हा प्रसंग शक ९९८ च्या सुमारास घडला. जयकेशी कदंब व माम्वाणि शिलाहार हे दोघे हि कल्याणीच्या चालुक्यांचें मांडलिक होते. तेव्हां ह्या मांडलिकांतील हा प्राणघेण्या बखेडा चालुक्य सम्राटांनीं निमूटपणें कसा चालूं दिला, अशी शंका येण्याचा संभव आहे. परंतु शक ९९८ त चालुक्यांच्या राज्यांत गादी करितां आपसांत भांडण उपस्थित झालें होतें. पहिल्या सोमेश्वर चालुक्याचे सोमेश्वर व विक्रमादित्य असे दोन मुलगे होते, वडील सोमेश्वर व धाकटा विक्रमादित्य. सोमेश्वर हा ऐदी, थंड व संशयी माणूस होता. विक्रमादित्य त्याच्या अगदीं उलट स्वभावाचा म्हणजे साहसी, पराक्रमी व लोकप्रिय होता. सोमेश्वराच्या बाजूला ठाण्याचा शिलाहार माम्वाणि असून, विक्रमादित्याची साथ जयकेशी कदंब करीत असे. विक्रमादित्याच्या सोमेश्वराशीं ज्या शेवटच्या झटापटी झाल्या त्यांत जयकेशी कदंबानें सोमेश्वराचे भिडू जे राजेन्द्र चोल व माम्वाणि शिलाहार त्यांचा पराभव करून, माम्वाणि शिलाहाराला ठार करून टाकलें. अश्या त-हेनें उत्तरकोंकण ऊर्फ कवडीद्वीप जयकेशी कदंबाच्या ताब्यांत शक ९९८ च्या सुमारास गेले. तें सुमारें पंचवीस वर्षे कदंबाच्या अंमला खालीं होतें. पुढें शक १०१६ च्या सुमारास माम्वाणि शिलाहाराचा पुतण्या व नागार्जुन शिला हाराचा मुलगा जो अनंतपाल शिलाहार त्यानें जयकेशी कदंबाचा पुत्र जो पहिला विजयादित्य कदंब त्याला हटवून उत्तरकोंकणचें म्हणजे कवडीद्वीपाचें आपलें राज्य परत घेतलें; परंतु, थोड्या च अवधींत कदंबांनीं कवडीद्वीपाचें पुन: आक्रमण केलें (शक १०४८).दहा पांच वर्षे उत्तरकोंकण कदंबांच्या ताब्यांत राहिल्या वर, अपरादित्य शिलाहारानें तें पुनः हिसकावून घेतलें; असा गोंधळ उत्तर कोंकणांत पन्नास वर्षे चालल्या मुळें, शिलाहारांची सत्ता अगदीं डळमळून गेली व देश सर्वस्वीं नागविला जाऊन केवळ अरण्यमय झाला. शिलाहारांच्या अश्या हलाकीच्या काळांत शक १०६० त चांपानेरच्या बिंबोपनामक क्षत्रियांनीं उत्तरकोंकणा वर स्वारी करण्याचा घाट घातला.
१३. शक १०६०त कल्याणी येथें तिसरा सोमेश्वर भूलोकमल्ल चालुक्य सर्व दक्षिणापथाचें साम्राज्य करीत होता. मानसोल्लास ऊर्फ अभिलषितार्थचिंतामणि नामक ग्रंथाचा कर्ता जो सोमेश्वर चालुक्य तो हा च. ह्याचा कल राज्यरक्षणा पेक्षां साहित्यशास्त्रसेवे कडे विशेष होता. ह्याच्या कारकीर्दी नंतर चालु क्यांच्या सद्दीला ओहोटी लागली, कलचुर्यांनीं कल्याणीचें राज्य बळकाविलें, बसव लिंगायतानें बखेडा केला व त्या बखेड्याच्या घालमेलींत कलचुर्यसत्ता संपुष्टांत आली. ह्या च अवधींत अणहिलपट्टणास प्रख्यात सिद्धराज जयसिंह चौलुक्य हा कर्ता पुरुष राज्य करीत होता व त्याचा प्रसिद्ध पुत्र कुमारपाल चौलुक्य पांच वर्षांनीं आपली विजयी कारकीर्द सुरू करणार होता. म्हणजे ह्या कालीं कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता क्षीण होत जाण्याच्या मार्गास लागली होती आणि अणहिलवाडच्या चौलुक्यांची सत्ता ऐन विजयश्रीच्या भरांत होती. अणहिलवाडच्या अश्या भरभराटीच्या उमेदींत चौलुक्यांचें मांडलिक जे चांपानेरचे बिंब राजे त्यांनीं उत्तरकोंकणा वर चढाई करण्याचा मनोदय शक १०६० त केला. ह्या मनोदयानें चौलुक्यांचे मित्र जे गोव्याचे कदंब त्यांची हि बाजू उचलल्या सारखी झाली. युद्धयात्रेला मुहूर्त आश्विन-कार्तिकांतील न धरतां, मुद्दाम माघफाल्गुनांतील धरला. कारण, उत्तरकोंकणांतील सरदगर्मी व तापसराई माघ महिना उजाडे तंव वर निखालस संपत नाहीं. माघशुद्धांत दोन मुहूर्त होते; एक वसंतपंचमीचा दुसरा रथसप्तमीचा. पैकीं पंचमीला मंदवार पडत असल्या मुळें, सप्तमीचा मुहूर्त पसंत ठरला. ह्या शुभ मुहूर्ता वर चांपानेर पंच्यायशी वर राज्य करण-या गोवर्धन बिंबानें आपला धाकटा भाऊ प्रताप बिंब ह्याज समागमें दहा हजार घोडा देऊन स्वारी सिद्ध केली. दहा हजार घोडा या शब्दांनीं केवळ दहा हजार घोडेस्वार असा अर्थ घ्यावयाचा नाहीं. पाईक, बाजारी, बुणगे, वगैरे उपसाहित्याचे सर्व लोक मिळून, सैन्यसंख्या सुमारें दहा हजार होती, एवढा च अर्थ लक्षित आहे. खरे ऐन लढवय्ये घोडेस्वार सुमार पांच चार हजार असावे. स्वारीस निघण्याच्या संकल्पाचा दृढाव गोवर्धन बिंबानें आपला मुख्य सेनापति नाईकराव व मुख्यमंत्री रघुनाथराव ह्यांच्या संमतीनें केला. प्रताप बिंबा बरोबर पूर्वप्रघातानुरूप राजगुरु ऊर्फ राजपुरोहित हेमाडपंत चामरे ऊर्फ चावरे ह्यांस सल्लामसलती करितां दिलें होतें. पुरोहिता खेरीज आणीक आधकारी प्रताप बिंबाला जे गोवर्धन बिंबानें नेमून दिले त्यांची नांवनिशी अशी:--- (खालील तक्ता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)