१५. प्रताप बिंबाच्या नवीन राज्याला महिकावतीचें राज्य ऊर्फ माहीमदेशचें राज्य म्हटलें असतां तें याथार्थ्याला सोडून नाहीं. देश हस्तगत झाल्या वर प्रताप बिंबानें पैठणास विक्रम भौमास व चांपानेरास गोवर्धन बिंबास देशाची वसाहत करण्या करितां रयत पंचायत पाठविण्या विषयीं व आपला पुत्र मही बिंब यास धाडून देण्या विषयीं पत्रें लिहिलीं. तदनुरूप मही बिंब चांपानेरा हून ६६ कुळें घेऊन ठाणें माहीमास आला. सासष्ट कुळां खेरीज आणीक हि बरींच कुळें मही बिंबा बरोबर आली, परंतु मुख्य नावाणिक अशीं कुळें सासष्ट होती. त्यांत २७ सोमवंशी कुळे, १२ सूर्यवंशीं कुळें व ९ शेषवंशीं कुळें होती. देश उजाड झाला होता व गांवें ओस पडली होतीं, सबब, वाणी, उदमी, वगैरेंचीं हि बरींच कुळें आणावीं लागलीं. लाड, दसालाड, विसा लाड, गुजर वैश्य, पंचाळ, मनुमाया, सीलीक, त्राटक, दैवज्ञ, घोडेल, मोड, दसामोड, विसा मोड, वगैरे कुळें चांपानेराहून आली. पैठणाहून मही बिंबानें कांहीं ब्राह्मणकुळें आणिलीं, त्यांत शास्त्रो, वैदिक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित, व नाईक वगैरेंचीं कुळें होतीं तात्पर्य, व्यापार, उदीम, शास्त्र व संस्कृति ह्यांची स्थापना ह्या उजाड अरण्यमय देशांत प्रताप बिंबाला सर्वतो प्रकारांनीं करावी लागली. इतकी विलक्षण हलाकी पन्नास वर्षांच्या अराजकानें देशाला प्राप्त झाली होती ! शिलाहारांच्या ऐन भरभराटीच्या वेळच्या संस्कृतीचा केवळ नायनाट होऊन गेलेला होता. मिळविलेल्या नवीन राज्याचा प्राणप्रतिष्ठासमारंभ यथाशास्त्र उरकण्यास योग्य ब्राह्मण हि मिळण्याची पंचाईत पडली. पैठणाहून शास्त्री, पंडित व पुरोहित वगैरे मंडळी जेव्हां आली तेव्हां हा राज्यप्रतिष्ठासमारंभ यथासांग साजरा झाला. राज्यारोहणसमारंभ वाळुकेश्वरा नजीक ठाण्यास झाला ठाण्यास म्हणजे प्रताप बिंबाच्या लष्करांत ऊर्फ कटकांत. त्या कालीं कटकाला स्थानक ऊर्फ ठाणें म्हणत. प्रताप बिंबाच्या ह्या ठाण्या हून शिलाहारांचे ठाणे शहर निराळें. शिलाहारांनीं प्रथम जेव्हां उत्तरकोंकणांत राज्य स्थापिलें, तेव्हां त्यांच्या सैन्याचें जें मुख्य कटक ऊर्फ स्थानक तें च पुढें वाढून मोठें राजधानीचें शहर झालें व ठाणें या प्राकृत नांवाने सर्व पृथ्वी भर गाजलें. शिलाहारांच्या त्या जगप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध ठाण्याशीं प्रताप बिंबाच्या वाळुकेश्वरच्या नवीन तात्पुरत्या लष्करवजा ठाण्याचा कांहीं एक संबंध नाहीं. ठाण्यास वैदिक, शास्त्री, पुरोहित, सेनाध्यक्ष वैश्य, वगैरे समुदाय जमून, त्या पैकीं ब्राह्मणांनीं प्रताप बिंबाला आशिर्वाद दिला व ब्राह्मणेतरांनीं जोहार म्हणजे जयकार केला. ह्या वेळीं पैठणाहून जी ब्राह्मणमंडळी आली त्यांची याद बखरकार जी देतो ती अशी:-
(१) गंगाधर नाईक सांवखेडकर-शेषवंशिकांचे कुळगुरू
(२) विश्वनाथपंत कांबळे- राजपुरोहित
(३) भास्कर पंडित चामरे
(४) गोवर्धनाचार्य देवधर-प्रधान
(५) अनंत नायक छत्रे
(६) केशव राम घोडे
(७) मोगरे
(८) जाधवे
(९) हेमटे