इतर हि गांवीं ब्राह्मणांस वृत्त्या राजहस्तें मिळाल्या. राजा स्वतः वाहिनळे राजणफर येथें राहिला. मरोळी खापण्यांत महाळजापुर व मालाड खापण्यांत नरसापुर येथें वसाहत करविली. काळभैरवी जोगेश्वरीचे ठिकाण जें कान्हेरी तेथील सिद्धाश्रम पाहून व पुरातन कालीं तेथें राजधाम होतें हें जाणून प्रताप बिंब कांहीं काल लेण्यांत राहिला. सूर्यवंशी मराठ्यांची स्थापना राज्यधाम जें माहीम तेथें केली. शेषवंशियांस चौगुलेपद दिलें. गुजर बकाल यांज करवीं गांवोगांवीं दुकानें मांडविली. तीन वर्षे उदमी सुकडा (शुल्क= सुंक) नाहीं व व्यापारीं जकात नाहीं, असा बंदोबस्त केला. शिलाहारांच्या राजवटींतील जुने वृत्तिवंत फारसे कोणी राहिले नव्हते. फक्त. पटवर्धन नामें करून कोणी ब्राह्मण माहीमचें स्थळगुरुत्व संपादणारा राहिला होता, त्याची वृत्ति प्रताप बिंबानें त्याच्या कडे पूर्ववत् कायम केली. वृत्तिवंतांची एणें प्रमाणें गांवगन्ना व्यवस्था लावून, प्रताप बिंबानें निरनिराळ्या माहालां वर जे हवालदार नेमिले त्यांची यादी अशी:- (यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
वरील यादी वरून दिसेल कीं दहा हि हवालदारांच्या हवाल्यांतील सर्व गांवें वसईच्या खाडीच्या दक्षिणेस घोडबंदरा पासून मुंबईवाळुकेश्वर पर्यंतच्या टापूंतील आहेत, वसईच्या खाडीच्या उत्तरे कडील दमण पर्यंतच्या टापूंतील एक हि गांव नाहीं. ह्याचा अर्थ असा होतो कीं प्रतापबिंब वसईच्या खाडीच्या दक्षिणेस उतरल्या वर, अपरादित्य शिलाहारानें किंवा शिलाहारवंशांतील दुस-या राजन्यकांनीं वसईच्या खाडीच्या उत्तरे कडील प्रांता वर स्वारी केली आणि प्रताप बिंबाला व मही बिंबाला साष्टीच्या बेटांत कोंडून टाकलें. त्या मुळें वसई, सोपारा, केळवेमाहीम, तारापूर, डाहाणू व दमण ह्या उत्तरे कडील टापूंशीं प्रताप बिंबाचा बिलकुल संबंध सुटला. अर्थात्, वसईच्या खाडीच्या उत्तरे कडील प्रांतांत हवालदार व महालकरी नेमण्याचें प्रयोजन च राहिलें नाहीं. असा कोंडमारा झाल्या मुळें, साष्टी बेटांत मोठ्या सावधगिरीनें स्वतःचे व स्वत:च्या सैनिकादि लोकांचें संरक्षण करणें ओघास आलें. वसईच्या उत्तरे कडील केळवेमाहीम हातचें गेलें, तर प्रताप बिंबानें दुसरें नवीन एक माहीम वांद-याच्या दक्षिणेस निर्माण केलें व तेथें आपली कायमची राजधानी केली. शिलाहारांची राजधानी जे कल्याणठाणें तें राजपुत्र मही बिंब यानें हस्तगत करून, तेथें सैन्या सह दुसरें ठाणें दिलें. साष्टि बेटांतील निरनिराळ्या हवाल्यांत व महालांत सरदारांच्या हाता खालीं ठिकठिकाणीं राउतांचे गुल्म होते च. अश्या त-हेने साष्टी बेटांत कडेकोट तयारीनें प्रताप बिंब व मही बिंब राहूं लागले. साष्टी बेटांतून शिलाहारांची कायमची हकालपट्टी झाली. शक १०६२ नंतर म्हणजे अपरादित्या नंतर हारिपालदेव, मल्लिकार्जुन, अपरादित्य, केशिदेव व सोमेश्वर असें पांच शिलाहार राजे शक ११८२ पर्यंतच्या शंभर सवा शे वर्षांच्या अवधींत होऊन गेले. ते आपल्याला ठाणे कोंकणचे अधिपति म्हणवीत. कधीकधीं ठाणें शहरा भोंवतालील प्रांत त्यांच्या ताब्यांत हि जाई, परंतु त्यांचा स्थायिक अंमल त्या प्रांतांतून प्रताप बिंबाच्या कालीं जो एकदा उठला तो पुनः नीटसा असा कधी बसला नाहीं. वसई व सोपारा ह्या दोन बेटां वर वैतरणा नदीच्या दक्षिणेस व वसईच्या खाडीच्या उत्तरेस मात्र त्यांचा अंमल शक ११८२ पर्यंतच्या सवा शे वर्षांच्या अवधींत निरंतर चालला. साष्टींत बिंबराजांचा अंमल व शूर्पारक देशांत शिलाहारांचा अंमल, असा मनू शक १०६२ पासून उत्तरकोंकणांत प्रचलित झाला.