तेव्हां प्रताप बिंबाच्या मनांत स्वदेशाहून भले भले मराठे व ब्राह्मण लोक आणून देशाची वसाहत करण्याचा विचार आला. माहिमाहून मुख्य प्रधान जो बाळकृष्णराव सोमवंशी त्यास प्रताप बिंबानें वाळुकेश्वरा पर्यंतचा सर्व मुलूख कबजातींत आणण्या करितां पाठविलें. मध्यें ठाणे कोंकणचा राजा कोणी यशवंतराव शिलाहार होता, त्याच्याशीं युद्ध होऊन तो मारला गेला. अपरादित्य शिलाहाराला बाजूला सारून, ह्या यशवंतरावानें शक १०६२ च्या सुमारास ठाण्याची गादी उपटली असावी असे दिसतें. हा यशवंतराव शिलाहार इतका क्षुद्र होता कीं ह्याच्या लहानश्या कारकीर्दीतील एक हि शिलालेख किंवा ताम्रपट वगैरे लेख बिलकुल उपलब्ध नाहींत. ह्याच्या हयातींत उत्तरकोंकणचा दक्षिणे कडील बराच भाग गोव्याच्या कदंबांच्या हातीं गेला होता आणि हा ठाणें जिल्ह्यांतील दहा पांच गांवांत कसा तरी जीव धरून होता. ह्याची व प्रताप बिंबाचा मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याची गांठ पडून, बाळकृष्णरावाच्या तरवारीला हा बळी पडला. यशवंतराव शिलाहाराला मारून बाळकृष्णराव कळव्यास आला. तेथें कोकाट्या नांवाच्या क्षुद्र मराठ्याचा अमल होता. लढाई बिढाई न होता, तो निमुटपणें शरण आला. तेथून सोमवंशी मठास किंवा मढास समुद्रतीरीं पोहोचला. मठ येथील ब्रह्मकुंड, हिरबादेवी व मुक्तेश्वरदेव बघून बाळकृष्णराव येसावें, जुहूं, वाहिनळें, राजणफर, ह्या गांवा वरून थेट वाळुकेश्वरीं गेला. तेथील बाणगंगा तीर्थ व हनुमंताची प्रतिमा देखून, मुख्य प्रधानानें पांच दिवस समुद्रकांठीं मुक्काम केला. बरोबर सैन्य होतें, सबब बाळकृष्णरावाचा तळ बाणगंगेच्या काठीं सध्यां जेथें गव्हर्नमेंट हाउस आहे तेथें उघड्या जागेत पडला असावा. केळवेंमाहीम हा मध्य बिंदू धरून दमण पासून वाळुकेश्वरा पर्यंत एकंदर लांबी पक्के २८ कोस म्हणजे सध्याचे ८४ भैल होते, असें बाळकृष्णराव प्रधानाच्या मोजणींत आलें. सर्व देश केवळ रान होऊन गेला आहे, आपण एकदा स्वतः येऊन पहावा, अश्या अर्थाचें पत्र प्रधानानें राजा प्रतापबिंबास माहिमास पाठविलें. त्या प्रमाणें स्वतः येऊन व देशाची दुरवस्था पाहून, तेथें नवीन वसाहत करण्याचा निश्चय प्रताप बिंबानें केला.
१४. असें दिसतें कीं दमण पासून वाळुकेश्वर पर्यंतचा मुलूख काबीज करण्यास प्रताप बिंबाला सुमारें दोन महिन्यां हून जास्त काळ लागला नसावा, काळोजी सीरण्या, विनाजी घोडेल, यशवंतराव शेलार व कोकाट्या ह्या चार क्षुद्र राजांशीं लढाया किंवा साम करण्यास ह्या हून जास्त वेळ लागण्याचें कारण नव्हतें. शिवाय, सर्व देश वैराण झालेला होता, त्या मुळें रस्त्यांत इतर अडथळे होण्याचा संभव नव्हता. सैन्याला दाणावैरण पुरविण्यांत जो कालातिपात झाला असेल तो जर वगळला, तर ही मोहीम सुमारें वीस पंचवीस दिवसांत खलास झाली असावी. देशाला अरण्याची अवस्था प्राप्त झाली होती, असें बखरकार लिहितो. त्या वरून अनुमान होतें कीं अनंतपाल शिलाहाराच्या नंतर जीं पन्नास वर्षे गेलीं त्या पन्नास वर्षांत गोव्याच्या कदंबांना उत्तरकोंकणांत सुखानें राज्याराम घेतां आला नाहीं. शिलाहारवंशीय व्यक्तींनीं व शिलाहारांच्या अधिका-यांनीं कदंबांना इतकें भंडावून सोडिलें असावें कीं शक १०१६ पासून शक १०६० पर्यंत देशांत झुंझें, छापे व जाळपोळ ह्यांचा सुळसुळाट होऊन, शेती, उदीम, व्यापार धंदा, ग्रामसंस्था व आमदरफ्त अगदीं बंद झाली व दमण पासून वाळुकेश्वर पर्यंतचा मुलूख बेचिराख अरण्य बनलें. अश्या दुरवस्थेंतून देश सुखरूप बाहेर पडावयाचा म्हणजे पूर्वीच्या राजांचा अंमल देशा वर पुनः स्थिर झाला पाहिजे किंवा नवीन बाहेरच्या राजांनीं येऊन तेथें स्थिरस्थावरता उत्पन्न केली पाहिजे. आणि शक १०६० च्या नंतर उत्तरकोंकणांत हे दोन्ही प्रकार सुरू झाले. बाहेरचा बिंबवंशीय राजा येऊन त्यानें उत्तरकोंकणचा समुद्रतीरा लगतचा पश्चिमेकडील प्रांत आक्रमिला; आणि ठाणें कोंकणच्या मल्लिकार्जुन शिलाहारानें क-हाडकर शिलाहारांच्या साहाय्यानें उत्तर कोंकणच्या पूर्वेकडील प्रांता वर पुन: राज्य स्थापिण्याचा संकल्प केला. प्रताप बिंबानें केळवेंमाहीम हें राजधानीचें गांव नवीन निर्मिलें. कल्याणा जवळील ठाणें ही शिलाहारांची पूर्वीची राजथानी होती च, शक १०६२ त बिंबोपनामक प्रतापानें दमण पासून वाळुकेश्वर पर्यंतच्या समुद्रीय प्रांतांत एक नवीन राज्य कसें स्थापिलें त्याचा हा असा वृत्तान्त आहे. हें नवीन राज्य शक १०६२ पासून शक ११६३ पर्यंत सुमारें शंभर वर्षे टिकलें. ह्या शंभर वर्षांत ज्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व भौमिक उलाढाली झाल्या त्यांचें वर्णन बखरीच्या अनुरोधानें पुढें करितों.